परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेला पू. दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास !

‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती. त्यांच्यात गोपीभाव होता. त्यांची समाजात, म्हणजे समष्टीत मिसळणे, साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, त्यांना प्रेमाने चुका सांगून त्या सुधारून घेणे, सेवांचे योग्य नियोजन करणे इत्यादींसाठी आवश्यक असलेली समष्टी प्रकृती नव्हती; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘तुला कृष्ण हवा असेल, तर समष्टी सेवा करायला हवी !’, असे सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून आणि सतत त्यांच्या अनुसंधानात राहून पू. दीपालीताईंनी समष्टी सेवा करायला आरंभ केला. अल्पावधीतच त्यांनी स्वतःच्या व्यष्टी प्रकृतीचे रूपांतर समष्टी प्रकृतीमध्ये केले. त्यांनी समष्टी साधना होण्यासाठी अव्याहत धडपड केली. त्यामुळे २८.१०.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने गोपीभाव असलेल्या साधिका कु. दीपालीताई समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर यांना संत घोषित करण्याच्या वेळी त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा साधनाप्रवास अगदी अलगदपणे उलगडत नेला. श्रावण कृष्ण द्वितीया (१.९.२०२३) या दिवशी पू. दीपाली मतकर यांचा ३५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. दीपाली मतकर यांची घेतलेली ही मुलाखत पुढे दिली आहे.

पू. दीपाली मतकर

पू. दीपाली मतकर यांना ३५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण नमस्कार !

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी कु. दीपाली मतकर यांना त्यांच्यातील गोपीभावामुळे ओळखणे

सद्गुरु स्वाती खाडये : लहान वयात तुम्ही पूर्णवेळ साधना करू लागलात ना ? मला आठवते, ‘तुम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याच्या आधी मी रामनाथी आश्रमात आले होते. रामनाथी आश्रमात आपली प्रत्यक्ष भेट झाली नसली, तरी तेव्हा मी तुम्हाला ‘गोपीभाव (टीप) असलेली साधिका’ म्हणून ओळखत होते. लहान वयापासूनच तुमच्यात ‘गोपीभाव’ आहे; म्हणूनच तुम्ही एवढ्या जलद गतीने प्रगती करू शकलात.

टीप – गोपीभाव : गोपींचा श्रीकृष्णाप्रती जो भाव होता, त्याला ‘गोपीभाव’, असे म्हणतात.

पू. दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास जाणून घेतांना सद्गुरु स्वाती खाडये

२. कु. दीपाली मतकर यांनी स्वयंपाकघरात केलेली सेवा !

२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णादेवी यांनीच संत अन् साधिका यांच्या माध्यमातून स्वयंपाक करायला शिकवला’, असे कु. दीपाली यांना जाणवणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्हाला घरी १ – २ जणांचा स्वयंपाक करावा लागत असेल ना ? रामनाथी आश्रमात तुम्ही ४०० ते ५०० साधकांचा स्वयंपाक करायला कशा शिकलात ? त्या वेळी तुम्ही कसा भाव ठेवलात ?

कु. दीपाली मतकर : वर्ष २००३ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे मला घरी ४ – ५ जणांचा स्वयंपाक करावा लागायचा; पण तोही करायला आणि शिकवायला कुणी नव्हते. मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘आता तुम्हीच मला स्वयंपाक करायला शिकवा.’ तेच सूक्ष्मातून मला स्वयंपाक करायला शिकवायचे. रामनाथी आश्रमात गेल्यावरही स्वयंपाक करतांना मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णामाता यांना प्रार्थना करत असे. तेव्हा ‘स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिका श्री अन्नपूर्णादेवीचे रूप असून देवीच माझ्या अवतीभोवती फिरून मला स्वयंपाकाची सेवा शिकवत आहे’, असे मला जाणवत असे. गुरुदेव आणि श्री अन्नपूर्णादेवी यांनीच मला स्वयंपाक (महाप्रसाद) करायला शिकवला आणि माझ्याकडून करूनही घेतला.

स्वयंपाकघरात सेवा करतांना मला पू. रेखाताई (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर, वय ४५ वर्षे) आणि सौ. सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) स्वयंपाकातील बारकावे शिकवायच्या, उदा. ४० साधकांचा स्वयंपाक असेल, तर त्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे प्रमाण किती असायला हवे किंवा १०० जणांचा स्वयंपाक असेल, तर त्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे प्रमाण किती असायला हवे ? पदार्थात तिखट-मीठ, पाणी इत्यादी किती घालायचे ?

