‘इंडिया’ आघाडीचा पळपुटेपणा !

१४ वृत्तवाहिन्‍यांच्‍या सूत्रसंचालकांना सामोरी न जाणारी ‘इंडिया’ आघाडी देशातील जनतेने विचारलेल्‍या प्रश्‍नांना कशी सामोरी जाणार ?

सध्‍या सर्वच स्‍तरावर चर्चेत असणार्‍या ‘इंडिया’ आघाडीच्‍या एका निर्णयाने सर्वांच्‍याच भुवया उंचावल्‍या आहेत. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले, ‘‘इंंडिया’ आघाडीने १४ वृत्तवाहिन्‍यांच्‍या सूत्रसंचालकांवर बहिष्‍कार घातला आहे. आघाडीचे नेते काही माध्‍यम संस्‍थांच्‍या सूत्रसंचालकांच्‍या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. ‘भारत एक्‍सप्रेस’च्‍या अदिती त्‍यागी, ‘नेटवर्क १८’चे अमन चोप्रा, ‘न्‍यूज १८’चे अमिश देवगण, ‘सी.एन्.एन्-न्‍यूज १८’चे आनंद नरसिंहन्, ‘रिपब्‍लिक टीव्‍ही’चे अर्णब गोस्‍वामी, ‘डीडी न्‍यूज’चे अशोक श्रीवास्‍तव, ‘आज तक’च्‍या चित्रा त्रिपाठी आणि गौरव सावंत?; ‘टाईम्‍स नाऊ नवभारत’च्‍या नाविका कुमार, ‘इंडिया टीव्‍ही’च्‍या प्राची पाराशर, ‘भारत २४’च्‍या रुबिका लियाकत, ‘आज तक’चे शिव आरूर आणि सुधीर चौधरी, ‘टाइम्‍स नाऊ नवभारत’चे सुशांत सिन्‍हा अशी त्‍यांची नावे आहेत. पक्षपाती वृत्ते प्रसारित करणे, पक्षपाती वार्तांकन करणे, द्वेष करणे, ‘इंडिया’ आघाडीची अपकीर्ती करणे, असे प्रकार त्‍यांच्‍याकडून होत असल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हे सर्व टाळण्‍यासाठी बहिष्‍काराचा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे काँग्रेसने सांगितले. १-२ नव्‍हे, तर १४ सूत्रसंचालकांवर घातलेला बहिष्‍कार म्‍हणजे वृत्तवाहिन्‍यांच्‍या स्‍वातंत्र्याची केलेली गळचेपीच नव्‍हे का ? हा दिवस म्‍हणजे लोकशाहीसाठी काळा दिवसच म्‍हणावा लागेल. इतक्‍या मोठ्या प्रमाणात बहिष्‍कार घालून ‘इंडिया’ आघाडी नेमके काय साध्‍य करू पहात आहे, हे न कळण्‍याइतकी जनता दूधखुळी नाही. हे आघाडीने लक्षात घ्‍यावे.

‘इंडिया’ आघाडीचा नाकर्तेपणा !

थेट बहिष्‍कारासारखा टोकाचा निर्णय घेऊन संबंधितांची तोंडे बंद करण्‍याचा प्रकार करून ही आघाडी स्‍वत:चेच हसे करून घेत आहे; कारण १४ जणांवर निर्बंध आणून काय होणार ? सत्‍य कधीही लपून रहात नसते ! संबंधित सूत्रसंचालक द्वेष पसरवत असल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात लढत रहाणार असल्‍याचे काँग्रेसचे म्‍हणणे आहे. अर्थात् बहिष्‍काराचे शस्‍त्र निपजण्‍याला ‘लढणे’ म्‍हणत नाहीत ! एखाद्याने त्रास दिला, तर ‘आम्‍ही तुला आता खेळायलाच घेणार नाही’, असा प्रकार लहान मुले करतात. यामुळे ‘आघाडीचाही हा पोरखेळच आहे कि काय ?’, असेच जनतेला वाटते. आघाडीमध्‍ये देशातील २९ पक्षांचा समावेश आहे. इतके तगडे संख्‍याबळ स्‍वतःजवळ असतांना १४ सूत्रसंचालकांना ते सामोरे जाऊ शकत नाहीत, हे या आघाडीसाठी लाजिरवाणेच आहे. १४ सूत्रसंचालकांकडून मांडल्‍या जाणार्‍या वृत्तांना ‘आपण धुतल्‍या तांदुळासारखे’ अशा मानसिकतेत वावरणारे २९ पक्षांतील मान्‍यवर, मातब्‍बर नेते यांनी परखडपणे विरोध करावा किंवा प्रतिवाद करावा; पण तेही त्‍यांना जमत नाही; कारण स्‍वतःला अतीबुद्धीमान समजणार्‍या या मंडळींचा प्रत्‍यक्षात तितका अभ्‍यासच नाही. वैचारिकतेचे बळ नाही. या सर्वांना केवळ एकाच विषयावर बोलता येते, तो म्‍हणजे मोदीद्वेष, तेच ते आणि तेच ते ! असे असल्‍याने आतापर्यंतच्‍या अनेक चर्चासत्रांमध्‍ये संबंधित पक्षांतील सहभागी झालेले मान्‍यवर आणि नेते यांनी आरोपांवर केलेला प्रतिवाद तत्त्वहीन आणि अभ्‍यासहीन असतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍या समवेत केलेल्‍या चर्चा फोल किंवा निष्‍फळ ठरतात. थोडक्‍यात काय, तर सगळे एकाच माळेचे मणी आहेत. देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवलेल्‍या काँग्रेसला तर प्रदीर्घ अनुभव आहे; पण तरीही प्रतिवाद करता येत नसल्‍याने असा निर्णय घ्‍यावा लागतो, हे ‘इंडिया’ आघाडीचा नाकर्तेपणाच दर्शवते.

