आधी वंदू तुज मोरया ! : Ganapati

श्री गणपती

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणपतीमध्ये शक्ती, बुद्धी, संपत्ती हे गुण असून तो सात्त्विक आहे. भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. गणपति ही विद्या, बुद्धी आणि सिद्धी यांची देवता आहे. तो दुःखहर्ता आहे; म्हणून प्रत्येक मंगल कार्याच्या प्रारंभी गणेशाची पूजा करतात. विद्यारंभी आणि ग्रंथारंभीही गणेशाचे स्तवन करतात. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहितांना आरंभी

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या ।। जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। १ ।।

असे म्हणून श्री गणेशाला प्रथम वंदन केले आहे.

श्री शंकराने कार्तिकस्वामी आणि गणपति या दोघांना ‘सर्व तीर्थांत स्नान करून शुद्ध होऊन येण्यास सांगितले. गणपतीने विचार केला की, श्री शंकर, पार्वती हे सर्व जगाचे आदि कारण आहेत. जगतः पितरौ वन्दे परमेश्वरी । उभयता माझ्या भाग्याने माता-पिता या रूपाने लाभले आहेत. पुत्राला सर्व तीर्थांपेक्षा माता-पिता ही श्रेष्ठ तीर्थे आहेत.

‘सकल तीर्थाचिये धुरे । जिथे का मातापितरे ।।’, असे मानून त्याने श्री शंकर-पार्वती यांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. शंकर-पार्वतीने ‘तीर्थस्नान, यज्ञ, मंत्र, तप, जप इत्यादी साधनांना माता-पित्याच्या अर्चनाइतकी योग्यता नाही’, असे ठरवून गणपतीला वर दिला, ‘तुझ्या ज्ञानदृष्टीमुळे तू श्रेष्ठ झालास. यापुढे कोणत्याही लौकिक, यज्ञयाग पूजा, वेदारंभ इत्यादी सर्व कार्यारंभी तुझीच अग्रपूजा होईल.’ जे कुणी देव किंवा मनुष्य श्री गणेशाची पूजा ‘सर्वप्रथम’ करतील, त्यांना निश्चितपणे इंद्रादी देवही पूजतील अन् त्यांचे सर्व मंगलमय होईल. फलाच्या इच्छेने जे ब्रह्मा, विष्णु, इंद्र अथवा अन्य देव, देवतेची पूजा अर्चा करतील; परंतु तुझी पूजा करणार नाहीत, त्यांच्या मार्गात तू विघ्न किंवा बाधा उपस्थित करशील.

श्री गणपतीस अग्रपूजेचा मान अधिकार हा केवळ त्याच्या व्यापक ज्ञानामुळे प्राप्त झाला. तेव्हापासून कोणत्याही लौकिक, वैदिक, विद्यारंभी, विवाह कार्यारंभी त्याचे मंगल स्मरण करण्याची प्रथा अनादी काळापासून चालू आहे. संत नामदेव, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी, जगद्गुरु संत तुकाराम, चिंतामणी महाराज, मोरया गोसावी इतकेच काय, नरेंद्र या कवीनेही आपल्या ‘रुक्मिणी स्वयंवरा’ काव्याद्वारे श्री गणेशाला वंदन केले आहे.

– सौ. मृणालिनी मुकुंद ठकार, पुणे-५१. (साभार : ‘आनंदी ज्योतिष’)


पहिली पूजा करण्याचा मान श्री गणेशाला असण्यामागील धर्मशास्त्र !

श्री गणेश

‘श्री गणेश अथर्वशीर्षात ऋषींनी त्याचे वर्णन ‘मूलाधारस्थित’ असे केलेले आहे. मूलाधार हे मानवी शरिरातील ६ चक्रांपैकी एक आहे आणि ते सर्व चक्रांचा आधार आहे. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता समजली जाते. या चक्राचा क्रमांक पहिला असल्याने ओघानेच पहिली पूजा करण्याचा मान हा श्री गणेशाला मिळाला.

