सध्या ‘डे कल्चर’ (विशिष्ट विषयाशी संबंधित दिवस साजरा करण्याची पद्धत) पुष्कळ फोफावले आहे. सामाजिक माध्यमांवर ‘जागतिक आजी-आजोबा दिवसा’पासून ‘जागतिक वडापाव दिना’पर्यंत ‘व्हॉट्सअॅप’वर प्रतिदिन काही ना काही कल्पक ‘दिन’ धुमधडाक्यात चालू असतात. अशात अजून एका ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिना’ची बातमी १० सप्टेंबरला वाचली. ज्यात ‘प्रतिवर्षी ७ लाखांहून अधिक आत्महत्या जगात घडत आहेत’, हे सांगितले होते. या वृत्तात एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी, जिने स्वतः नैराश्याचा अनेक वर्षे सामना केला, तिने या दिनानिमित्त ‘आत्महत्या न करण्याविषयी’ जनजागृती केली. खरेतर एक उपक्रम म्हणून जरी स्तुत्य असला, तरी ‘आत्महत्या रोखणे’, हा काही एका दिवसात जागृती होईल, असा विषय नाही !
जीवघेणी स्पर्धा, परीक्षा, न गाठता येणारे ध्येय, दुरावत चाललेला सुसंवाद आणि अशा विविध कारणांमुळे येणारी टोकाची निराशा माणसाला ‘आता सर्व काही संपले आहे’, अशा भावनेपर्यंत आणते ! या एका दिवसाच्या ‘डे’, म्हणजे दिवसाप्रमाणेच निराशाग्रस्त व्यक्तींचे ते विचार रोखण्याचे उपायही उथळ आणि वरवरचे होऊ शकतात. या न संपणार्या अपेक्षांची आणि निराशेची उत्तरे अनेक जण ‘डिजिटल’ माध्यमांवरच शोधत बसतात अन् केवळ ‘यूट्यूब’वरील ‘स्वतःवर विश्वास ठेवा’, ‘तुम्ही नक्की करू शकता !’, अशा पोकळ विचारापर्यंत काही काळ घालवतात. सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्मासारखा शाश्वत दुसरा अन्य कोणताही मार्ग नाही. अपेक्षाभंग, दु:ख, निराशा, संकटे, अशा प्रसंगी देवाचे साहाय्य घेतल्यास, त्याची भक्ती केल्यास, पुन्हा मनःशांती लाभून सकारात्मकता वाढते, तसेच कुविचार नष्ट होतात, ‘नेमकेपणाने काय करायला हवे ?’, हेही आपल्याला पुढे उमगते. जीवनातील गोष्टी या प्रारब्धानुसारच घडत असल्याने त्याविषयी खंबीर रहाता येते. प्रतिदिन ध्यान केल्याने स्थैर्य, चिकाटी, संयम, अशा प्रबळ दैवी गुणांचा विकास होतो. अशी आत्मबळ वाढलेली व्यक्ती स्वतःसह शेकडो व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकते. आपण कितीही भौतिक सुखांच्या मागे लागलो, तरी कायमस्वरूपी आनंद इथे कधीच लाभणार नाही, तो सद़्मार्ग अध्यात्मानेच मिळेल. तेव्हा असा ‘आत्महत्या प्रतिबंधक (रोखण्याचा) दिन’ साजरा करण्यापेक्षा शाश्वत शक्ती देणार्या अध्यात्माचे आचरण आपण करायला हवे, तरच सशक्त समाज निर्माण होईल !
– श्री. नीलेश देशमुख, तळोजा, नवी मुंबई.