पूर्णावतार भगवान श्रीकृष्‍णाची युद्धनीती !

आज ‘श्रीकृष्‍ण जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

‘भगवान श्रीकृष्‍णाने त्‍याच्‍या संपूर्ण जीवनाच्‍या कालावधीत वेगवेगळी युद्धनीती वापरली. या युद्धनीतीची माहिती देणारा लेख येथे देत आहोत.

महाभारत युद्धाच्‍या वेळी दुर्योधन आणि कर्ण यांच्‍याकडे असलेल्‍या विविध शक्‍ती अन् अस्‍त्र या सर्वांची पूर्ण कल्‍पना असल्‍याने भगवान श्रीकृष्‍णाने वेगळीच युद्धनीती आखली. कर्णाला २ शाप होते. एक म्‍हणजे ऐनवेळी ब्रह्मास्‍त्र विसरण्‍याचा आणि भूमीने रथचक्र गिळण्‍याचा दुसरा ! हे भगवान कृष्‍णाला ज्ञात होते. प्रथम कर्णास वासवी शक्‍ती (अजेय भाला) हीन करणे अत्‍यावश्‍यक होते. याखेरीज त्‍याचे मनोधैर्य खचवण्‍याचे कार्य हे त्‍याचे जन्‍मरहस्‍य सांगून करण्‍याचे आणि युद्धात त्‍याला परशुराम धनुष्‍य खाली ठेवण्‍यास लावून त्‍याचा वध करण्‍याचे. अशी ही युद्धनीती भगवान श्रीकृष्‍णाने आखली ३ स्‍तरांमध्‍ये – 

अ. प्रथम वासवी शक्‍ती हीन करणे.

आ. दुसरे त्‍याचे मानसिक खच्‍चीकरण करणे.

इ. तिसरे परशुराम धनुत्‍याग करण्‍यास लावून वध.

१. कर्णाला त्‍याच्‍याकडील वासवी शक्‍तीचा वापर करण्‍यास भाग पाडणे

दुर्योधनाचा अलायुध नावाचा असुर मित्र होता आणि तो त्‍याच्‍या साहाय्‍यास आला, तेव्‍हा दुर्योधनाने रात्रीही युद्ध चालूच ठेवण्‍याचे घोषित केले. नेहमीच्‍या नियमाप्रमाणे युद्ध प्रतिदिन सूर्यास्‍तास संपत असे. अलायुध हा असुर साहाय्‍याला आल्‍याने त्‍याने हा नियम मोडीत काढून युद्ध रात्रीसही चालू ठेवण्‍याचे ठरले आणि तशी घोषणा केली. असुर मायावी विद्येत प्रवीण असतात आणि रात्री त्‍यांचे सामर्थ्‍य कित्‍येक पट वाढते. त्‍यामुळे त्‍यांचा सामना करणे शक्‍य होत नाही. श्रीकृष्‍ण हे जाणून होता आणि या असुराशी लढा देऊन त्‍याचा नाश करायला तेवढीच मायावी शक्‍ती असलेला असुर हवा. त्‍या वेळी श्रीकृष्‍णाने भीमपुत्र घटोत्‍कचाला बोलावण्‍यास भीमाला सांगितले. त्‍याप्रमाणे भीमाने घटोत्‍कचाला साद घालताच तेथे तो प्रकट झाला. अलायुध आणि घटोत्‍कच यांच्‍या घनघोर मायावी युद्धात घटोत्‍कचाने अलायुधाचा वध केला अन् त्‍याच्‍या महापराक्रमाने कौरव सेनेचा महाविनाश होऊन ती पांडव सेनेएवढी झाली. दुर्योधन हतबल झाला. कर्णाचीही तीच गत झाली, तेव्‍हा दुर्योधनाने कर्णास वासवी शक्‍ती सोडण्‍यास सांगितले; पण कर्ण सिद्ध होईना, तेव्‍हा दुर्योधनाने निकराने ‘आम्‍ही सगळे संपल्‍यावर तुझे काय ?’, हा निर्वाणीचा आदेश दिला. तेव्‍हा कर्णाने वासवी शक्‍ती सोडून घटोत्‍कचाचा वध केला. त्‍या वेळी सर्व पांडव दुःखी झाले आणि भगवान श्रीकृष्‍णाने आनंद व्‍यक्‍त केला; कारण अर्जुनाचा धोका टळला अन् कर्णाजवळचे एकमेव राखीव अस्‍त्र नष्‍ट झाले. यामुळे कर्णाचे सामर्थ्‍य इतर सामान्‍य महारथींप्रमाणेच झाले. ही पहिली पायरी, म्‍हणजेच युद्धनीती यशस्‍वी झाली.