श्री गणेश ही ऋद्धी, सिद्धी, बुद्धी आणि समृद्धी यांची देवता आहे. गणेशाला परब्रह्मस्वरूप मानले जाते. परब्रह्माची प्राप्ती त्रियुगातील चौथ्या तुर्यावस्थेत गेल्याविना होणार नाही. हीच गुह्य गोष्ट चतुर्थी व्रतात सुचवण्यात आली आहे. ऊर्यावस्थेत जाऊन मनोरूपी चंद्र जागृत झाला, तरच परब्रह्माची प्राप्ती होईल. यासाठीच चतुर्थीला उपवास सोडण्यापूर्वी चंद्रदर्शन घेण्याची पद्धत आहे.’

– निवृत्ती भि. शिरोडकर (साभार : दैनिक ‘गोमंतक’, वर्ष २००१)


गणेशोत्सवाचा प्रारंभ गणेशचतुर्थीलाच का ?

गणेशोत्सवकाळात गणेशचतुर्थी साजरी केली जाते. असे का ? गणेश तृतीया, गणेश पंचमी, गणेश सप्तमी का साजरी केली जात नाही ? तत्त्ववेत्या पुरुषांची भावना आणि मान्यता आहे की, सत्त्व, रज आणि तम हे ३ गुण असतात. त्यांना सत्ता देणारे चैतन्य हे चौथे आहे.

जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या ३ अवस्थांना पहाणारी तुरीया अवस्था ही चौथी अवस्था आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांना जो पहाणारा आहे, तो कालातीत आहे, चौथा आहे. ज्यांना ज्ञानमार्गाचा साक्षात्कार झाला आहे, त्या महापुरुषांचा अनुभव आहे की, तीन अवस्था संसाराच्या आहेत आणि चौथी अवस्था ही साक्षी चैतन्यस्वरूपाची आहे. या सर्व कारणांमुळे गणेशोत्सवाचा प्रारंभ गणेशचतुर्थीलाच होतो. १० – ११ दिवस उत्सव साजरा करून मग श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

हिंदु धर्मीय देवतांचीही उदारता !

सनातन धर्माची इतकी विशालता आणि उदारता आहे की, तुम्हाला आपले मूळ स्वरूप समजवण्यासाठी धर्माने असे विधान करून ठेवले आहे की, ज्यांची आपल्या मूळ स्वरूपात स्थिती आहे, त्यांची मूर्ती बनवून त्यांच्या समोर नाचा किंवा गा ! आपला अहंकार विसर्जित करा. तुमचा अहंकार विसर्जित करण्यासह साहाय्यक मूर्तीचेही विसर्जन करण्याची व्यवस्था आहे. तुमचे देव तुमच्यावर असंतुष्ट होत नाहीत. तुमचे कल्याण झाल्याचे पाहून ते प्रसन्न होतात, ही आपल्या हिंदु धर्मीय देवांचीही उदारता आहे. देवाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतरही त्यातील देवत्व टिकून रहाते. मानवी शरिराचे विसर्जन (मृतदेहाला अग्नी दिल्यावरही) झाल्यानंतरही आत्मतत्त्व रहाते. या सत्य स्वरूपाला समजून घेण्यासाठी साधना आणि सत्संग यांचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे.’

– (साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २०२२)


श्री गणपतीचे माहात्म्य !

डोळे, कान आणि नाक या आपल्या इंद्रियांनाही ‘गण’ म्हटले जाते. या गणांचा जो पती (स्वामी) (आधारस्वरूप नियामक परमात्मा) आहे, त्याला प्रसन्न केल्यास तुमचे गण ठीकठाक कामे करतील, जीवनात विघ्ने आणणार नाहीत. भौतिक जगाच्या आसक्तीपासून वाचण्यासाठीही श्री गणेशाचे पूजन करा !

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २०२२)