गौरीच्‍या मूर्तीचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने दुकानदार-व्‍यावसायिक यांचे प्रबोधन !

प्रतिकात्मक चित्र

कोल्‍हापूर – सर्वत्र गणेशोत्‍सव, गौरी आगमनाचा उत्‍साह दिसून येत आहे. गणेशोत्‍सव हा महाराष्‍ट्रातील भाविकांसाठी जिव्‍हाळ्‍याचा विषय आहे. श्री गणेशाची मूर्ती असो वा गौरीची मूर्ती त्‍याप्रती भाविकांची आस्‍था-श्रद्धा असते आणि ती धर्मशास्‍त्रानुसार असावी, असेही भाविकांना वाटते. असे असतांना शहरातील काही दुकानांमध्‍ये विक्रीसाठी असलेल्‍या गौरीच्‍या मूर्ती या पूर्ण वस्‍त्रात नाहीत किंवा त्‍यांच्‍या अंगावर पूर्ण वस्‍त्रांचे रंगही नाहीत. गौरीच्‍या मूर्तीकडे भाविक देवत्‍वाच्‍या दृष्‍टीनेच पहात असल्‍याने अशा मूर्तींमुळे भाविकांच्‍या भावनांचा अवमान होत आहे. तरी या दुकानदार-व्‍यावसायिक यांच्‍याकडे असलेल्‍या गौरीच्‍या या मूर्ती पूर्ण वस्‍त्रानिशी झाकलेल्‍या असाव्‍यात किंवा अंगावर साडीनिशी त्‍या रंगवलेल्‍या असाव्‍यात जेणेकरून त्‍यांचा होणारा अवमान टाळला जाईल, असे प्रबोधन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने व्‍यावसायिक, दुकानदार यांचे प्रत्‍यक्ष भेटून करण्‍यात आले. यावर दुकानदारांनी सकारात्‍मक प्रतिसाद देत योग्‍य ती दक्षता घेण्‍याचे आश्‍वासन दिले आणि काहींनी तात्‍काळ कृतीही केली.

कोणत्‍याही देवतेच्‍या मूर्ती बनवतांना, विक्रीसाठी उपलब्‍ध करून देतांना कळत, नकळत त्‍याचा आपल्‍याकडून अवमान होत नाही, याची दक्षता घेणे अत्‍यावश्‍यक असते. आपणही हिंदु असल्‍याने आपण भाविकांच्‍या भावना समजून घेऊन त्‍यावर योग्‍य ती कृती तात्‍काळ कराल, अशी आम्‍हाला आशा आहे, असेही या दुकानदारांना समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्‍वामी आणि श्री. रवि पाटील उपस्‍थित होते.