१. श्रीकृष्णाशी संबंधित २ प्रमाणभूत ग्रंथांत ‘राधा’ या नावाचा उल्लेख नसणे
श्रीकृष्णाचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन अलौकिक, अद़्भुत अन् आदर्श होते. श्रीकृष्णाच्या चरित्रात ‘श्रीकृष्ण-राधा’ ही कथा अतिशय विकृत स्वरूपात मांडून श्रीकृष्णाची मानहानी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही जणांनी ‘राधा श्रीकृष्णाची बहीण होती’, असे म्हटले आहे. काही जण सांगतात, ‘श्रीकृष्णाने राधेशी विवाह केला होता.’ काही जण सांगतात, ‘राधा विवाहित होती, तरी तिचा श्रीकृष्णाशी संबंध होता.’ काही जण दास्यभक्तीचे वर्णन करून श्रीकृष्णाची दास्यभक्ती करणारी राधा ‘सर्वोच्च’ स्थानावर विराजमान झाल्याचे सांगतात. जणांनी ‘राधा’ या शब्दाची फोड करतांना म्हटले, ‘रा’ म्हणजे ‘रास’, तर ‘धा’ म्हणजे ‘धावणे.’ याचा अर्थ ‘रासक्रीडेसाठी आमंत्रण मिळताच जी धावत जाते, तिला ‘राधा’ म्हणतात. अशा कथांमुळे सर्वसामान्य जनांच्या मनात ‘श्रीकृष्ण राधेविना अपूर्ण आहे’, असा समज निर्माण झाला.
‘हरिवंशपुराण’ हा श्रीकृष्णाचे जीवनचरित्र सांगणारा प्रमाणभूत ग्रंथ आहे. या ग्रंथात कुठेही ‘राधा’ नावाचा उल्लेख नाही. श्रीकृष्णाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचे दर्शन घडवणारा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ‘महाभारत’ ! या ग्रंथातसुद्धा कुठेही राधेचा उल्लेख आढळत नाही.
२. ‘राधा’ ही एक स्त्री नसून ‘राधा’ म्हणजे ‘भगवंताची शक्ती’ असणे
भगवंत ‘चेतना’ आहे, तर राधा ही ‘प्रकृती’ आहे. प्रकृती म्हणजेच शक्ती ! ती जगाला उत्पन्न करते. त्यामुळे जगावर प्रकृतीची सत्ता आहे, भगवंताची नाही. ज्याची सत्ता असते, त्याला सर्व जण प्रथम नमस्कार करतात; म्हणून प्रथम राधेचा आणि नंतर कृष्णाचा उल्लेख केला जातो. त्यामुळे ‘राधाकृष्ण’ असा शब्दप्रयोग प्रचलित झाला. कुणीही ‘कृष्णराधा’, असे म्हणत नाहीत.
काही पुराणांत राधेचा जो उल्लेख आढळतो, तो एक रूपक म्हणून करण्यात आला असावा. राधा ही उत्कट प्रेम-भक्तीचे प्रतीक (रूपक) मानण्यात आले. श्रीकृष्ण आणि राधा यांच्या रूपात प्रेम अन् भक्ती यांचा संगम झाला आहे. त्यासाठीच काही जाणकारांनी भगवंताच्या मुखी ‘माझ्या स्वरूपाचे अर्धे अंग राधा आहे’, असे विधान घातले आहे.
‘ब्रह्मवैवर्त’ पुराणात राधा-कृष्णाच्या विवाहाचे वर्णन करणारे काही श्लोक आपल्याला आढळतात. प्रेमभक्तीचा महिमा वाढवण्यासाठी पुराणकारांनी राधेचे पात्र निर्माण केले. राधा म्हणजे ‘ईश्वराची शक्ती’ असा अर्थ आपण घ्यायचा आहे. अर्थ आपण जाणून घेतला की, ‘राधा आणि कृष्ण यांचा परस्पर संबंध काय आहे ?’, ते आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे काही ठिकाणी राधा आणि कृष्ण यांच्या संबंधाचे जे विकृत वर्णन करण्यात आले आहे, त्याकडे सहज दुर्लक्ष करता येईल.
थोडक्यात ‘राधा’ हे कोणत्याही स्त्रीचे नाव नाही. राधा नावाची कोणतीही स्त्री कधीच अस्तित्वात नव्हती. भगवंत म्हणजे चेतना आणि राधा म्हणजे प्रकृती, म्हणजेच भगवंताची शक्ती ! प्रकृती आणि चेतना एकत्र आल्यावर सृष्टी आकारास येते. ही गोष्ट लोकांना कळावी; म्हणून ‘राधाकृष्ण’ हा संबंध रूपकाद्वारे सांगण्यात आला, हे आपण पक्के लक्षात ठेवावे. त्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
(श्री. दुर्गेश परुळकरलिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या लवकरच प्रकाशित होणार्या सनातनच्या ग्रंथातून)