‘संस्‍कृत’ एक अद़्‍भुत रचना होऊ शकणारी भाषा !

आज ‘संस्‍कृतदिन’ आहे. त्‍या निमित्ताने…

आजच्‍या काळातही संस्‍कृत भाषेमध्‍ये होत आहेत लीलया रचना !

या लेखातील सर्व श्‍लोक अगदी अलीकडच्‍या काळात रचलेले आहेत, हे वैशिष्‍ट्य प्रबुद्ध वाचकांना सहज उमगेल; कारण डॉक्‍टर, मंत्री यांचे वर्णन आणि व्‍याकरणातील पोटफोड्या, लंगडा इत्‍यादी शब्‍दप्रयोग हे अगदी आधुनिक काळातील आहेत. याचाच अर्थ असा की, ज्‍या संस्‍कृतला इंग्रजांनी हेटाळले होते, त्‍याच संस्‍कृतमध्‍ये आजच्‍या काळातही लीलया रचना होत आहेत आणि त्‍याही कालानुरूप !’

– डॉ. लीना रस्‍तोगी, नागपूर

‘संस्‍कृतमध्‍ये नर्म विनोदाचीही कमतरता नाही. आता वैद्याला उद्देशून लिहिलेला हा श्‍लोकच पहा…

१. वैद्याला यमराजाचा सहोदर (सख्‍खा भाऊ) म्‍हणून विरोधाभास व्‍यक्‍त करणे

वैद्यराज नमस्‍तुभ्‍यं यमराजसहोदर ।
यमस्‍तु हरति प्राणान् त्‍वं तु प्राणान् धनानि च ॥

अन्‍वय – (हे) यमराज – सहोदर वैद्यराज, तुभ्‍यं नमः यमः तु (केवलं) प्राणान् हरति, त्‍वं तु प्राणान्, धनानि च (हरसि) ।

अर्थ : यमराजाचा सख्‍खा भाऊ (सहोदर) असणार्‍या हे वैद्या, तुला नमस्‍कार असो. यम तर केवळ प्राणच हरण करतो; पण तू तर प्राण आणि धनही हरण करतोस.

आहे ना उपरोध ! उपचाराच्‍या नावाखाली भरपूर शुल्‍क घेऊनसुद्धा रुग्‍णाचे प्राण वाचवू न शकणार्‍या वैद्याला येथे यमराजाचा सहोदर म्‍हटले आहे ! इतकेच नाही, तर यमाहूनही त्‍याला श्रेष्‍ठ ठरवले आहे; कारण यमाला केवळ प्राणच अर्पण करावे लागतात; पण वैद्याला मात्र प्राणाहुतीसह धन द्यावे लागते ! वैद्यकीय व्‍यवसायाशी प्रामाणिक न रहाणार्‍या वैद्यांची येथे उपहासाने अशी संभावना केली आहे की, इतरांचे सोडाच, प्रत्‍यक्ष रोग्‍याला आणि त्‍याचा उपचार करणार्‍या वैद्यालासुद्धा हसू येईल.

२. चातुर्य आणि उपहास यांचे ‘अत्‍युत्तम’ उदाहरण दर्शवणारा श्‍लोक

हे सामुद्रिक ! भद्र ! मत्‍सुतकरे पश्‍य क्षणं लक्षणं प्रायो गौरिव हिण्‍डतेऽयमनिशं नैवास्‍य विद्यारुचिः ।
तद़् वृद्धावचनं निशम्‍य सहसाऽदृष्‍ट्‍वैव तल्लक्षणं स प्राहाम्‍ब ! शिशुः सुनिश्‍चितमयं मन्‍त्री भवेद़् भाग्‍यवान् ॥

अन्‍वय : ‘‘हे भद्र सामुद्रिक, क्षणं मत्‍सुतकरे लक्षणं पथ्‍य । अयम् अनिशं प्रायः गौः इव हिण्‍डते । अस्‍य विद्यारुचिः नैव । (इति) तत् वृद्धावचनं निशम्‍य सः तल्लक्षणम् अदृष्‍ट्‍वा एव सहसा प्राह, अम्‍ब ! (तव) शिशुः भाग्‍यवान् । (सः) मन्‍त्री भवेत् (इति) इदं सुनिश्‍चितम् ।’’

अर्थ : ‘अरे सामुद्रिका (भविष्‍य वर्तवणारा), क्षणभर माझ्‍या मुलाच्‍या हातावरील लक्षणे पहा बरे ! हा रात्रंदिवस नुसता बैलासारखा उंडारत असतो. याला अभ्‍यासात गोडीच नाही.’ हे त्‍या वृद्धेचे वचन ऐकून त्‍याचा हात न बघताच सामुद्रिक लगेच म्‍हणाला, ‘अहो आईसाहेब, तुमचा मुलगा भाग्‍यवान आहे. तो मंत्री होणार, हे अगदी पक्‍के (सुनिश्‍चितम्) समजा.’

