उत्‍सव विधायक हवेत !

दहीहंडी पथके आणि ‘त्‍यांनी मोठ्या उंचीच्‍या दहीहंड्या फोडणे’, हे काही शहरांमध्‍ये आता प्रतिवर्षी होत आहे. भगवान श्रीकृष्‍णाने केलेल्‍या बालक्रीडेचा प्रतिकात्‍मक विधी म्‍हणून दहीहंडी उत्‍सव साजरा करण्‍यात येतो. जन्‍माष्‍टमीच्‍या दिवशी श्रीकृष्‍णतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झालेले असते. दुसर्‍या दिवशी साजर्‍या केल्‍या जाणार्‍या दहीहंडीच्‍या उत्‍सवात या ‘श्रीकृष्‍णतत्त्वाचा अधिक लाभ व्‍हावा’, हा या सार्वजनिक उत्‍सवाचा उद्देश असतो. त्‍यामुळे ‘लहान उंचीवर हंडी बांधून समवेत श्रीकृष्‍ण आहे’, हा भाव ठेवून दहीहंडीचा उत्‍सव साजरा केला आणि तर त्‍यातील आध्‍यात्मिक स्‍तरावरील देवतेचे चैतन्‍य अनुभवायला येऊ शकते. सध्‍याच्‍या सार्वजनिक उत्‍सवांची स्‍थिती पहाता, कुणालाच हे धर्मशास्‍त्र ठाऊक नसल्‍यामुळे त्‍यात अपप्रकारांचे थैमान घातले गेले आहे. त्‍याही पुढे जाऊन त्‍याला ध्‍वनीप्रदूषणासह अनेक गोष्‍टींचे इतके विकृत स्‍वरूप आले आहे की, ‘नको ते उत्‍सव’, असे त्‍यामुळे काही जणांना वाटते.

उत्‍सवांचा संबंध विशिष्‍ट देवतेशी येतो. त्‍यामुळे उत्‍सवांचे पर्यायाने देवतांचे पावित्र्य राखणे आवश्‍यक आहे; मात्र अपवाद वगळता बर्‍याच दहीहंडी उत्‍सव मंडळांनी या उत्‍सवात स्‍पर्धा, ईर्ष्‍या, पैसे लावले जाणे, उंच दहीहंड्यांमुळे होणारे अपघात, जीवघेणा थरार, महिलांची दहीहंडी, वलयांकित व्‍यक्‍तींना बोलावणे, अश्‍लील गाणी आणि नृत्‍य अशा अपप्रकारांचा शिरकाव करून त्‍याला बाजारू अन् विकृत स्‍वरूप आणले आहे. १२ थरांपर्यंत मनोरे, लक्षावधींची पारितोषिके, चित्रपटतारकांचा वावर, कानठळ्‍या बसवणारे संगीत असे या उत्‍सवाला प्राप्‍त झालेले बीभत्‍स स्‍वरूप पालटण्‍याची आवश्‍यकता आहेे. दहीहंडी उत्‍सवातील श्रद्धा आणि भक्‍ती लोप पावून त्‍याची राजकीय स्‍पर्धा झाली आहे. ‘हा धार्मिक उत्‍सव आहे, स्‍पर्धेचा खेळ नाही’, हे कोण लक्षात घेणार ? हे सर्व अल्‍प म्‍हणून कि काय, या वर्षी ‘पुढारलेल्‍या’ पुण्‍यातील एका संस्‍थेने तृतीयपंथीयांच्‍या दहीहंडीचे आयोजन केले होते. संस्‍कृतीची जपणूक करण्‍यासाठी अशा उत्‍सवाला विधायक स्‍वरूप देण्‍याची आज नितांत आवश्‍यकता आहे. भजन, कीर्तन किंवा जनहिताशी निगडित विविध विषयांवरील चर्चासत्रे, पथनाट्ये, प्रदर्शन किंवा विविध मोहिमा राबवून तरुणाईच्‍या मनात या उत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व बिंबवायला हवे. धर्मशास्‍त्रानुसार दहीहंडी फोडून त्‍यातील प्रसाद ग्रहण करण्‍यात त्‍याचा आध्‍यात्मिक लाभ आहे. हा लाभ घेण्‍यासाठी दहीहंडी उत्‍सव मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे !

–  सौ. अपर्णा जगताप, पुणे