निर्णय स्‍तुत्‍य पण… !

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करण्‍याचा निर्णय !

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करण्‍याचा, तसेच मुलांना कोणतेही शासकीय लाभ किंवा प्रमाणपत्रे न देण्‍याचा निर्णय सोलापूर जिल्‍ह्यातील संत दामाजीनगर ग्रामपंचायत आणि सातारा जिल्‍ह्यातील मसूर ग्रामपंचायत यांनी घेतला आहे. अशा मुलांना ग्रामपंचायतीच्‍या वतीने देण्‍यात येणार्‍या सर्व सुविधाही बंद करण्‍यात येणार आहेत. मसूर ग्रामपंचायतीने ‘नावामध्‍ये स्‍वतःचे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनाव असे क्रमशः लावावे’, असा धोरणात्‍मक निर्णयही घेतला आहे ! याचे समाजातील सर्वच स्‍तरांतून स्‍वागत होत आहे.

उच्‍चशिक्षण आणि पैसे यांच्‍या लोभापोटी भारतातील बहुतांश मुले विदेशात जात आहेत किंवा काही मुले ग्रामीण भागातून शहरी भागात येत आहेत, याचाच परिणाम म्‍हणून वयस्‍कर गावात वा शहरात आई-वडील एकटे किंवा वृद्धाश्रमात रहात आहेत. काही ठिकाणी सूनांचे पटत नसल्‍यामुळे आई-वडिलांना एकटे रहावे लागत आहे. वयस्‍कर झाल्‍यानंतर त्‍यांच्‍यासमवेत मुले, नातवंडे असावीत, असे सर्वच आई-वडिलांना वाटते. आजी-आजोबा घरात असतील, तर घराला घरपण असते, लहान मुलांवर आपसूकच योग्‍य संस्‍कार होतात. वयाची किमान ५० ते ६० वर्षे जीवन जगून आलेला अनुभव आजी-आजोबांच्या पाठीशी असतो. त्‍यामुळे योग्‍य-अयोग्‍य याची जाण त्‍यांना अधिक असते. ही जाण स्‍वानुभवातून आलेली असल्‍यामुळे त्‍यामध्‍ये शंका नसते. असे असतांनाही सध्‍या बहुतांश लहान मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळत नाही आणि आजी-आजोबांनाही नातवडांचे प्रेम मिळत नाही. काही ठिकाणी आई-वडील घरात नकोसे होतात आणि वृद्धापकाळात त्‍यांचे दायित्‍व न घेता मुले त्‍यांना वार्‍यावर सोडून देतात.

‘ही समस्‍या गंभीर आहे’, हे लक्षात घेऊन सोलापूर आणि सातारा येथील ग्रामपंचायतींनी घेतलेला निर्णय नक्‍कीच कौतुकास्‍पद आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्‍या शिक्षेमुळे तरुणाईला ‘आपण चुकीचे वागत आहोत’, याची जाणीव होऊ शकते. महान हिंदु संस्‍कृती असलेल्‍या भारतामध्‍ये तरुणाईवर ‘माता-पित्‍यांचे दायित्‍व घेण्‍याचा संस्‍कार नसणे’, हे दुर्दैवी आहे. भारतामध्‍ये कुटुंबव्‍यवस्‍था ढासळत चालली आहे. आनंद, समाधान, संस्‍कार आणि संरक्षण हे कुटुंबव्‍यवस्‍थेचे लाभ पैशांमध्‍ये मोजता येणार नाहीत. हे सर्व आजच्‍या तरुणाईला समजण्‍यासाठी त्‍यांनाही बालपणापासून माता-पित्‍यांनीच धर्मशिक्षण द्यायला हवे !

– वैद्या (सुश्री) माया पाटील, देवद, पनवेल.