भारतात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना साहाय्य करणार्‍या लाहोरच्या (पाकिस्तान) पोलीस उपायुक्ताला अटक

मझहर इक्बाल

लाहोर (पाकिस्तान) – भारतात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोरच्या पोलीस उपायुक्ताला अटक करण्यात आली. मझहर इक्बाल असे त्याचे नाव आहे. तो ड्रोनद्वारे भारतात अमली पदार्थ पाठवण्यासाठी स्थानिक अमली पदार्थ तस्करांना साहाय्य करत होता. अमली पदार्थांच्या प्रत्येक खेपेसाठी तो ८ कोटी पाकिस्तानी रुपये घेत होता. नुकतेच लाहोरमध्ये ड्रोन कोसळले. त्यात ६ किलो अमली पदार्थ होते. चौकशीत एका तस्कराचे नाव समोर आले. त्याची चौकशी केल्यावर त्याने मझहर इक्बाल याचे नाव सांगितले. इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले होते. ते दडपण्याचाही प्रयत्न झाला; पण काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल् काकर यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी अन्वेषणास प्रारंभ केला.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान अशांना शिक्षा करील, याची शाश्‍वती अल्पच आहे !