‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारल्‍यास तक्रार करा !

पुणे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांचे नागरिकांना आवाहन

प्रतिकात्मक चित्र

पुणे – प्रवास करतांना अधिक तिकीट घेतल्‍याचे आढळून आल्‍यास नागरिकांनी आर्.टी.ओ.कडे ‘इ-मेल’ अथवा कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपर्क साधावा. ट्रॅव्‍हल्‍सचालकांनी नियमानुसार तिकिटाची आकारणी करणे अपेक्षित आहे. ज्‍या चालकांनी अधिकचे भाडे आकारले आहे, त्‍यांच्‍यावर निश्‍चितच कारवाई केली जाईल. प्रवाशांनाही असा अनुभव आल्‍यास त्‍याविषयीची तक्रार करावी. त्‍याची नोंद घेऊन कारवाई केली जाईल, असे पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.

पुणे येथून प्रतिदिन अनुमाने ९०० हून अधिक ट्रॅव्‍हल्‍स महाराष्‍ट्राच्‍या विविध भागांत धावतात. यात मराठवाडा आणि विदर्भ येथे जाणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सची संख्‍या अधिक आहे. गणेशोत्‍सवासाठी पुणे येथून आपापल्‍या गावी निघालेल्‍या नागरिकांना तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मनमानी पद्धतीने तिकीट आकारणार्‍या खासगी बस आस्‍थापन चालकांवर राज्‍याच्‍या परिवहन विभागाने कारवाई करण्‍याची चेतावणी देऊनही तिकिटाच्‍या रकमेत दुप्‍पट वाढ केली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी बोलत होते.

संपादकीय भूमिका :

‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारू नये, याविषयीची जरब परिवहन विभाग कधी निर्माण करणार ?