वैदिक रक्षाबंधन उत्‍सव

१. वैदिक संरक्षक सूत्र (राखी) बनवण्‍याची कृती

ही राखी बनवण्‍यासाठी दूर्वा, अक्षता (तांदूळ), केसर, चंदन आणि मोहरीचे दाणे या ५ वस्‍तूंची आवश्‍यकता आहे. या ५ वस्‍तूंना रेशमी कापडात घेऊन ते एकत्र बांधावे किंवा शिवावे. नंतर त्‍यात धागा गुंतवावा. अशा प्रकारे वैदिक राखी सिद्ध होते.

२. वैदिक संरक्षक सूत्रातील ५ वस्‍तूंचे महत्त्व

अ. दूर्वा : ज्‍या प्रकारे दूर्वाचा एक अंकुर पेरल्‍यानंतर ती गतीने पसरते आणि सहस्रोंच्‍या संख्‍येत उगवते. त्‍याच प्रकारे माझ्‍या भावाचा वंश आणि त्‍याच्‍यामध्‍ये सद़्‍गुण यांचा विकास जलद गतीने होवो. सदाचार, मनाची पवित्रता तीव्रतेने वाढत जावो. दूर्वा गणेशाला प्रिय आहेत, म्‍हणजे आम्‍ही ज्‍याला राखी बांधत आहोत, त्‍याच्‍या जीवनातील सर्व विघ्‍नांचा नाश व्‍हावा.

आ. अक्षता : आमची गुरुदेवांप्रती श्रद्धा कधीही न ढळता सदैव अखंड राहो.

इ. केसर : केसर हे तेज प्रकृतीचे असते, म्‍हणजे आम्‍ही ज्‍याला राखी बांधत आहोत, तो आणखी तेजस्‍वी बनावा. त्‍याच्‍या जीवनात आध्‍यात्मिकता आणि भक्‍ती यांचे तेज कधीच न्‍यून होऊ नये.

ई. चंदन : चंदनाची प्रकृती शीतल असते आणि ते सुगंध देते. त्‍याच प्रकारे त्‍याच्‍या जीवनात शीतलता टिकून राहू दे. त्‍याला कधीही मानसिक ताण येऊ नये. तसेच त्‍याच्‍या जीवनात परोपकार, सदाचार आणि संयम यांचा सुगंध दरवळत राहू दे.

उ. मोहरीचे दाणे : मोहरी प्रकृतीने तीक्ष्ण असते, म्‍हणजे यावरून हा संकेत मिळतो की, स्‍वतःसह समाजातील दुर्गुणांचे काटे नष्‍ट करण्‍यासाठी आपणही तीक्ष्ण बनले पाहिजे.

अशा प्रकारे या ५ वस्‍तूंनी बनवलेली एक राखी सर्वप्रथम भगवंताच्‍या चित्रावर अर्पण करावी. नंतर बहिणींनी आपल्‍या भावाला शुभ संकल्‍प करून राखी बांधावी. आपण मुलगा- नातवंडे आणि बंधूजन यांच्‍या समवेत वर्षभर सुखी रहातो.’

– सौ. योगिता यशवंतसिंह परदेशी, महाराष्‍ट्र प्रदेश उपसंघटक, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, भिवंडी (ठाणे)

(साभार : मासिक ‘क्षात्रधर्म’, जून २०१७)