२ आ. कु. दीपाली यांच्यातील भावामुळे देवाने पोषक वातावरण निर्माण करून त्यांना स्वयंपाक करायला शिकवणे

सद्गुरु स्वाती खाडये : लहानपणापासूनच तुमच्यात भाव असल्यामुळे आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला एवढ्या जणांचा स्वयंपाक करायला शिकता आला. स्वयंपाकाची सेवा करणार्‍या साधिकांनी तुम्हाला आईप्रमाणे प्रेम दिले. त्यांनी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींतूनही शिकवले, उदा. ‘तांदुळ किती घ्यायचे ? त्यात पाणी किती घालायचे ? गॅस कधी बंद करायचा ?’ त्यांनी तुम्हाला आईची उणीव भासू दिली नाही. तुमच्या मनात भाव असल्यामुळे देवाने तुमच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले.

२ इ. कु. दीपाली यांच्यातील भावामुळे त्यांना स्वयंपाकघरात सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

कु. दीपाली मतकर : महाप्रसाद ठेवण्याची भांडी फार मोठी असायची. ती भांडी एकटीने उचलणे मला शक्य व्हायचे नाही; पण मला ती भांडी हलकी वाटायची.

साधक जेवायला आल्यावर ‘प्रत्येक साधकाच्या मुखातून माझा कृष्णच जेवत आहे’, असे मला जाणवायचे. ‘माता यशोदेला एकाच कृष्णाला भरवायला मिळाले; पण मला एवढ्या सगळ्या कृष्णांना भरवता येत आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद व्हायचा.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची केलेली सेवा आणि त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

३ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळावी’, असे वाटणे आणि त्यानंतर त्यांची सेवा करायला मिळाल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुमच्यातील भावामुळे तुम्ही अगदी लहान वयात गुरुदेवांचे मन जिंकले. तुम्हाला प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळाली का ?

कु. दीपाली मतकर : सनातनच्या गोपीभाव असलेल्या साधिका कु. तृप्ती गावडे (आताच्या सौ. तृप्ती शिंदे) पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करायला जायच्या आणि त्यांच्याकडून आल्यावर त्यांच्याविषयी पुष्कळ आनंदाने सांगायच्या. तेव्हा मलाही ‘त्यांची सेवा करायला मिळेल का ?’, असे वाटायचे. ‘भक्ताच्या हातून भगवंत जेवतो’, अशा गोष्टी मी लहानपणी ऐकल्या होत्या. त्यामुळे मला वाटायचे, ‘मला प्रत्यक्ष अशी संधी कधी मिळेल का ? माझ्या हातचे भगवंत जेवेल का ? मला त्याची सेवा करता येईल का ? मलाही देवाची सेवा करायची संधी मिळावी.’ त्यानंतर काही दिवसांनी मला गुरुदेवांच्या सेवेची संधी मिळाली. मला ‘त्यांच्या खोलीची स्वच्छता करणे, त्यांचे कपडे धुऊन इस्त्री करणे आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे’, अशा सेवा मिळाल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३ आ. तरुण वयातही मायेतील गोष्टींची आसक्ती नसणे

सद्गुरु स्वाती खाडये : आपण समाजातील मुलांचे पहातो, ‘तरुण वयातील मुलांच्या मनात ‘आपण आधुनिक वैद्य, अभियंता किंवा कुणीतरी मोठा अधिकारी व्हायला पाहिजे, आपले घर असले पाहिजे, गाडी असली पाहिजे’, अशा प्रकारच्या मायेतील इच्छा असतात’; मात्र तुम्हाला घर, पैसा, नोकरी इत्यादी मायेतील गोष्टींची आसक्ती नव्हती.

३ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करायला मिळावी’, हा कु. दीपाली यांच्या मनातील विचार ही ‘ईश्वरेच्छा’ होती’, असे सद्गुरु खाडये यांनी सांगणे : ‘मला भगवंत मिळाला पाहिजे’, अशी तुमची सात्त्विक इच्छा होती. मला वाटते, ‘ते ईश्वराचेच विचार होते. तुमच्यात ‘गोपीभाव’ आहे. त्यामुळे ‘गोपीभाव असलेल्या साधिकेच्या हातचे जेवण मला जेवायला मिळावे’, अशी भगवंताचीच इच्छा होती.’ भगवंतालाच ‘गोपीभाव असलेली ही साधिका (कु. दीपाली) माझ्याकडे सेवेसाठी कधी येईल ?’, अशी ओढ लागली होती. यातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळत आहे आणि माझा कृतज्ञताभाव दाटून येत आहे.

