सनातनद्वेषाची कावीळ झालेल्यांचा अंत याच काविळीमुळे होतो, हा इतिहास आहे, हे त्यांनी नेहमीच लक्षात ठेवावे !
सनातन धर्माचा द्वेष करण्याची एक कुप्रथा काही विचारसरणींच्या लोकांकडून गेल्या काही वर्षांपासून या देशात चालू आहे. निधर्मी, पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या लोकांकडून ही कुप्रथा चालू ठेवण्यात आली आहे. हिंदु धर्मातील वर्णव्यवस्था, काही धार्मिक प्रथा आदींना विरोध करून त्यांनी थेट सनातन धर्माला लक्ष्य करण्याचा प्रकार चालू ठेवला आहे. वर्णव्यवस्थेवर सर्वाधिक टीका केली जाते आणि हिंदु धर्म, सनातन धर्म यांचा द्वेष किंवा त्याला विरोध करण्यासाठी यालाच अधिक कारणीभूत ठरवले जाते. दक्षिण भारतात आणखी एक कारण आहे, ते म्हणजे ‘स्वतःला आर्य ऐवजी द्रविड समजणे.’ ‘द्रविड हे भारतातील मूलनिवासी आहेत आणि आर्य हे बाहेरून आलेले आहेत’, असा त्यांचा दावा आहे. यामुळे विशेषतः तमिळनाडूमध्ये सनातन धर्माचा विरोध केला जातो. तमिळनाडूमध्ये पेरियार यांनी हा विरोध अधिक लोकांपर्यंत पोचवला. त्यासाठी त्यांनी पूर्वीच्या ‘जस्टिस पार्टी’चे नाव पालटून ‘द्रविड कळघम्’ पक्ष केले. ते नास्तिकतावादी होते. हिंदु धर्मातील रूढी, परंपरा यांना प्रखर विरोध करून त्यांनी राज्यात मोठी चळवळ राबवली. त्यांनी पसरवलेल्या या चळवळीला काटेरी फळे आली आहेत आणि ती हिंदु धर्मासाठी बाधक ठरत आहेत. पेरियार यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर आताचे द्रमुक म्हणजे ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ (द्रविड प्रगती संघ) हा पक्ष वर्ष १९४९ मध्ये स्थापन झाला; मात्र त्याची विचारसरणी हिंदुद्वेषाचीच राहिली. हिंदुद्वेष करतांना अन्य धर्मियांना मात्र सन्मान देण्यास हा पक्ष पुढेच राहिला. म्हणजे ‘ज्या काही चुकीच्या प्रथा आणि परंपरा आहेत, त्या केवळ हिंदु धर्मातच आहेत आणि अन्य धर्मीय पवित्र, निष्कलंक आणि शुद्ध आहेत’, असेच यांचे धोरण आहे. याच विचारसरणीतून द्रमुकचे प्रमुख नेते करुणानिधी यांचे नातू आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी ‘सनातन धर्माला नष्ट करायला हवे’, असे विधान केले. यासाठी त्यांनी डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांच्याशी सनातन धर्माची तुलना केली. आता ते ‘मी नष्ट करण्याचे विधान केलेच नाही’, अशा प्रकारची सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण सनातन धर्माच्या विरोधात असल्याविषयी मात्र ते ठाम आहेत. ‘कोणतीही कायदेशीर लढाई लढण्यास सिद्ध आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. यातून लक्षात येते की, सनातन धर्मद्वेषाला कशा प्रकारची फळे आली आहेत ! अशा विचारसरणीचा प्रतिवाद करून तिला पराभूत करणे आवश्यक आहे. याला काही काळ द्यावा लागेल; मात्र ते करणे आवश्यक आहे. पेरियार, द्रमुक यांची विचारसरणी किती चुकीची आहे, हे तमिळनाडूतील जनतेला सतत सांगायला हवे. त्यासाठी संतांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. संतांच्या वाणीमध्ये चैतन्य असते आणि त्याचा परिणाम व्यक्ती, समाज यांच्यावर होत असतो. तमिळनाडूमध्ये अशा प्रकारचा प्रतिवाद करणारे संत सध्या तरी दिसत नाहीत. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाही राज्यात अधिक महत्त्व मिळालेले नाही. त्यामुळे हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक आहे.
द्रमुक विचारसरणीचाच नाश करा !
सनातन धर्म हा अनादि अनंत आहे. तो ईश्वरनिर्मित असल्याने त्याला नष्ट करण्याचे सामर्थ्य कोणत्याही असुरामध्ये, मनुष्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये नाही. सत्ययुगापासून असंख्य असुरांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते स्वतः नष्ट झाले. सध्याच्या काही शतकांच्या काळातही हेच दिसून आलेले आहे. भारतावर परकियांची अनेक आक्रमणे झाली, मोगलांनी अनेक शतके भारतावर राज्य केले. मोगलांचे राज्य संपले; मात्र सनातन धर्माला ते संपवू शकले नाहीत. जे लोक सनातन धर्माला संपवण्याची विधाने करतात, त्यांनी हा इतिहास नेहमीच लक्षात ठेवायला हवा. द्रमुकची स्थापना होऊन ७४ वर्षे झाली आहेत. त्याची सीमा तमिळनाडूपुरतीच सीमित आहे; मात्र त्याचे विचार म्हणजे सूर्याला गिळण्याचे आहेत. यात तो कधी भस्मसात् होईल, हे त्यालाही कळणार नाही. मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्यानंतर उदयनिधी यांना पक्षाचे दायित्व मिळणार असल्याने आतापासूनच ‘मी कट्टर द्रविड आणि सनातनद्वेषी आहे’, हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ‘तमिळनाडूतील जनता आपल्याला नेता मानेल’, अशा विचारांनीच त्यांनी अशा प्रकारचे विधान केले असणार, यात शंका नाही. राज्यात स्टॅलिन यांचे कर्तृत्व मोठे आहे, असेही नाही. करुणानिधी यांचे पुत्र, सनातनद्वेष आणि नास्तिकतावाद यांच्या बळावरच ते सत्तेत आले. जर द्रमुक आणि जयललिता यांचा अण्णाद्रमुक या पक्षांना तमिळनाडूतून हद्दपार करायचे असेल, तर त्यांना तितकाच वैचारिक विरोध करणे आवश्यक आहे. सनातन धर्माविषयी जो काही अपप्रचार करण्यात आला आहे आणि येत आहे, तो खोडून काढायला हवा. त्यासाठी राज्यात ज्या काही हिंदु संघटना आहेत, त्यांनी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. हा लढा वैचारिक स्तरावर करतांना त्याला आध्यात्मिक बळ आवश्यक आहे आणि या लढ्यात सनातन धर्माचे बळ संतांच्या आशीर्वादातून, त्याच्या प्रत्यक्ष सहभागातून मिळेल. तसेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो किंवा धर्मच प्रत्येकाचे रक्षण करतो, हे लक्षात घेता धर्माभिमानी हिंदूंनी प्रयत्न केला, तर त्याला यश मिळणारच ! वर्णव्यवस्था काय आहे आणि तिला होणारा विरोध किती चुकीचा आहे; हिंदु धर्मातील ज्या प्रथा, परंपरा अन् ब्राह्मणवाद यांना विरोध केला जातो, तो कसा चुकीचा आहे ? हे योग्यरित्या पटवून द्यावे लागणार आहे. ‘द्रविड संकल्पना किती चुकीची आहे’, ही एक चळवळ उभी रहाणे आवश्यक आहे. तमिळनाडूतील हिंदु जनता धार्मिक आहे. तिचे धर्माच्या आधारे प्रबोधन केले, तर तिच्या हे नक्कीच लक्षात येईल. द्रमुक विचारसरणीचे पक्ष नास्तिकतावादाच्या नावाखाली हिंदु धर्माचा द्वेष करून अन्य धर्मियांचे कसे लांगूलचालन करत आहेत, हे संपूर्ण देशात सांगितले गेले पाहिजे. सनातन धर्माला नष्ट करण्याचे धाडस करणार्यांचा वैचारिक नाश करण्यासाठी हिंदू, त्यांच्या संघटना आणि संत यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे अन् हाच त्यांना योग्य विरोध असेल.