सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारांचा अर्थसाहाय्याचा प्रश्न नवीन सरकारने तातडीने सोडवावा ! – गुरुदास गवंडे, गणेशमूर्तीकार

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकरांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून आर्थिक साहाय्य मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने संबंधित अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता अद्यापपर्यंत अशा प्रकारे कोणत्याही अर्थसाहाय्याला संमती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. असे असेल, तर नवीन येणार्‍या सरकारने गणेशमूर्तीकारांचा हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी गणेशमूर्तीकार गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

‘गणेशमूर्तीकारांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून अर्थसाहाय्य मिळणार आहे. याचा १ सहस्र ५०० लाभार्थ्यांना लाभ होणार आहे’, असे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे गणेशमूर्तीकार तालुकास्तरावरील कार्यालयात जाऊन याविषयी विचारपूस करत आहेत; परंतु आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘अजूनपर्यंत अर्थसाहाय्य संमत झाले नाही’, असे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती शाळांच्या सक्षमीकरणासाठी ३ कोटी रुपये निधीतून १ सहस्र ५०० लाभार्थ्यांना माती मळणी यंत्र आणि ‘कलर गन’ (गणेशमूर्ती रंगवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र) यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. याकरता १० ऑगस्ट २०२४ पूर्वी ग्रामपंचायतस्तरावर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते; मात्र त्याची सूची पंचायत समितीपर्यंत पोचलेली नाही, याची नोंद सर्व गणेशमूर्तीकारांनी यांनी घ्यावी, असे आवाहन गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.