हातावरील रेषा पाहून भविष्‍य वर्तवणार्‍यास ‘हस्‍तसामुद्रिक’ म्‍हणतात. अशा एका हस्‍तसामुद्रिकाचे आगमन गावात झाले असतांना गावातील एका स्‍त्रीने त्‍याला केलेली विनंती या श्‍लोकाच्‍या पहिल्‍या दोन ओळीत आहे. आपल्‍या शाळकरी मुलाच्‍या व्रात्‍यपणाने ती कंटाळलेली दिसते. ज्‍या अर्थी मुलगा ‘शिशु’ आहे, त्‍या अर्थी ती स्‍त्री वृद्ध नक्‍कीच नसणार; परंतु शिक्षणात रस नसलेल्‍या मुलाच्‍या भविष्‍याच्‍या चिंतेमुळे तिला अकाली वार्धक्‍याने ग्रासले असावे, हे दर्शवण्‍यासाठी ‘वृद्धावचनं’ हा शब्‍द आणि सामुद्रिकाच्‍या तोंडचे ‘अम्‍ब’ हे संबोधन योजण्‍यात कवीचे चातुर्य दिसून येते. असा हा मुलगा ‘भाग्‍यवान’ असून ‘मंत्री’ होणार, असे हात न बघताच केलेले भाकीत, म्‍हणजे तर उपहासाचे एक ‘अत्‍युत्तम’ उदाहरण आहे !

३. संस्‍कृत कवी ‘मेधावी’ (कुशाग्र बुद्धी) असल्‍याचे आणि मराठी भाषेचे वैशिष्‍ट्य दर्शवणारे उदाहरण

उदरं दारय तस्‍य छिन्‍धि पदं तस्‍य कर्ष तस्‍य शिखाम् ।
शिक्षेयं बालेभ्‍योऽक्षरबोधे दीयते तु गुरुणा सा ॥

अन्‍वय : ‘‘तस्‍य उदरं दास्‍य, तस्‍य पदं छिन्‍धि, तस्‍य शिखां कर्ष’’, इति इयं सा शिक्षा गुरुणा बालेभ्‍यः अक्षरबोधे दीयते ।

अर्थ : अक्षर ओळख करून देतांना गुरुजी मुलांना शिकवतात, ‘‘त्‍याचे पोट फोड, त्‍याचा पाय मोड आणि त्‍याची शेंडी खेच.’’

हे सर्व वाचल्‍यावर प्रथम तर धक्‍काच बसतो की, ‘अक्षर ओळख करून घेण्‍यासाठी आलेल्‍या निरागस बालकांना गुरुजी हे काय भलतेच हिंसाचार शिकवत आहेत’; पण मग लक्षात येते की, ही मुले मराठी शाळेतील असावीत.

मराठीत ‘मूर्धन्‍य’ (जिभेचा टाळूवर स्‍पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात, त्‍यांना ‘मूर्धन्‍य व्‍यंजन’ असे म्‍हणतात.) ‘ष’ ला ‘पोटफोड्या’ आणि ‘तालव्‍य’ (ज्‍या वर्णांचा उच्‍चार करतांना जिभेचा स्‍पर्श वरच्‍या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात, त्‍यांना ‘तालव्‍य व्‍यंजन’ असे म्‍हणतात.) ‘श’ ला ‘शेंडीफोड्या’ म्‍हणतात. तसेच ‘हलन्‍त’ (अक्षराचा पाय मोडणे) अक्षराला ‘लंगडा’ म्‍हणण्‍याची पद्धत आहे. ही तिन्‍ही विशेषणे हिंसक संकेत देतात, हे सांगण्‍याची आवश्‍यकता नाहीच ! गंमत म्‍हणजे हिंदी भाषेचीही लिपी देवनागरीच आहे; परंतु तेथे मूर्धन्‍य, तालव्‍य, हलन्‍त या संज्ञा मूळ संस्‍कृतप्रमाणेच आहेत. व्‍याकरण न शिकलेला मनुष्‍यही ‘शक्‍कर’ का ‘श’ आणि ‘षटकोन’ का ‘ष’, असेच म्‍हणतो. ‘ष’ ला पोटफोड्या इत्‍यादी म्‍हणण्‍याची आगळीवेगळी पद्धत, हे मराठीचेच वैशिष्‍ट्य ! असे बोलणार्‍या गुरुजींना भानही नसेल की, आपण काही हिंसक अर्थाचे बोलत आहोत ! असे प्रसंग टिपून त्‍यातून हास्‍यरस निर्माण करणारे आपले संस्‍कृत कवी खरोखरीच ‘मेधावी’ (कुशाग्र बुद्धी) म्‍हणावे लागतील !

