नात्यांतील दुरावा… !

सौ. रूपाली वर्तक

सध्या वर्तमानपत्रांमध्ये गुप्तहेर (डिटेक्टिव्ह) उपलब्ध असल्याची विज्ञापने अधिक प्रमाणात येऊ लागली आहेत. हे गुप्तहेर कुणी मोठे गुन्हेगार किंवा चोर-दरोडेखोर यांना पकडण्यासाठी नसून ‘कुटुंबियांवर लक्ष’ ठेवण्यासाठी आहेत. विदेशात ही पद्धत आहे; पण भारतात ही चित्रपटात आढळणारी गोष्ट नसून ती पद्धत रूढ होत आहे, असे या विज्ञापनांवरून लक्षात येते. एका विज्ञापनामध्ये ‘पती, पत्नी किंवा मुले यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेर उपलब्ध होतील’ असे म्हटले होते. कुटुंबसंस्थेचा पाया असणार्‍या भारतात ही वेळ आली आहे, हे एक कटू सत्य आहे. एकेकाळची एकत्र कुटुंबपद्धत आता चौकोनी झाली आणि त्या चौकोनातही एकमेकांवरचा विश्‍वास उडाला आहे. ‘विश्‍वास पानिपतात गेला’, असे म्हणण्याची पद्धत झाली आहे; पण खरोखरच काळानुसार इतकी एकलकोंडी, संकुचित आणि स्वार्थी मनोवृत्ती वाढत गेली आहे की, कुटुंबात मोकळेपणाने बोलणे, एकमेकांसाठी त्याग करणे या गोष्टी हरवत चालल्या आहेत. अर्थात् घरातील मोठी माणसे याला अधिक कारणीभूत आहेत; कारण पैशाच्या पाठीमागे लागण्यात ‘आपण  कुटुंबापासून दुरावलो आहोत’, हे कित्येकदा त्यांना लक्षातही येत नाही आणि ते लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पती-पत्नीच्याच काय; पण प्रत्येकच नात्यात ‘विश्‍वास’ हाच मुख्य धागा असतो. सध्या भारतात विवाहबाह्य संबंध ही इतकी सामान्य गोष्ट होत चालली आहे की, जोडीदारावर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर नेमण्याच्या घटना घडत आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीत एक प्रकारचा धाक असायचा. घरातील कुठलाही सदस्य अयोग्य गोष्ट करतांना अनेकदा विचार करायचा. सध्या दोघेही मिळवते असल्यामुळे दोघे स्वतंत्र व्यवहार करतात. ‘स्वतंत्र व्यवहाराचे स्वातंत्र्य घेण्याच्या नावाखाली आपण एकमेकांवरचा विश्‍वास गमावत आहोत’, ते त्यांच्या लक्षात येत नाही. ना मुले पालकांशी मोकळेपणाने बोलू शकतात, ना पालक मुलांशी. अशी मुले मग अनेकदा भ्रमणभाष, अमली पदार्थ, व्यसने यांच्या आहारी गेलेली असतात. मुलांवर संस्कार करणे तर दूरच; पण लहानपणापासून मुलांमध्ये पालकांविषयी जो विश्‍वास, प्रेम, आधार आणि आदर आवश्यक असतो, तोही ते करू शकलेले नसतात. नात्यातील हा दुरावा सहन न झालेले मग ‘डिटेक्टिव्ह नेमणे आहे’, या विज्ञापनांचे ग्राहक बनतात !

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.