पाकच्या वाढत्या आतंकवादी कारवाया पहाता आता पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ची आवश्यकता !
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती कायमच अशांत रहावी, यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करतो. थेट भारताशी युद्ध करणे शक्य नसल्याने सातत्याने भाडोत्री आतंकवाद्यांच्या साहाय्याने तो भारतीय सैन्यावर आक्रमण करून हानी करण्याचा प्रयत्न करतो. ‘जी-२०’चे यश आणि भारताच्या यशस्वी चंद्रमोहिमेमुळे पाकचा जळफळाट होत आहे. काश्मीरमध्ये सतत अशांतता निर्माण करून जागतिक स्तरावर हे सूत्र चर्चेत ठेवण्याचा पाकचा प्रयत्न असतो. भारतीय सैन्य पाकचे षड्यंत्र हाणून पाडण्याचा सातत्याने प्रयत्न करते. ‘काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे अल्प झाली आहेत’, असे ज्या वेळी भारतीय जनतेला वाटते, त्या वेळी तेथे आतंकवादी कारवाया करून पाक ‘भारतीय जनतेच्या मनात आलेला हा विचार किती फोल आहे’, हे दाखवून देतो. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत सैन्याचे एक कर्नल, एक मेजर, काश्मीर पोलिसांचे एक उपअधीक्षक यांना वीरगती प्राप्त झाली आहे. यापूर्वीही जे आतंकवादी पकडले गेले किंवा मृत्यूमुखी पडले, ते सर्व पाकपुरस्कृत विविध आतंकवादी संघटनांच्या आणि पाक सैन्याच्या संपर्कात असल्याचेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे काश्मीरमधील आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, तरी त्याला पाठबळ देणार्या ‘पाक’रूपी मुळावरच घाव घालण्याची नितांत आवश्यकता आहे. पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या, तरच काश्मीरमधील आतंकवादाच्या मुळावर घाव घातला जाणार आहे. पाकिस्तानच्या वाढत्या आतंकवादी कारवाया पहाता आता पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ची वेळ आली आहे. ‘पंतप्रधानांनी ते पाऊल लवकर उचलावे’, असे राष्ट्रप्रेमी नागरिकांना वाटते.