सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास
२९ ऑगस्ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु जनजागृती समितीचेे ‘समन्वयक’ म्हणून पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांनी ईश्वरी अधिष्ठान ठेवून केलेले अविरत धर्मरक्षण कार्य, तसेच धर्मरक्षणाचे कार्य करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे ’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग १४)
वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात आल्यावर मला साधना आणि सेवा यांविषयी माहिती मिळाली. त्यांनीच वेळोवेळी मला माझ्या चुका सांगून, तसेच सेवेचे कौतुक करून माझ्याकडून साधना करून घेतली. वर्ष २०१० मध्ये मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागलोे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सत्संग लाभला. त्यांनी माझे कौतुक केले आणि साधनेसाठी मला प्रेरणाही दिली.
३०. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्संग
३० अ. ‘अनेक संतांकडून तुम्हाला ज्ञान मिळाले असल्याने मला तुमचा फार हेवा वाटतो’, असे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी कौतुकाने म्हणणे : देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्यावर मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या समवेत प्रातःकाली फिरायला जात असे. तेव्हा ते अनेक वेळा मला म्हणायचे, ‘‘तुम्हाला प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. काणे महाराज आणि प.पू. जोशीबाबा, अशा अनेक महान संतांचा सहवास मिळाला आहे. तुम्ही केवळ त्यांना भेटला नाहीत, तर तुमची त्यांच्याशी जवळीकही होती. ते तुमच्याशी आत्मीयतेने बोलतांनाची छायाचित्रे आहेत. त्यावरून ‘तुम्ही अनेक संतांच्या समोर बसून ज्ञान मिळवलेे आहे’, असे लक्षात येते. मला तुमचा फार हेवा वाटतो. तुम्ही फार कंजूष आहात. हे ज्ञानाचे गाठोडे तुम्ही बांधून ठेवलेे आहे. हे गाठोडे सोडून सर्वांना ज्ञान द्या.’’
अशा रितीने परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला प्रेरणा दिल्याने मी प.पू. बाबा आणि इतर संत यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच जाती निर्मूलनासारख्या संवेदनशील विषयावर लेख लिहू शकलो.
३० आ. आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. शिवाजी वटकर यांच्याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी काढलेले कौतुकोद़्गार ! : २६.९.२०१८ या दिवशी प.पू. बाबा म्हणाले, ‘‘श्री. शिवाजी वटकर यांचे आता वय झाले आहे. आता त्यांना पैशांची किंवा कोणत्याच गोष्टींची आवश्यकता नाही, तरी ते शांतपणे घरी रहाण्यापेक्षा सनातनच्या आश्रमात रहातात. त्यांची रहाणीही साधी आहे. ते त्यांची साधना म्हणून सेवा करतात. ते सनातनच्या सर्व सेवांत भाग घेतात.’’
३० इ. वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘आपण नातलग नाही, तर आत्मलग आहोत’, असे सांगून मिठीत घेऊन आशीर्वाद देणे : ऑक्टोबर २०१८ मध्ये देवद येथील आश्रमात साधकांनी भेटवस्तू देऊन आणि माझ्यावर कविता करून माझा वाढदिवस साजरा केला. त्या दिवशी सायंकाळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला बोलावले आणि ते मला म्हणाले, ‘‘मी तुमचा कोण लागतो ? तुम्ही मला तुमच्या वाढदिवसाविषयी का सांगावे ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘प.पू. बाबा, माझी चूक झाली. मला क्षमा करावी. ‘माझ्यासारख्या लहान माणसाच्या वाढदिवसाविषयी आपल्याला कशाला सांगायचे ?’, असे मला वाटलेे.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपण ‘आत्मलग’ आहोत, नातलग नाही.’’ त्यांनी मला कवटाळून धरले आणि खाऊ देऊन आशीर्वाद दिला.
(क्रमशः)
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२०)