शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढली !
मिरज, १८ सप्टेंबर (वार्ता.) – शासनाकडून गणेशोत्सव, दुर्गा पूजा अशा सार्वजनिक उत्सवांच्या वेळी प्रतिवर्षी नवीन धोरण ठरवण्यापेक्षा कायमस्वरूपी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण घोषित केल्यास मूर्तीकारांना समाजात मूर्ती वितरण करण्यास अडचणी येणार नाहीत. याविषयी शासनाने ठोस भूमिका घेणे अपेक्षित आहे, तसेच ‘डॉल्बी’पेक्षा पारंपरिक वाद्य वाजवण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली पाहिजे, जेणेकरून बँजो आणि बॅण्ड वाजवणार्या कामगारांना काम मिळेल. या वर्षी लहान मूर्ती ते अडीच फुटांपर्यंत घरगुती श्री गणेशमूर्तींचे आम्ही वितरण करणार आहोत, अशी माहिती येथील किल्ला भागातील मूर्तीकार श्री. गिरीश जोशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढली !
श्री. गिरीश जोशी म्हणाले, ‘‘माझे कुटुंबीय मिरज येथे गेल्या १०० वर्षांपासून गणेशमूर्ती बनवण्याचे कार्य करत आहेत. सध्या आमची ही चौथी पिढी या कार्यात सहभागी आहे. या वर्षी एकूण ३ सहस्र घरगुती श्री गणेशमूर्तींचे वितरण करत आहोत. त्यांपैकी १ सहस्र ५०० मूर्ती या शाडू मातीच्या बनवल्या आहेत. अन्य मूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या आहेत. गुजरात येथील कच्छ येथून आम्ही शाडू माती मागवतो. त्यावर प्रक्रिया करून शाडू मातीचा गोळा आणि साचे सिद्ध करून त्यापासून मूर्ती बनवली जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी, तसेच शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी वेळ लागतो. बारीक सारीक काम करण्यासाठी कारागीर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा मूर्ती बनवण्यास विलंब होतो. शाडू मातीच्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.’’
१०० वर्षांपासून श्री गणेशमूर्ती बनवण्याचे कार्य करणारे मल्लिकार्जुन कुंभार यांचे कुटुंब !
मिरज येथील कुंभार गल्लीमधील मूर्तीकार श्री. मल्लिकार्जुन कुंभार म्हणाले, ‘‘आम्ही १ सहस्र गणेशमूर्ती साकारल्या आहेत. बहुतांश मूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वितरण करण्यासाठी या मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्ती ६ फुटांपर्यंत बनवल्या आहेत. अन्य मूर्ती घरगुती वापरासाठी आहेत. शाडू मातीच्या २५ मूर्ती बनवल्या आहेत. १ शाडू मातीची मूर्ती बनवण्यास १ दिवस लागतो. विविध प्रकारच्या मूर्तींसाठी मागणी वाढत आहे. मिरज शहर आणि परिसरातील छोटी गावे येथे आम्ही बनवलेल्या गणेशमूर्ती वितरित करणार आहोत. गेल्या १०० वर्षांपासून आम्ही गणेशमूर्ती बनवत असून सध्या आमची चौथी पिढी गणेशमूर्ती बनवण्याचे कार्य करत आहे.’’