वाघासह अन्‍य वन्‍यप्राण्‍यांच्‍या संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई – वाघ हा जैवविविधतेचा मानबिंदू असून सर्व प्राण्‍यांच्‍या संरक्षणाचे प्रतीक आहे. मागील काही वर्षांत झालेल्‍या प्रयत्नांमुळे राज्‍यातील वाघांची संख्‍या वाढली आहे. त्‍याचे संरक्षण आणि संवर्धन शास्‍त्रशुद्ध पद्धतीने करण्‍याचे काम चालू आहे.  केवळ वाघच नाही, तर अन्‍य वन्‍यजीव संवर्धनासाठीही राज्‍यशासन काम करत आहे. त्‍यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

१३ सप्‍टेंबर या दिवशी यशवंतराव चव्‍हाण सेंटर येथे वन विभागाच्‍या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या ‘वाघ’ या पुस्‍तकाचे प्रकाशन सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते. या वेळी सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, ‘‘देशातील उत्तम व्‍याघ्र प्रकल्‍पांपैकी ३ प्रकल्‍प महाराष्‍ट्रातील आहेत. देशातील अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत येथील वाघांची संख्‍या वाढली आहे. वाघांची संख्‍या वाढीच्‍या वेगात महाराष्‍ट्र प्रथम क्रमांकावर आहे. जगातील १९३ देशांपैकी १४ देशांत वाघ आढळतात. त्‍यापैकी ६५ टक्‍के वाघ महाराष्‍ट्रात आहेत. वाघ आणि अन्‍य प्राणी यांचा अधिवास सुरक्षित रहावा, यासाठी स्‍थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन प्रयत्न केले जात आहेत.’’