२. श्रीकृष्‍णाने कर्णाला कुंतीकडे जाण्‍यास सांगून त्‍याचे मनोधैर्य खच्‍चीकरण करणे

आता दुसरी खेळी, म्‍हणजेच युद्धनीती म्‍हणून कर्णाचे मनोधैर्य खच्‍चीकरणाची ! त्‍यासाठी श्रीकृष्‍णाने कुंतीला कर्णाकडे पाठवले त्‍याचे जन्‍मरहस्‍य सांगण्‍यास ! कुंतीने ते सांगितल्‍यावरही कर्ण दुर्योधनाचा पक्ष सोडण्‍यास सिद्ध झाला नाही. त्‍याने ‘केवळ अर्जुन सोडून तुझ्‍या ४ मुलांचा मी वध करणार नाही. मी आणि अर्जुन यांच्‍या युद्धात कुणीही १ गेला, तरी तुझे ५ पुत्र रहातील’, असे सांगितले; पण मनाने तो आतून खचला गेला, तरी त्‍याने ते उघड दाखवले नाही. ही दुसरी खेळीही यशस्‍वी झालीच.

३. शत्रूचा वार (आक्रमण) कसा विफल करायचा ? ही युद्धनीती शिकवणारा श्रीकृष्‍ण !

कर्ण आणि अर्जुन यांच्‍या युद्धात खांडववन जळाल्‍याने संतप्‍त झालेला ‘तक्षक’ नाग हा पांडवांचा हाडवैरी बनला होता अन् त्‍याला अर्जुनाला दंश करून मारायचे होते. त्‍या संधीची तो वाट पहात होता. तेव्‍हा त्‍याने कर्णाला स्‍वतःची व्‍यथा सांगून ‘मला तुझ्‍या बाणावर आरूढ होऊ दे आणि ते शस्‍त्र अर्जुनावर सोड. तेथे मी त्‍यास दंश करून मारीन अन् माझा सूड उगवून धन्‍य होईन.’ कर्णानेही त्‍यास संमती दिली; कारण ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या न्‍यायाने अन् तो वासवीशक्‍ती गमावून बसल्‍याने कर्णाने मान्‍य केले. त्‍याप्रमाणे त्‍याने तक्षकास बाणावर आरूढ केले आणि ते शस्‍त्र अर्जुनावर सोडले. महावेगाने ‘येणार्‍या शस्‍त्रावर तक्षक आरूढ आहे’, हे श्रीकृष्‍णाने तात्‍काळ ओळखले अन् ‘ते अर्जुनाच्‍या कंठाचा वेध घेणार आहे’, हे त्‍याच्‍या लक्षात आले. योग्‍य क्षणी श्रीकृष्‍णाने रथाच्‍या अश्‍वांवर भार देऊन रथ खाली झुकवला आणि तो बाण अर्जुनाच्‍या किरीटास (मुकुटाला) लागला अन् तक्षकाच्‍या विषाने किरीट दग्‍ध झाला आणि पडला. अर्जुन वाचला. तक्षक निराश होऊन परत कर्णाकडे जाऊन बाणावर पुन्‍हा आरूढ करण्‍यास विनवू लागला; पण ‘मी एकदाच एका अस्‍त्राचा प्रयोग करतो. त्‍याच अस्‍त्राचा प्रयोग परत परत करत नाही’, असे कर्णाने सांगितले.

येथे श्रीकृष्‍णाने ‘शत्रूचा वार कसा विफल करायचा ?’, ही युद्धनीती दाखवली. ही फार चाणाक्ष आणि उत्तम युद्धनीती प्रतिवार न करताही शत्रूचा वार निष्‍प्रभ करणारी !

४. कर्ण वधाच्‍या वेळी श्रीकृष्‍णाने वापरलेली युद्धनीती !

