मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर

सिंधुदुर्गनगरी – राष्ट्रीय महामार्गातील त्रुटींविषयी मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या चेतावणीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. ‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे श्री. प्रसाद गावडे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खारेपाटण ते बांदा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत असणार्‍या त्रुटींकडे मनसेने लक्ष वेधून आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता शिवनिवार (खारेपाटण), प्रभारी उपअभियंता साळुंखे (सावंतवाडी), जिल्हा वाहतूक विभागाचे प्रतिनिधी आणि महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदार आस्थापनाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

(सौजन्य : Maharashtra Live News)

या वेळी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महामार्गावर वारंवार होणार्‍या अपघातांविषयी खडसावले, तसेच रस्ता सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचनांची कार्यवाही का केली जात नाही ? महामार्गावर वाहनाची वेगमर्यादा दर्शवणारे फलक का लावले नाहीत ? धोकादायक वळणांवर ‘रिफ्लेक्टर’ का बसवले नाहीत ? संपूर्ण महामार्गावर रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा यांचे ‘हेल्पलाईन’ संपर्क क्रमांकांचे फलक का लावले गेले नाहीत ? या प्रश्नांसह अन्य समस्या मांडल्या.

या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी ‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी वेगमर्यादेचे फलक खारेपाटण ते बांदा या दरम्यान लावण्यात येतील. धोकादायक वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्रात ‘रिफ्लेक्टर’ बसवण्यात येतील. संपूर्ण महामार्गावर रुग्णवाहिका वा इतर अत्यावश्यक सेवेसाठीचे फलक लावले जातील. यासह अन्य उपाययोजना ४ – ५ दिवसांत करू’, अशी ग्वाही दिली.

गणेशभक्तांची लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण ठेवण्याची मागणी

श्री गणेशचतुर्थीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सवाले गणेशभक्तांची अधिक भाडे आकारून लूट करतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा मनसे स्वत:च्या परीने उपाययोजना करेल, अशी चेतावणी या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिली. या वेळी ‘खासगी ट्रॅव्हल्स चालवणार्‍यांना लेखी स्वरूपात सक्त ताकीद दिली आहे’, असे परिवहन अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.