आज ‘गोपाळकाला’ आहे. त्या निमित्ताने…
महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाचे मूळ कोकणातील आहे, हे खरे आहे; पण त्याचे निश्चित मूळ, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील बाणकोट भाग, दापोली भाग, मंडणगड, खेड तालुक्यातील, तसेच त्या जवळच्या सध्याच्या रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागातील (महाड, आंबेत, श्रीवर्धन) बाळये, कुणबी आदी लोकांमधून आले आहे, असे वाटते. या लोकांना ‘कृष्ण बाळ’ यावरूनच ‘बाळा’, ‘बाळ्या’, असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश ‘बाल्या’ असा झाला. हे बाणकोटी लोक ‘ळ’चा उच्चार ‘ल’ असा करतात. दक्षिण मुंबईत हे बाल्या लोक नोकरी, काम यानिमित्ताने गेल्या १५० वर्षांत स्थायिक झाले आहेत. हे लोक त्या काळी छोट्या प्रमाणावर दहीहंडी साजरी करत. पुढे यांच्या छोट्या दहीहंडीचे रूपांतर मोठ्या दहीहंडीत, म्हणजे अधिकाधिक ४-५ थरांत, अगदी क्वचित्च ६ थरात होऊ लागले. याला कारण माझगाव, घोडपदेव, लालबाग-परळ-लोअर परळ-वरळी आदी गिरणगाव भागातील व्यायामशाळा, क्रीडापथक, कबड्डीपथके वगैरे. हळूहळू पुढे इतर समाजातील लोक समाविष्ट झाले आणि हा साहसी दहीहंडीचा खेळ बर्यापैकी जोर धरू लागला. अशा प्रकारे समाजातील विविध स्तरांतील, जातींतील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरे करू लागले. हळूहळू यात इतर धर्मीय, प्रांतीय लोकसुद्धा सहभागी होऊ लागले.
१. दहीहंडी उत्सवाचे पालटत चाललेले स्वरूप
१९७०-१९८० या दोन दशकांत साधारणत: सकाळी ९ वाजल्यापासून दहीहंडी उत्सवाला प्रारंभ व्हायचा. रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये २ इमारतींच्या दुसर्या किंवा तिसर्या मजल्यांपर्यंत दहीहंड्या बांधलेल्या असायच्या. तेव्हा हा दहीहंडीचा खेळ दुपारपर्यंत म्हणजे ३-४ वाजेपर्यंत असायचा. अगदी उशीर, म्हणजे क्वचित्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालायचा. त्या काळी आजच्यासारखे रात्रीच्या प्रकाशझोतात तर खेळ चालत नसत. स्थानिक पोलिसांना आजच्यासारखा त्रासही नसायचा. वर्ष १९९० नंतर ठाण्यात मोठ्या रकमांच्या हंड्या चालू झाल्या, आपापसांत स्पर्धा चालू झाली आणि पुढे त्याचे अनुकरण चालू झाले. दुपारपर्यंत संपणारा हा उत्सव आता रात्री ११ पर्यंत डीजेच्या आवाजात, गोंगाटात, अभिनेते-अभिनेत्रींची उपस्थिती, ऑर्केस्ट्रा कार्यक्रम असा होऊ लागला.
२. दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने ‘साहसी खेळ’ घोषित केले; पण नियमांचे काय ?
पुढे थरांची स्पर्धा चालू झाली. हंड्यांचे ६-७ थर साधी गोष्ट ठरू लागली. न्यूनतम ८-९ थर, ४० फूट, ५० फूट उंच दहीहंडी अशी जीवघेणी स्पर्धा चालू झाली. यात बरेच गोविंदा (लहान वा मोठी मुले) घायाळ होऊ लागले, काही मेले, काही कायमस्वरूपी अपंग झाले; पण कुणालाही याचे काही दुःख किंवा काळजी नाही. पुढे हा उत्सव साहसी खेळ होऊ लागला. आपण प्रेक्षक म्हणून आनंदाने टाळ्या पिटतो; पण त्या घायाळ गोविंदांचे पुढे काय होते कुणास ठाऊक?