३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी छोट्या छोट्या प्रसंगांतून शिकवून घडवणे

सद्गुरु स्वाती खाडये : तुम्ही गुरुदेवांची सेवा करत असतांना गुरुदेवांनी तुम्हाला अनेक गोष्टींतून शिकवले असेल ना ? त्यांतील काही प्रसंग आम्हाला सांगा.

३ ई १. शरणागतीच देवाकडे नेते !

कु. दीपाली मतकर : गुरुदेव प्रत्येक क्षणीच शिकवायचे. प्रत्येक वेळी त्यांच्या खोलीमध्ये सेवेसाठी जातांना ‘आज गुरुदेव काय शिकवणार ?’ किंवा ‘भगवंताची आज काय लीला असेल ?’, असे मला वाटायचे. प्रत्येक दिवशी ते काही ना काही शिकवायचे. प्रतिदिन ते मला एखादा प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तर लिहून द्यायला सांगायचे. एक दिवस त्यांनी मला एक प्रश्न विचारला. मी त्याचे उत्तर दिल्यावर ते म्हणाले, ‘‘हे उत्तर नाही.’’ मी दुसरे उत्तर दिल्यावरही ते म्हणाले, ‘‘हे उत्तर नाही.’’ मला वाटले, ‘आज असे का होत आहे ?’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मी १० मिनिटांनी येतो. मी आल्यावर मला याचे उत्तर सांगा.’’ शेवटी मी देवाला शरण गेले आणि मनातच गुरुदेवांना म्हणाले, ‘मी हरले परम पूज्य ! ‘तुम्हाला काय अपेक्षित आहे ?’, ते मला कळत नाही.’

सद्गुरु स्वाती खाडये : देवाला शरण गेल्याविना काहीच मिळत नाही, ना व्यावहारिक, ना आध्यात्मिक ! शरणागतीच देवाकडे घेऊन जाते. तुम्ही शरणागती पत्करली. किती छान ! हे पुष्कळच शिकण्यासारखे आहे. पुढे काय झाले ?

३ ई २. सकारात्मक राहिल्यास आनंद मिळतो !

कु. दीपाली मतकर : काही वेळाने गुरुदेव आले. तेव्हा आमच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता मीच उत्तर देतो.

(त्यांनी मला उत्तर सांगितले.)

कु. दीपाली मतकर : परम पूज्य, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर ठाऊक असूनही तुम्ही मला का विचारले ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तू कशी शिकणार ? ‘तुला शिकता यावे आणि तू घडावेस’, यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. (समोरच असलेल्या मोरपिसाकडे पाहून) बघ, हे मोरपीस आज किती आनंदी दिसत आहे ! इतर दिवसांच्या तुलनेत आज हे पुष्कळ आनंदी दिसत आहे.

कु. दीपाली मतकर : मला हे नेहमीसारखेच दिसत आहे. ‘यात काही पालट झाला आहे’, असे मला वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. नीट पहा. आज ते वेगळे वाटत आहे.

कु. दीपाली मतकर : नाही, परम पूज्य. मला काही कळत नाही. मला ते नेहमीसारखेच दिसत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नाही. प्रतिदिनपेक्षा आज ते आनंदी दिसत आहे. ‘ते आनंदी का दिसत आहे ?’, हे ठाऊक आहे का ? कारण आज मी जिंकलो आणि तू हरली आहेस. तू हरल्यामुळे तुझे मन आनंदी नाही. मी जिंकलो आहे. त्यामुळे मला आनंद वाटत आहे.

कु. दीपाली मतकर : याचा भावार्थ असा, ‘तुम्ही सकारात्मक राहिलात, तर तुम्हाला आनंद मिळेल. आपले मन सकारात्मक असेल, तर सर्व सकारात्मक दिसते आणि आपले मन आनंदी असले, तर सर्वत्र आनंद दिसतो.’ अशा प्रकारे ते छोट्या छोट्या गोष्टींतूनही शिकवायचे.

सद्गुरु स्वाती खाडये : आपल्या सर्वांना सुख आणि दुःख ठाऊक आहे; पण आनंद कुठे ठाऊक आहे ?

प.पू. गुरुदेवांनीच आपल्याला ‘सुख-दुःखाच्या पलीकडे आनंद आहे’, हे शिकवले आणि गुरुदेवांनी तो आनंद देऊन तुम्हाला घडवले. परम पूज्य तुमची परीक्षा घ्यायचे, त्यात तुम्हाला उत्तीर्ण ही करायचे आणि ‘पुढे पुढे कसे जायचे ?’, हेही शिकवून घडवायचे. किती छान ना ! असे आपल्याला बाहेर कुठेच शिकायला मिळणार नाही. दीपालीताई, तुमच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’

(२१.४.२०२३)

(क्रमशः)