या कर्ण-अर्जुन यांच्‍या युद्धात श्रीकृष्‍णाने अर्जुनाचा रथ मुद्दाम अशा भूमीवरून नेला की, त्‍याच्‍या पाठलागात कर्णाचा रथ कमकुवत भूमीत खचून रुतला. ही अंतिम खेळी होती त्‍या त्रिसूत्री योजनेची ! चाक रुतल्‍याने कर्ण धनुष्‍य टाकून रथचक्र काढू लागला. त्‍याच वेळी श्रीकृष्‍णाने अर्जुनास बाण सोडून त्‍याचा वध करण्‍याचा आदेश दिला. ‘हा अधर्म आहे’, असे कर्ण उद़्‍गारताच भगवान श्रीकृष्‍णाने त्‍याच्‍या सर्व दुष्‍कृत्‍यांचा पाढा त्‍वरित सांगून ‘तेव्‍हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?’, असे सांगून निरुत्तर केले आणि त्‍याच क्षणी अर्जुनाने बाण सोडून त्‍यास मृत्‍यूमुखी नेले. कर्ण रथचक्र काढतांनाच अर्जुनाला बाण सोडण्‍याचा आदेश देण्‍याचे कारण असे की, ‘जर तो रथारुढ होऊन त्‍याने परशुराम धनुष्‍य हाती घेतले असते, तर त्‍याचा पराभव जगातील कोणताही धनुर्धर करू शकणार नाही, असा त्‍याला परशुरामांचा वर होता’, हे श्रीकृष्‍णास ठाऊक होते. कर्ण धारातिर्थी पडल्‍यावर केवळ त्‍याचाच अग्‍नीसंस्‍कार भगवान श्रीकृष्‍णाने केला; कारण त्‍याचे दानशूरत्‍व आणि वीरत्‍व हेही लक्षात घ्‍यायला हवे. ‘मरणान्‍ती वैराणी’ ही युद्धनीती येथे दाखवली.

५. शत्रूचे मृत्‍यूमर्मस्‍थान ओळखून त्‍याप्रमाणे युद्ध करायला लावणारा श्रीकृष्‍ण !

आता दुर्योधनाकडे केवळ अश्‍वत्‍थामा हा द्रोणपुत्रच एकमेव आणि अमरत्‍व वरदान लाभलेला महायोद्धा होता; पण त्‍या आधीच दुर्योधनाने पळ काढला अन् तो जलाशयात लपून बसला. सर्व कौरव आणि कौरव सेना नष्‍ट झालेलीच होती. दुर्योधनाविषयी प्रथम एक घटना सांगणे उचित आहे; कारण यातही श्रीकृष्‍णाचे दूरदर्शीत्‍व दिसून येते. गांधारी पतिव्रता होती आणि आयुष्‍यभर डोळ्‍यांवर पट्टी बांधून राहिली. तिने दुर्योधनास सांगितले की, संपूर्ण वस्‍त्रत्‍याग करून सर्वांग उघडा माझ्‍या पुढे ये आणि मी डोळ्‍यांवरची पट्टी काढून तुझ्‍या सर्वांगावर दृष्‍टी टाकताच तुझे सगळे शरीर वज्र (अभेद्य) होईल. भगवान श्रीकृष्‍णाने दुर्योधनाची मतिभेद करून ‘आईसमोर विवस्‍त्र जाणे उचित नव्‍हे; म्‍हणून कंबरेखाली पुष्‍पमालायुक्‍त पुष्‍पशेला गुडघ्‍यापर्यंत लांब असा घालून जावे’, असे सांगून जाण्‍यास भाग पाडले आणि नेमका तेवढाच भाग सोडून त्‍याचे बाकी शरीर वज्र झाले. द्रौैपदी वस्‍त्रहरणाच्‍या वेळेची भीमाची ‘दुर्योधनाच्‍या मांड्या मी गदाप्रहाराने फोडून टाकीन’, ही प्रतिज्ञा त्‍यामुळे साध्‍य होणार होती. अन्‍यथा दुर्योधन अजिंक्‍यच राहिला असता. गांधारीही समजून चुकली की, ही श्रीकृष्‍णनीतीच आहे.

जलाशयात लपलेल्‍या दुर्योधनास निर्भत्‍सना करून बाहेर येण्‍यास भाग पाडल्‍यावर त्‍याचे आणि भीमाचे गदा युद्ध चालू झाले. सर्व पांडव, श्रीकृष्‍ण, बलराम हे दुर्योधन अन् भीम यांचे गदायुद्ध पहाण्‍यास उपस्‍थित होते. भीमाने शर्थ केली; पण वज्रांगी दुर्योधन थांबेना. तेव्‍हा मांडीवर थाप मारून भीमास दुर्योधनाच्‍या जांघेवर गदाप्रहार करण्‍याविषयी श्रीकृष्‍णाने इशारा दिला (गदा युद्धात कमरेखाली वार करायचा नाही, हा नियम असतो). त्‍याप्रमाणे भीमाने वार करून त्‍याच्‍या दोन्‍ही मांड्या छिन्‍नविछिन्‍न केल्‍या आणि तो मरणदारी पडला. हाच भाग झाकलेल्‍या अवस्‍थेत दुर्योधन गेल्‍याने तो वज्रमय झाला नाही. नियमबाह्य युद्ध केल्‍याने बलराम संतापले आणि हल (नांगर) घेऊन भीमावर चालून जाणार होते. तेव्‍हा भगवान श्रीकृष्‍णाने त्‍यांना भीमप्रतिज्ञेची आठवण दिली आणि ‘हा अधर्म नाही’, असे सांगितले.