साधारणतः ३-४ वर्षांपूर्वी दहीहंडी सण राज्य सरकारने ‘साहसी खेळ’ म्हणून घोषित केला; पण इतर खेळांसारखे याचे नियम काय ? याची घटना काय ? यामध्ये भाग घेणार्या खेळाडूंचे म्हणजे गोविंदांच्या आरोग्याचे काय ? याविषयी निश्चित नियमावली काय ? याविषयी सरकार, आयोजक, मंडळे, समन्वय समिती कुणीही निश्चितपणे मांडायला वा बोलायला सिद्ध नाही; कारण क्रीडाविश्वात कोणताही खेळ म्हटला की, त्याला नियम हे लागू होतातच.
३. सध्याच्या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचा अवमान होणे
आजकाल दहीहंडी गोविंदोत्सावात प्रत्यक्ष दहीहंडी फोडली जात नाही; कारण एकदा ती हंडी फोडली की, परत बांधणार कोण ? केवळ आयोजक आणि त्या प्रमुख पाहुणे, राजकीय नेते यांना उंचच उंच थर रचून सलामी दिली जाते. माझे तर मत आहे की, उत्सवाच्या नावाखाली प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा अवमान केला जात आहे. हे त्या आयोजकांच्या लक्षात येत नाही कि हिंदु धर्मप्रेमींच्या लक्षात येत नाही ? यामुळे सध्याच्या दहीहंडी उत्सवातून आत्माच हरवला आहे कि काय ? असे वाटते.
४. दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी…
सध्या दहीहंडीसाठी कुठेही रस्त्यावर जागा अडवून आणि ऐन पावसाळ्यात खड्डे खणून कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्याची, प्रेक्षकांसाठी कार्यक्रम बघण्याची व्यवस्था करणे आणि यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे, हे महानगरपालिका, पोलीस, वाहतूक व्यवस्थापन आणि सरकार यांच्यासाठी जिकीरीचे झाले आहे. त्याऐवजी शहरातील विविध विभागांतील मोकळ्या मैदानात, पटांगणात व्यवस्थित आयोजन केले, तर बर्याच यंत्रणा आणि नागरिक यांचा त्रास न्यून होईल आणि सर्वसामान्य लोकांना आनंदाने या उत्सवात सहभागी होता येईल.
५. …ही जीवघेणी परंपरा कुणी चालू केली ?
दहीहंडी उत्सव हा हिंदु संस्कृती, परंपरा, भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून साजरा करतात. भगवान श्रीकृष्ण त्याकाळी, म्हणजे ५ सहस्र वर्षांपूर्वी गोकुळात वरच्या भागात बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही इतर बालगोपाळ मित्रांच्या साहाय्याने थर लावून खायचे, ते मटक्यातील दही मित्रांना वाटायचे. ‘गोकुळातील दूध, दही हे गोकुळातच राहिले पाहिजे, ते मथुरेला फुकट जाता कामा नये’, हा त्यांचा त्या काळातील त्यांच्या वयाच्या मानाने क्रांतीकारक विचार होता. त्या काळी ते मटके आणि दही ४० ते ५० फूट उंचीवर ठेवलेले नसायचे, तर पाळीव प्राणी किंवा माणसाने चोरून खाऊ नये; म्हणून अधिकाधिक ८ ते १० फूट उंचीवर ठेवलेले असायचे. मग या आधुनिक युगातील आयोजकांना असा प्रश्न विचारावासा वाटतो की, जर ही परंपरा आहे, तर मग ही ४० ते ५० फुटांवर दहीहंडी बांधण्याची जीवघेणी परंपरा कुणी चालू केली ?
माझ्यासाठी प्रेक्षक म्हणून म्हणायचे असेल, तर गेली काही वर्षे मी हा दहीहंडी उत्सव किंवा इतर कोणतेही सार्वजनिक उत्सव वृत्तवाहिन्यांवर वा प्रत्यक्ष बघणे, साजरे करणे बंद केले आहे.
– श्री. ज्ञानेश परब (साभार : फेसबुक)
संपादकीय भूमिकादहीहंडी उत्सवाचे सध्याचे स्वरूप बघता त्याचे मूळ स्वरूप परत आणण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हवे ! |