४. कवीने ‘कलाटणी तंत्र’ वापरून उलगडा केलेला श्‍लोक

आदौ कृन्‍तामि गलं हस्‍तच्‍छेदो भवेत्ततः सुकरः ।
आलापा द्विजसदने सीवन्‍तीनां तु बालिकानां ते ॥

अन्‍वय : ‘आदौ गलं कृन्‍तामि, ततः हस्‍तच्‍छेदः सुकरः भवेत्’ (इति) द्विजसदने सीवन्‍तीनां बालिकानां वै आलापाः ।

अर्थ : ‘आधी मी गळा कापते, म्‍हणजे मग हात कापणे सोपे जाईल’, अशा प्रकारचे संभाषण त्‍या भटजीबुवांच्‍या घरी शिवणकाम करणार्‍या मुली करत असतात !

घर भटजीबुवांचे आणि तेही शुद्ध शाकाहारी ! तेथे असणारा स्‍त्रीवर्ग, कधी बकरी, कोंबडी, मासळी अशा प्राण्‍यांचेही अवयव कापणार नाही. येथे तर चक्‍क गळा आणि हात कापण्‍याच्‍या गोष्‍टी चालू आहेत. जर एखादा वाटसरू त्‍या भटजीबुवांच्‍या घरासमोरून जात असेल आणि त्‍याच्‍या कानावर स्‍त्रीच्‍या आवाजातील हा हिंसक संवाद पडला, तर त्‍याची काय अवस्‍था होईल ? गळा आणि हात हे तर मानवी अवयव ! या ब्राह्मणाच्‍या घरी स्‍त्रिया अशी घातक कर्मे करतात ? असे त्‍याला वाटले, तर नवल नाहीच. या श्‍लोकाच्‍या शेवटच्‍या ओळीत ‘कलाटणी तंत्र’ वापरून त्‍याचा उलगडा कवीने मोठ्या कौशल्‍याने केला आहे.

५. मर्म हेरून विनोदी रचना करणारे प्रतिभाशाली संस्‍कृत कवी !

अशाच प्रकारचे चांभाराच्‍या दुकानातील क्रेता (ग्राहक) आणि विक्रेता यांचे संभाषण आपण पाहूया.

अस्‍याभूद़् बहुलम्‍बा जिह्वा तां छिन्‍धि, ताड्यतां पार्ष्‍णिः ।
आदेशोऽयं पादत्राणक्रयणे तु चर्मकाराय ॥

अन्‍वय : ‘अस्‍य जिह्वा बहु लम्‍बा अभूत् । तां छिन्‍धि । पार्ष्‍णिः ताड्यताम् ।’ अयं तु पादत्राणक्रयणे चर्मकाराय आदेशः ।

अर्थ : याची जीभ फार लांब झाली आहे, ती जरा छाटून टाक आणि टाचेला जोराने ठोक. जोडा खरेदी करतांना ग्राहक चर्मकाराला हा असा (हाणामारीचा) आदेश देतात !

वस्‍तूत: जीभ छाटणे, हा एक अघोरी प्रकार आहे. पायाच्‍या टाचेला ठोकणे, म्‍हणजे सरळ एखाद्याला धाराशायी करणेच; पण या दोन्‍ही कृती ग्राहक अगदी निर्विकारपणे चर्मकाराला करायला सांगतो आणि चर्मकारही आज्ञाधारकपणे मान डोलवून तितक्‍याच निर्विकारपणे त्‍यांचे पालन करतो, म्‍हणजे जोड्याच्‍या मानाने मोठी असलेली त्‍याची जीभ कापून लहान करतो अन् टाचेजवळचा भाग ठोकून ठोकून समतल बनवतो. खरेतर ही नेहमीच्‍या व्‍यवहारातील एक सामान्‍य गोष्‍ट. त्‍यातील नेमके मर्म हेरून अशी विनोदी रचना करणे, हे कसब मात्र प्रतिभाशाली कवीचेच !

– डॉ. लीना रस्‍तोगी, नागपूर

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै-सप्‍टेंबर २०२३)