भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांची चीनशी मैत्री !

१. भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांच्याशी चीनचे संबंध !

‘भारताच्या इतिहासात आपल्याच लोकांनी आपल्याला धोका दिला. त्यामुळे देशाला पराभव पत्कारावा लागला. मीर जाफर याने धोका दिल्याने इंग्रजांनी भारत कह्यात घेतला. इंग्रज तर भारतातून गेले; परंतु आता भारताला नवीन शत्रू निर्माण झाला आहे आणि तो इंग्रजांचेच धोरण अवलंबत आहे. तो शत्रू आहे चीन ! समोरासमोरच्या लढाईत भारताला हरवणे शक्य नाही, हे त्याच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तो भारताशी छुप्या मार्गाने लढत आहे. देशातील प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीजीवी आणि राजकीय नेते हे भारताचे शत्रू बनले आहेत. आज भारतातील प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय नेते हे चीनच्या मांडीवर बसले आहेत. काँग्रेसला चीनकडून निधी पुरवला जात असल्याची टीका भाजपने केली आहे. चीनमधील साम्यवादी पक्ष आणि भारतातील प्रसिद्धीमाध्यमे यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. चीनमधील नेव्हल राय सिंघम याने भारतात चीनची प्रसिद्धी करण्यासाठी येथील प्रसिद्धीमाध्यमांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. भारतातील ‘न्यूज क्लिक’ या स्वतंत्र ‘ऑनलाईन’ ‘न्यूज पोर्टल’च्या (वृत्तसंकेतस्थळाच्या) कार्यालयावर ९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाड घातली. साम्यवादी नेते प्रकाश करात आणि सिंघम यांच्यातील संबंध उघडकीस आल्यांनतर लगेच गलवान येथे चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे २० सैनिक ठार झाले. राहुल गांधी यांनी गलवान येथील संघर्षानंतर पंतप्रधानांवर टीका केली; परंतु लगेच ते चीनच्या राजदूतांना ‘नाईट क्लब’मध्ये जाऊन भेटले.

शाम शर्मा

२. चीनमधील कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्ष आणि ‘न्यूज क्लिक’ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध

मागील आठवड्यात अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने एक मोठा खुलासा केला की, अमेरिकेतील एक मोठे उद्योजक नेव्हल रॉय सिंघम यांचे चीनमधील कम्युनिस्ट पक्ष आणि भारतातील ‘न्यूज क्लिक’ या प्रसिद्धीमाध्यमाशी संबंध आहेत. ‘न्यूज क्लिक’च्या संकेतस्थळावरून त्यांचे चीनशी संबंध असल्याचे दिसून येते. ‘न्यूज क्लिक’ला विदेशातून ३८ कोटी रुपयांचा निधी पुरवला गेला आहे’, असे ‘ईडी’ने शोधून काढले आहे. हे पैसे सिंघम याने पुरवल्याचे दिसून आले आहे. सिंघम ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा प्रसार करत आहे. अलीकडे विविध देशांमध्ये प्रसिद्धीमाध्यमांना संपर्क करून निधी पुरवायचा आणि त्यांचा वापर करून त्याच देशात चीनच्या तत्त्वांचा प्रचार करायचा, असे धोरण चीनने अवलंबले आहे. सिंघम हा ‘अमेरिकी तंत्रज्ञान उद्योजक’ आहे. त्याने ‘थोट वर्क’ नावाची ‘टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी’ आस्थापन चालू केले होते. ती वर्ष २०१७ मध्ये त्याने एका ब्रिटीश आस्थापनाला ७८५ अब्ज डॉलर्सना (६५ लाख १५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) विकली. गेली कित्येक वर्षे सिंघम यांचे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आहेत. ते नेहमीच साम्यवादाला पाठींबा देत आले आहेत. त्यांच्या आस्थापनामध्ये कर्मचारी एकमेकांना ‘कॉम्रेड’ असे संबोधत होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार सिंंघमचे चीनच्या सरकारशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याने शांघाय, लोवेशिंग आणि गोंडवाना फूड या चीनमधील आस्थापनांमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच तो ‘शांघाय शिनॉन’ या आस्थापनाचा कायदे सल्लागार होता. सिंघमची पत्नी एवन्स हिने ‘कोर्ट पिंक’ ही स्त्री संघटना सिद्ध केली होती. या संघटनेने वर्ष २०२१ मध्ये ‘चीन हा आमचा शत्रू नाही’, या नावाने मोहीम राबवली होती. या माध्यमातून तिने अमेरिकेत चीनचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. पैसा, इतर स्रोत आणि विविध संघटना यांच्या माध्यमातून या लोकांनी चीनचा प्रचार जगभरात केला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तामध्ये चीनमधील साम्यवादी पक्ष सिंघमच्या माध्यमातून भारतात ‘न्यूज क्लिक’ या प्रसिद्धीमाध्यमाला निधी पुरवत होती आणि सिंघमचे ‘न्यूज क्लिक’चे सहसंस्थापक गौतम नवलखा यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील वृत्तानुसार चीनमधील साम्यवादी पक्ष सिंघमच्या माध्यमातून भारतातील ‘न्यूज क्लिक’ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाला निधी पुरवत आहे. ‘सिंघम याचे ‘न्यूज क्लिक’चे सहसंस्थापक गौतम नवलखा यांच्याशी संबंध होते. गौतम नवलखा नक्षलवाद्यांना साहाय्य करतात, तसेच कोरेगाव-भीमा दंगल भडकावण्यामागे त्यांचा सहभाग आहे’, असा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. नवलखा यांनी काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि आतंकवादी यांना पाठिंबा देऊन भारतीय सैन्याच्या विरोधात प्रचार केला आहे. गौतम नवलखा त्यांच्या भाषणात म्हणतात, ‘‘हिंदुस्थानची काय करण्याची इच्छा आहे आणि काय करू पहात आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. भारताने काश्मीरला सैन्याचा दबाव, अश्रुधूर, गोळ्या, बलात्कार असे सर्वकाही दिले आहे.’’ वर्ष २०२२ मध्ये ‘ईडी’ने ‘न्यूज क्लिक’ला निधी कोण पुरवते ? याचे अन्वेषण केले. तेव्हा चीनमधील साम्यवादी पक्ष आणि ‘न्यूज क्लिक’ यांच्यामध्ये संबंध असल्याचे उघड झाले होते.

