कातरवेळी, यमुनातिरी ।
घागर भरूनी, चालली माघारी ॥
राधा उभी वाटेवरी ।
अधीरतेने शोधे श्रीहरि ॥ १ ॥
ती श्रीकृष्णाचे नित्य स्मरण करी ।
तोच वसे तिच्या अंतरी ॥
त्याची भक्ती तिला व्याकुळ करी ।
म्हणे, श्रीहरि, वाट पाहू तरी कुठवरी ॥ २ ॥
भक्तीचे रेशमी बंध जपले उरी ।
माझा देह झिजू दे चंदनापरी ॥
मन आतुरले ऐकण्या बासरी ।
श्रीहरि, दर्शन दे ना आता तरी ॥ ३ ॥
गोधन सोडून यमुनातिरी ।
वृक्षाखाली उभा श्रीहरि ॥
राधा वाट पाही पैलतिरी ।
असा हा मयूरेश्वर सखा हरि ॥ ४ ॥
भावभक्तीचा भुकेला श्रीहरि ।
म्हणूनी वसे राधेच्या अंतरी ॥
भक्ताच्या भेटीची आस अंतरी ।
म्हणूनी भक्तांवर चैतन्याचा वर्षाव करी ॥ ५ ॥
कृष्णभेटीची आस अंतरी ।
राधेस घेऊन आली यमुनातिरी ॥
कृष्णनामाची अमृतमय माधुरी ।
जडली राधेच्या जिभेवरी ॥ ६ ॥
गोड तुझे रूप साठवूनी अंतरी ।
डोळां भरूनी पाहिला श्रीहरि ॥
आता मजला जाऊ दे घरी ।
उद्या येईन मी पुन्हा माघारी ॥ ७ ॥
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)