सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा  !

पंतप्रधान मोदी यांचा सनातन धर्म संपवू पाहणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात हिंदूंना आवाहन !

(‘घमंडिया’ म्हणजे गर्विष्ठ)

“घमंडिया” आघाडीला संघटित होऊन रोखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन !

सागर (मध्यप्रदेश) – भारतात काही असे पक्ष आहेत, जे देश आणि समाज यांच्यात फूट पाडण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत. त्यांनी एकत्र येऊन ‘आय.एन्.डी.आय.ए.’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स – इंडिया) नावाने एक आघाडी बनवली आहे. या आघाडीला काही जण ‘घमंडिया’ (गर्विष्ठ) आघाडी म्हणतात. यांना नेता नाही, नेतृत्वावर अद्याप एकमत नाही; मात्र त्यांच्या मुंबईतील बैठकीत त्यांनी ‘त्यांची घमंडिया आघाडी कशी काम करणार ?’, याची रणनीती बनवली. यात एक गुप्त धोरण ठरवण्यात आले. भारताच्या संस्कृतीवर आक्रमण करणे, हे त्यांचे धोरण आहे. सनातन धर्म संपवण्याचे त्यांचे धोरण आहे. ते सनातनला नष्ट करून देशाला पुन्हा १ सहस्र वर्षांच्या गुलामगिरीमध्ये ढकलू इच्छित आहेत; मात्र आपल्याला संघटित होऊन त्यांना रोखायचे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्‍या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला.

त्यांनी बीना तेलशुद्धीकरण या ५० सहस्र कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाची पायाभरणी केली. येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकलखाटी गावात आयोजित सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी सनातन धर्माविषयी मांडलेली सूत्रे – 

१. या घमंडिया आघाडीचा उद्देश भारतीय श्रद्धांवर आघात करणे, हा आहे. भारत ज्या विचार आणि संस्कार यांनी सहस्रो वर्षे जोडला गेलेला आहे त्याला नष्ट करण्याचा या घमंडिया आघाडीचा हेतू आहे. घमंडिया आघाडीवाले सनातन संस्कार आणि परंपरा यांना नष्ट करण्याचा संकल्प करून आले आहेत. ज्या सनातन धर्माला म. गांधी यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत मानले, ज्या सनातनने गांधी यांना अस्पृश्यतेच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रेरित केले, त्या सनातन परंपरेला घमंडिया आघाडी नष्ट करू पहात आहे.

२. घमंडिया आघाडीचे लोक स्वामी विवाकेनंद आणि लोकमान्य टिळक यांना ज्या सनातन धर्माने प्रेरणा दिली, त्याला नष्ट करू पहात आहेत.

३. आज घमंडिया आघाडीतील लोकांनी उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्‍यांमध्ये असणार्‍या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्‍यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

४. ज्या सनातनमुळे प्रेरित होऊन देवी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात सामाजिक कार्य केले, देशाच्या श्रद्धांचे रक्षण केले, त्या सनातन परंपरेला घमंडिया आघाडी नष्ट करण्याचा संकल्प करून आली आहे.

५. सनातनच्या शक्तीमुळेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना म्हटले होते की, ‘मेरी झांसी नहीं दूंगी।’

६. ज्यांना आयुष्यभर भगवान श्रीरामाने प्रेरणा दिली, त्या म. गांधींनी शेवटचा शब्द ‘राम’, असा उच्चारला होता. अशा सनातन परंपरेला घमंडिया आघाडी नष्ट करू इच्छित आहे.

७. स्वातंत्र्याच्या आंदोलनात फासावर जाणार्‍या विरांनी ‘पुढचा जन्म भारतामातेच्या पोटी होऊ दे’, अशी इच्छा व्यक्त केली होती. जी सनातन संस्कृती संत रविदास यांचे प्रतिबिंब आहे, जी सनातन संस्कृती माता शबरी यांची ओळख आहे, जी सनातन संस्कृती महर्षि वाल्मीकि यांचा आधार आहे, ज्या सनातनने सहस्रो वर्षे भारताला एकत्र ठेवले आहे त्या सनातनला घमंडिया आघाडी खंडित करून इच्छित आहेत.