कराची (पाकिस्तान) येथे आंदोलन करणार्‍या बलुच कार्यकर्त्यांना अटक

कराची – पाकिस्तानातील कराचीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून बलुच कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. सिंध पोलिसांनी महिलांसह अनेक बलुच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेले दाद शाह बलोच यांची सुटका करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.
या वर्षी फेब्रुवारीमध्येही बलुचिस्तानमधील क्वेटा, कराची, केंच, मांड आणि इतर अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनामध्ये पाकिस्तानचे सैन्य आणि ‘आय.एस्.आय.’ ही गुप्तचर संस्था यांच्यावर बलुच महिलांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मोहीम वर्ष २००० मध्ये चालू झाली होती. तेव्हापासून सहस्रावधी लोक बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत या भागातील ५ सहस्र लोक बेपत्ता असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.