स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही पुणे येथील देवळे गाव रस्‍त्‍यासारख्‍या मूलभूत सुविधेपासून वंचित !

(प्रतिकात्मक चित्र)

ओझर (जिल्‍हा पुणे) – जुन्‍नर तालुक्‍याच्‍या पश्‍चिम भागातील देवळे गावच्‍या दरेवाडीत जायला रस्‍ताच नाही. निवडणुका घोषित झाल्‍या की, सगळे नेते सांगतात की, निवडून आल्‍यावर रस्‍ता करू आणि मोटारीत बसून इकडे येऊ; परंतु अद्याप कुणीच हा प्रश्‍न मार्गी लावला नाही. (केवळ पोकळ आश्‍वासने देणार्‍या नेत्‍यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. जनतेला दिलेली आश्‍वासने न पाळणार्‍यांना मते द्यायला नको, असा विचार जनतेच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ? – संपादक) पावसाळ्‍यात तर लोकांचे पुष्‍कळ हाल होत असून गावाच्‍या बाजूला असलेल्‍या ओढ्याच्‍या पाण्‍यातून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. एखादी वयस्‍कर व्‍यक्‍ती अथवा मुलगा जर पाण्‍यात पडला आणि काही दुर्घटना घडली, तर याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

प्रशासनाने याकडे लक्ष देण्‍याची आवश्‍यकता असून आमदार अतुल बेनके यांनी रस्‍त्‍याचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी केली. माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य देवराम लांडे यांनी सांगितले की, तत्‍कालीन आमदार वल्लभ बेनके यांनी २ वेळा या रस्‍त्‍यासाठी निधी संमत केला होता; परंतु स्‍थानिक लोकांनी रस्‍त्‍यासाठी जागा न दिल्‍याने रस्‍ता होऊ शकला नाही.

संपादकीय भूमिका

अशी स्‍थिती असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !