पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित !

‘मराठा क्रांती मोर्चा’वर लाठीमार केल्‍याच्‍या प्रकरणाचे पडसाद

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्‍या लाठीमाराचे पडसाद महाराष्‍ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसगाड्या पेटवण्‍यात, तसेच फोडण्‍यात आल्‍या आहेत. दक्षता म्‍हणून पुणे येथून मराठवाड्यात जाणार्‍या अनुमाने ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत. अचानकपणे झालेल्‍या बंदमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

या बसगाड्या पुन्‍हा कधी चालू होतील ? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून मिळत नाही. यवतमाळ जिल्‍ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणार्‍या १६ गाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत. संभाजीनगरहून मराठवाड्यातील इतर जिल्‍ह्यांत जाणार्‍या बसगाड्या सध्‍यातरी पूर्णपणे बंद करण्‍यात आल्‍या आहेत.