वडगाव मावळ (जिल्हा पुणे) – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प शेतकर्यांना देशोधडीला लावणारा असल्याने तो मावळ तालुक्यातून कायमस्वरूपी हद्दपार करावा, अशी मागणी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून शेतकर्यांना न्याय दिला जाईल, अशी चेतावणी दिली आहे. पक्षाच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवून सरकारने मावळातील सहस्रो शेतकर्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षावर पाणी फेरले आहे. या बंदिस्त जलवाहिनी विरोधात शेतकर्यांनी प्राणांचे बलीदान दिलेले आहे. शेतकर्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रहित करावा आणि मावळातील शेतकरी आणि मावळवासीय यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.