येथे ही युद्धनीती किती नियोजनबद्ध होती, हे लक्षात येते. याच भीमाचे जेव्‍हा जरासंधाशी मल्लयुद्ध झाले, तेव्‍हाही श्रीकृष्‍णांनी काडी उभी चिरून तिचे २ भाग परस्‍परविरोधी दिशेस टाकण्‍याचा संकेत दिला. त्‍याप्रमाणे भीमाने जरासंधास उभा चिरून केलेले २ भाग परस्‍परविरोधी दिशेस टाकल्‍यानेच जरासंध मेला, अन्‍यथा तो अजिंक्‍यच होता. ही कुशल युद्धनीती ज्‍यात शत्रूचे मृत्‍यूमर्मस्‍थान ओळखून त्‍याप्रमाणे युद्ध केले जाते.

६. भगवान श्रीकृष्‍णाने अश्‍वत्‍थाम्‍याला दिलेला शाप !

शेवटी राहिला आचार्य द्रोणपुत्र अश्‍वत्‍थामा. त्‍याला मरणासन्‍न दुर्योधनाने सेनापती केले आणि त्‍याने अत्‍यंत अभद्र नीती वापरून सर्व पांडवपुत्र निद्रेत असतांना मारले. तो अवध्‍य (चिरंजीव) होता. त्‍याला पांडवांनी गाठले, तेव्‍हा त्‍याने अर्जुनासमवेतच्‍या युद्धात ब्रह्मास्‍त्राचा प्रयोग केला; पण ते परत घेता येत नसल्‍याने त्‍याने ते अभिमन्‍यूची पत्नी उत्तरेच्‍या गर्भातील बालकावर टाकले. (पुढे श्रीकृष्‍णाने त्‍या मृत अर्भकास जिवंत करून पांडव कुलक्षय टाळला). श्रीकृष्‍णाने सुदर्शन चक्राने दुष्‍ट अश्‍वत्‍थाम्‍याचे कपाळावरील मणी काढून त्‍यास शाप दिला, ‘तो मणी काढल्‍याने झालेल्‍या व्रणाची जखम वेदना देत अक्षय वहात राहील आणि त्‍यावर तेल घालण्‍यासाठी ते मागत तो युगानुयुगे यातना भोगत फिरत राहील’; कारण तो चिरंजीव होता. हेच चिरंजीवित्‍व त्‍याला शाप ठरले.

७. शत्रूचे आंतरिक कपट जाणून श्रीकृष्‍णाने केलेला प्रतिडाव !

युद्धानंतर शेवटी धृतराष्‍ट्राने भीमाला भेटण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. त्‍या वेळी त्‍याचे सामर्थ्‍य आणि हेतू श्रीकृष्‍णाच्‍या लक्षात आला. त्‍यामुळे ऐनवेळी लोखंडी पुतळा पुढे करून भीमास वाचवले, हीसुद्धा युद्धनीतीच ! (त्‍या वेळी धृतराष्‍ट्राने भीम समजून लोखंडी पुतळ्‍याला मिठी मारली आणि ती फोडली. जर धृतराष्‍ट्राने प्रत्‍यक्ष भीमाला मिठी मारली असती, तर तो मृत्‍यू पावला असता.) शत्रूचे आंतरिक कपट जाणून केलेला प्रतिडाव !

८. श्रीकृष्‍णाच्‍या आत्‍मतत्त्वाचा भाग जगन्‍नाथपुरीमधील श्रीकृष्‍णाच्‍या मूर्तीत !

पुढे यादवकुळाचा नाश पाहून मगच श्रीकृष्‍णाने अवतार समाप्‍ती केली. त्‍याचे पार्थिव पांडवांनी शोधून अग्‍निसंस्‍कार केले; पण त्‍यातील न जळणारा भाग त्‍यांनी समुद्रात विसर्जित केला. तो आत्‍मतत्त्वभाग पुढे जगन्‍नाथपुरीच्‍या राजास मिळाला आणि तो तेथील श्रीकृष्‍णाच्‍या मूर्तीत आहे, असे सांगतात; कारण ते अमर, अक्षय ईशतत्त्व !’

– श्री. वसंत गोडबोले (संदर्भ : अज्ञात)

संपादकीय भूमिका

भगवान श्रीकृष्‍णाच्‍या युद्धनीतीचा आदर्श घेऊन आताच्‍या सरकारने देशाच्‍या शत्रूंच्‍या विरोधात तशी नीती अवलंबवावी !