मुलांमध्ये अल्कोहोल सेवनापेक्षाही अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण अधिक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहरातील मुला-मुलींच्या हातामध्ये सतत भ्रमणभाष आणि इंटरनेट आल्यामुळे त्यांच्यात ‘डिजिटल ॲडिक्शन’ (‘डिजिटल’ उपकरणे आणि तंत्रज्ञान यांच्या आहारी जाणे) वाढत आहे. मुलांमध्ये अल्कोहोलपेक्षाही अमली पदार्थांसमवेत ओडोमॉस, विक्स, आयोडेक्स, व्हाइटनर या पदार्थांची नशा केली जात असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ‘ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट’ आणि ‘ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या ‘संयम’ प्रकल्पाच्या माध्यमातून २२ सहस्र विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली. शहरातील १३ ते १६ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींमध्ये व्यसन परावृत्ती विषयी जागृती करण्याच्या हेतूने संयम प्रकल्प राबवला जातो. मुलांच्या हातामध्ये भ्रमणभाष आणि इंटरनेट आल्यामुळे मुला-मुलींमध्ये ‘डिजिटल ॲडिक्शन’ वाढत आहे. त्यांना इंटरनेट आणि भ्रमणभाषपासून लांब रहाणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे, असे ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेच्या विश्वस्त डॉ. अनघा लवळेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


वणी (यवतमाळ) येथील शाळकरी मुले गेली गांजाच्या आहारी !

गांजा ओढण्यासाठी शाळेत अनुपस्थित !

वणी (यवतमाळ), १० सप्टेंबर (वार्ता.) – तेलंगाणा राज्यातून येथे गांजाची तस्करी होते. येथील मुलांना गांजा पुरवला जातो. तो पुरवणार्‍या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेली मुले व्यसनपूर्तीसाठी चोर्‍या आणि गुन्हेगारी यांकडे वळत आहेत. शाळेच्या वर्गांना अनुपस्थित राहून गांजा ओढण्यासाठी झुडुपांमध्ये किंवा निर्जन ठिकाणी मुलांचे टोळके गांजा ओढत असल्याचे दिसतात; पण याविषयी त्यांचे पालक अनभिज्ञ आहेत. (नवीन पिढीला व्यसनाधीन करण्यामागे काही षड्यंत्र आहे का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कोणत्याही गोष्टीचा अतीवापर घातक आहे, हे दर्शवणारे उदाहरण ! यातून विज्ञानाची प्रगती लाभदायक कि घातक ?

लहान वयामध्येच मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणे, हे समाज आणि देश यांच्यासाठी घातकच !

मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होतील आणि त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल. त्यामुळे ते केवळ भ्रमणभाषचा वापर करण्याऐवजी मैदानी खेळ खेळण्याकडेही लक्ष देतील, हे नक्की !

तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी शिक्षक आणि पालक यांनीही त्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन त्यांचे प्रबोधन करावे !