अमेरिकेचे खायचे आणि दाखवायचे दात !

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या. त्या मागणीची पूर्तता आता झाली आहे. ऑक्टोबर मासात नवरात्र, दसरा हे सण-उत्सव येतात. क्वचित्प्रसंगी दिवाळीही येते. त्यामुळे हिंदूंसाठी हा मास विशेष आहे. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्याविषयी ‘अ कोअॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (कोहना)’ या संस्थेच्या सदस्यांनी जॉर्जियाच्या राज्यपालांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात ‘एक्स’वरही (पूर्वीचे ट्विटर) घोषित करण्यात आले आहे. राज्यपाल ब्रायन केंप म्हणाले, ‘‘हिंदु वारसा, त्याची संस्कृती आणि भारतात रुजलेल्या विविध आध्यात्मिक परंपरा यांच्यावर लक्ष केंद्रित करून हा मास साजरा केला जाईल.’’ या निर्णयामुळे अमेरिकेतील हिंदू पुष्कळ आनंदित झाले असून त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा मास मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक हिंदु आता सिद्ध होत आहे. हिंदु धर्माचा डंका अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात वाजणे, हे हिंदु धर्मियांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे. अमेरिकेने हिंदु धर्माची नोंद घेऊन याद्वारे त्याचा गौरव करण्याचा केलेला प्रयत्न निश्‍चितच स्तुत्य आहे. यासाठी समस्त भारतियांनी अमेरिकेचे आभारच मानायला हवेत. काही मासांपूर्वी याच जॉर्जिया राज्याने ‘हिंदुफोबिया’ (हिंदु धर्माचा द्वेष) असणारे आणि हिंदु धर्माचे विरोधक यांचा निषेध करणारा ठराव विधानसभेत संमत केला होता. हिंदुफोबियावर ठराव पारित करणारे जॉर्जिया हे अमेरिकेचे पहिले राज्य ठरले. अमेरिकेच्या संसदेत वैदिक मंत्रोच्चारात पहिली हिंदु-अमेरिकी परिषद २० हिंदु संघटनांच्या सहकार्याने मध्यंतरी पार पडली होती. थोडक्यात काय, तर ‘जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेत हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आहे’, असे म्हणता येईल. हिंदूंसाठी हा एक प्रकारे आशेचा किरणच आहे.

ढोंगी हिंदुप्रेम !

असे असले, तरी याच अमेरिकेची हिंदूंसाठी घातक असणारी दुसरी बाजू दुर्लक्षून चालणार नाही. अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या हिंदूंचा अनेक ठिकाणी द्वेष करण्यात येतो. अनेक हिंदूंवर वर्णद्वेषी आक्रमणेही केली जातात, त्यांच्या संपत्तीलाही लक्ष्य बनवले जाते. अमेरिकेत भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर तेथील खासदारांवर हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी न्यू जर्सीमध्ये ‘टीनेक डेमोक्रॅटिक म्युनिसिपल कमिटी’ने ६० हिंदु संघटनांच्या विरोधात प्रस्ताव पारित केला होता; पण त्या विरोधात भारत सरकारने अमेरिकेला खडसावलेच नाही. कॅलिफोर्निया राज्याच्या विधीमंडळाने ‘जातीभेदविरोधी विधेयका’ला संमती दिली. अमेरिकेतील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक सिद्ध केल्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप कोहना संघटनेने केला होता. ‘विवेक रामास्वामी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर तेथील एका हिंदुद्वेषी पाद्रीने ‘आता व्हाईट हाऊस’मध्ये हिंदु देवतांच्या विचित्र प्रतिमा पहायला मिळतील’, असे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारे विधान केले होते. हे सर्व प्रसंग पहाता अमेरिकेचे ढोंगी हिंदुप्रेमच दिसून येते.

राष्ट्रघातकी मानसिकता !

पाकिस्तान म्हणजे भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरणारा आणि त्याचा कट्टर शत्रू असणारा देश आहे, हे ठाऊक असूनही ‘भारत-पाक चर्चेस आमचा पाठिंबा आहे’, असे सांगत अमेरिका वारंवार भारताची खपली काढण्याचा प्रयत्न करत आहे. भारत-पाक चर्चेचे समर्थन करणारी अमेरिका एकीकडे पाकला शस्त्रास्त्रे पुरवते, हे छुपे कारस्थान भारत जाणून आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींसमवेत ‘भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेविषयी चर्चा करा’, असा अनाहूत सल्ला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिला होता. एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत सूत्रांवर अशी चर्चा करायची नसते, इतके साधे धोरणही महासत्ता झालेल्या अमेरिकेला ठाऊक नाही का ? भारत कधीच अमेरिकेच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसत नाही, हे अमेरिकेने लक्षात ठेवावे ! पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यानंतर भारतातून चोरी आणि तस्करी यांच्या माध्यमांतून अमेरिकेत नेण्यात आलेल्या १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताला परत देण्यात आल्या. हा मोदींच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेचा परिणामच म्हणावा लागेल ! गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक कलाकृती भारताकडे सोपवल्या. अजूनही तेथे १ सहस्र ४०० हून अधिक असणार्‍या कलाकृती परत देण्याविषयी अमेरिकेने ‘ब्र’ही काढलेला नाही. अमेरिकेच्या स्वार्थी धोरणामुळे भारताच्या अनेक अंतराळ मोहिमांना साधारणतः ३० वर्षे विलंब झाला. भारत अंतराळ क्षेत्रात यशस्वी होऊ नये, यासाठीच अमेरिकेने इतकी वर्षे भारताच्या मोहिमांना छुप्या पद्धतीने विरोध केला. खलिस्तानवाद्यांच्या वारंवार होणार्‍या आक्रमणांमुळे तोही तेथील भारतियांसाठी डोकेदुखीच ठरत आहे.

थोडक्यात काय, तर हिंदूंच्या बाजूचे काही निर्णय घेऊन ‘आम्हाला अमेरिकी हिंदूंची किती काळजी आहे’, ‘अमेरिकेत ते सुरक्षित आहेत’, असे भासवून भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच अमेरिकेचा धूर्त डाव आहे. अर्थात् भारत हे सर्व जाणून आहे. अमेरिकेचे ‘खायचे आणि दाखवायचे दात वेगळे’ आहेत. अशा आपमतलबी मानसिकता जोपासणार्‍या अमेरिकेला भारत सरकारने वेळीच ठणकवायला हवे. परराष्ट्र नीतीद्वारे भारताने अमेरिकेचे भारतविरोधी खरे रूप जगासमोर उघड करायला हवे. तसे झाल्यासच अमेरिकेला शहाणपण येईल. अमेरिकेतील हिंदूंची लोकसंख्या साडेतीन लाख इतकी आहे. त्यामुळे हिंदूंनी आता शांत न रहाता अमेरिकेची हिंदुद्वेषी मानसिकता, तसेच हिंदूंच्या संदर्भात केला जाणारा भेदभाव याविरोधात संघटित होऊन शक्तीप्रदर्शन करायला हवे. केवळ भारतातील हिंदूंनी नव्हे, तर आता अमेरिकेतील हिंदूंनीही त्यांच्यातील हिंदुत्वाचे सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आता आली आहे, हे लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !