पुणे – इमारतीच्या शेवटच्या छतावरील म्हणजे ‘रुफ टॉप हॉटेल’वर पोलिसांनी कारवाई करावी, अशा महापालिका प्रशासनाने पाठवलेल्या पत्राला पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण, आरोग्य, आकाशचिन्ह अशा विविध विभागांकडून गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी दिलेल्या तक्रारी पोलीस ठाण्यात धूळखात पडून आहेत. ‘महापालिकेने संबंधित हॉटेलवर कारवाई करावी’, असे पत्र महापालिकेला दिले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात दोन्ही प्रशासनांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
रात्री विलंबापर्यंत हॉटेल चालू असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो, अनेकदा वादाचे प्रसंग घडतात, वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही, अशी सूत्रे मांडत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार महापालिकेकडे केल्याचा दावा पोलीस प्रशासन करत आहे. महापालिकेने केलेल्या तक्रारींची गांभिर्याने नोंद घेतली जावी. गुन्हे करणार्यांवर कारवाई करावी, यासाठी महापालिकेने जून २०२२ मध्ये पोलीस सहआयुक्तांना महापालिकेच्या तक्रारींनुसार गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी ‘स्वतंत्र नोडल अधिकार्या’ची नियुक्ती करावी, असे पत्र दिले होते; मात्र त्यावर महापालिकेला प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. (पोलीस आणि प्रशासन हे एकमेकांवर आरोप करत आहेत; मात्र जनतेच्या समस्येचे काय ? ती कोण सोडवणार ? – संपादक)