अमेरिकी प्रसारमाध्यमांकडून भारताची प्रशंसा !

वॉशिंग्टन – भारतातील ‘जी २०’ परिषदेच्या वृत्ताला जगभरातील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. परिषदेत कूटनीतीचा वापर करून सूत्रे हाताळणार्‍या भारताची अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे. ‘रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘जी २०’ परिषदेमध्ये संयुक्त घोषणापत्र काढून त्यात सहभागी असलेल्या सर्व देशांची सहमती घेणे, ही आव्हानात्मक गोष्ट होती; मात्र भारताने कूटनीतीचा वापर करून ही गोष्ट साध्य करून दाखवली’, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. असे असले, तरी रशिया-युक्रेन युद्धाला रशियाला उत्तरदायी न ठरवल्यावरून अमेरिकी प्रसारमाध्यमांनी अप्रसन्नता दर्शवली. कर्जामुळे गरीब देशांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी जागतिक बँकेच्या काही कार्यपद्धतींमध्ये सुधारणा आणण्याविषयी ‘जी २०’मध्ये सहमती दर्शवण्यात आली, तसेच आफ्रिकी देशांच्या महासंघाला ‘जी २०’मध्ये सहभागी करून घेतले. याविषयीही अमेरिकी प्रसारमाध्यमांनी भारताचे कौतुक केले आहे.