प्रबीर पुरकायस्थ (‘न्यूज क्लिक’चे संचालक), शी जिनपिंग, नेव्हल रॉय सिंघम

३. चीनच्या साम्यवादी पक्षाकडून स्वतंत्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अर्थपुरवठा

‘न्यूज क्लिक’चे संचालक प्रबीर यांचा सिंघमशी संबंध आहे’, हे उघड झाले. सिंघम याने कोरेगाव भीमा प्रकरणातील ३ दंगलखोरांना पाठिंबा देणार्‍यांना ‘न्यूज क्लिक’मध्ये नोकरी देण्यासाठी त्यांच्या निधीचा उपयोग केला होता. या दंगलीतील एका आरोपीला साहाय्य करण्यासाठी ‘न्यूज क्लिक’ या वृत्तवाहिनीने त्याच्या खात्यात २० लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते. तसेच ‘न्यूज क्लिक’चा स्वतंत्र भागीदार म्हणून या आरोपीची नेमणूक करण्यात आली. सिंघम यांनी चीनवर आधारित ‘रेडस्टार ओव्हर चायना’ आणि ‘द सिक्रेट ऑफ चायना’ या दोन चित्रपटांचे ‘डबिंग’ अन् संकलन करण्यासाठी चीनशी संपर्क केला होता. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करणार्‍या खात्याकडून या दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. या पक्षाकडून स्वतंत्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना पैसा पुरवला गेला होता. ‘न्यूज क्लिक’चे अभिसार शर्मा आणि तिस्ता सेटलवाड यांच्या कुटुंबाला निधी पुरवला गेला होता. तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरातच्या गोध्रा दंगलीनंतर मोदी आणि भाजप यांची अपकीर्ती करण्यासाठी काँग्रेसकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. तसेच गोध्रा दंगलीतील साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याविषयी त्यांना अटकही करण्यात आली होती. हे लोक निःपक्षपाती पत्रकार आहेत का ? ‘न्यूज क्लिक’ला जो अवैधपणे पैसा मिळाला, त्याचा परिणाम काय झाला ? जेव्हा गलवानवर चीनने आक्रमण केल्यावर ‘टीक टॉक’ प्रणालीवर बंदी आणण्याचा विचार भारत करत होता, तेव्हा ‘न्यूज क्लिक’ने चीनला पाठिंबा दिला. त्या वेळी त्याने म्हटले, ‘गाणे आणि नृत्य यांसाठी २० वर्षे काम करणारे ‘टीक टॉक’ हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक कसे ठरू शकते ?’ ‘टिक टॉक’ वर बंदी आणल्यावर भारत आणि चीन यांच्यामध्ये संपर्क असणारे एकमेव माध्यम बंद झाले.

भारत-चीन सीमावादावर ‘न्यूज क्लिक’ने चीनला पाठिंबा दिला. ‘न्यूज क्लिक’ने म्हटले की, भारताने सैन्याची कारवाई बंद करावी आणि चीनशी वाटाघाटी कराव्यात. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात ‘न्यूज क्लिक’ने चीनला पाठिंबा दिला. त्याने विधान केले, ‘परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या परराष्ट्र धोरणाच्या परिणामकारकतेविषयी प्रश्‍नचिन्ह आहे.’ काश्मीरविषयीच्या त्यांच्या वृत्तामध्ये त्यांनी दगडफेक करणारे आणि फुटीरतावादी यांना पाठिंबा दिला. त्याच्या वृत्तामध्ये एक काश्मीरमधील व्यक्ती ‘आम्ही दगड मारले, तरी दगडांचे उत्तर गोळीने देऊ नये’, असे म्हणतांना दाखवली आहे. अजून एक व्यक्ती म्हणते, ‘भारत आणि पाकिस्तानमधील ही समस्या पूर्वीपासूनची आहे. भारत आणि पाकिस्तान बोलणी का करत नाहीत ?’ ‘न्यूज क्लिक’ला पाठवलेल्या संगणकीय पत्रांमधून ‘चीनने कोरोना महामारीची स्थिती कशी हाताळली, याची स्तुती करावी आणि तीच परिस्थिती अमेरिकेने कशी हाताळली, याची निंदा करावी’, असा संदेश दिला गेला. त्याप्रमाणे ‘न्यूज क्लिक’ने केले आणि भारतीय लसींविषयी शंका उपस्थित केली.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– शाम शर्मा, निवेदक (साभार : ‘शाम शर्मा शो’ यू ट्यूब वाहिनी)