पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी

कणकवली – तालुक्यातील कलमठ गावातील १७ वर्षीय धर्मांध युवतीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानविषयीची आणि हिंदूंच्या एका देवतेविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केली होती. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून राज्य आतंकवादविरोधी पथक आणि आतंकवादविरोधी पथकाची स्थानिक शाखा या दोघांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित युवतीवर गुन्हा नोंद होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मूळ कर्नाटक राज्यातील युवतीचे कुटुंब गेली १४ वर्षे कणकवली येथे रहात असून, त्यापूर्वी १० वर्षे ते सावंतवाडी येथे रहात होते. असे एकूण २४ वर्षे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. युवतीचे वडील जिल्ह्यात आठवडा बाजारात भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सामाजिक माध्यमातून प्रसारित झालेल्या ‘पोस्ट’विषयी समजल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे आणि पदाधिकारी यांनी ३० ऑगस्ट या दिवशी पोलिसांकडे या युवतीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी या युवतीचे आणि तिच्या कुटुंबियांची साक्ष नोंदवून घेतली. ही युवती सध्या शहरात इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे.

या युवतीची एक मैत्रीण पाकिस्तानमध्ये रहाते. १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असल्याने त्या मैत्रिणीला ‘इन्स्टाग्रामवर’ शुभेच्छा दिल्या होत्या. ही ‘पोस्ट’ मी प्रसारित केली नाही, तर माझ्या ‘फॉलोव्हर्स’नी ती प्रसारित केली. मी १५ मिनिटांतच ती ‘पोस्ट’ काढून टाकली (डिलिट केली). ज्या हिंदु देवतेविषयी ‘पोस्ट’ टाकली, त्याविषयी ‘ती हिंदु देवता असल्याचे मला ठाऊक नव्हते’, असे या युवतीने चौकशीच्या वेळी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले. असे असले, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. तिच्या भ्रमणभाषच्या नोंदी (रेकॉर्ड) आणि अन्य माहिती पोलीस घेत आहेत.