युद्धाआधीच पराभव !

‘आम्‍ही जड अंतःकरणाने हा निर्णय घेतला आहे. या सूत्रसंचालकांच्‍या विरोधात आम्‍ही नाही किंवा त्‍यांचा आम्‍हाला रागही नाही; पण आम्‍ही आमच्‍या देशावर यापेक्षा अधिक प्रेम करतो’, असेही काँग्रेसने सारवासारव करत म्‍हटले आहे. ‘काँग्रेसचे या देशावर किती प्रेम आहे’, हे जनता ओळखून आहे. प्रेमाचा आव आणून स्‍वतः निष्‍पाप असल्‍याचा आविर्भाव आणणार्‍या काँग्रेसला ‘१४ सूत्रसंचालकांकडून केली जाणारी टीका चांगलीच झोंबत आहे’, हे त्‍यांच्‍या निर्णयावरून दिसून येते. भाजपवरही अनेकांनी टीका केली, अजूनही होत आहे; पण त्‍याने अशा स्‍वरूपाचा निर्णय कधीच घेतला नाही. आतापर्यंतच्‍या सत्ताकाळात नरेंद्र मोदी यांच्‍यावर जितकी टीका आणि आरोप यांचा भडीमार झाला, तितका कुणावरही झाला नसेल. गोध्रा हत्‍याकांड झाल्‍यापासून तर वृत्तवाहिन्‍यांच्‍या सूत्रसंचालकांनीही त्‍यांच्‍यावर अनेकदा टीका केली. मोदी म्‍हणजे जणू काही टीकेचे लक्ष्य झाले होते; पण मोदींनी ना कुणाची तोंडे दाबली, ना कुणाच्‍या आरोपांचा प्रतिवाद करण्‍यात वेळ खर्ची घालवला ! त्‍यांनी स्‍वकर्तृत्‍वाने कार्याची उंची गाठली. त्‍यामुळे विरोधकांची तोंडे आपोआप बंद झाली. कालांतराने सूत्रसंचालकही नरमले. मोदींनी जे ‘दाखवून दिले’, ते या आघाडीला का जमू शकत नाही ? २९ जणांकडून एकमेकांना भरभक्‍कम पाठिंबा का दिला जात नाही ? याचा अर्थ ‘१४ सूत्रसंचालकांचाच बुलंद आवाज या २९ जणांना पुरून उरतो’, असे वाटल्‍यास नवल ते काय ? ‘आमची रणनीती’, ‘आम्‍ही लढू’ या सगळ्‍या घोषणा हवेतच विरून गेल्‍या कि काय ? आघाडीला युद्धाआधीच पराभवाच्‍या पायर्‍या चढाव्‍या लागल्‍या. जर १४ जणांना सामोरे जाता येत नसेल, तर २९ पक्षांनी मिळून स्‍थापन केलेली ‘इंडिया’ आघाडी १४० कोटींहून अधिक लोकसंख्‍या असणार्‍या भारत देशाचा डोलारा कसा सांभाळणार ?

सभ्‍यता, तारतम्‍य या गोष्‍टी इंडिया आघाडीमधील नेत्‍यांमध्‍येच आढळून येत नाही. काँग्रेसचे राहुल गांधी परदेशात जाऊन भारतविरोधी विधाने करतात. पत्रकार असो किंवा सूत्रसंचालक असो, कुणी वेगळ्‍या स्‍वरूपातील किंवा खोचक प्रश्‍न विचारला की, लगेचच यांचा पारा वर चढतो. भारतद्वेष्‍टे सहभागी झालेल्‍या आणि ताळतंत्रच नसलेल्‍या ‘इंडिया’ आघाडीने सत्तास्‍थापनेची स्‍वप्‍ने पहाणे हास्‍यास्‍पदच ठरेल ! आघाडीने कितीही जणांचे आवाज दडपण्‍यासाठी प्रयत्न केले, तरी सत्‍याचा सूर्य उगवणारच आहे, याची राष्‍ट्रप्रेमी जनतेला निश्‍चिती आहे.