लंपीचा संसर्ग रोखण्‍यासाठी गुरांचा बाजार आणि वाहतूक यांवर बंदी ! – जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश

खामगाव (जिल्‍हा बुलढाणा) – गोवंशियांवरील लंपी आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत आहे. देऊळगावराजा तालुक्‍यातील काही गोवंशियांना ‘लंपी’ या चर्मरोगाने ग्रासले आहे. या रोगाचा संसर्ग जिल्‍ह्यातील इतर गोवंशियांना होऊ नये, यासाठी जिल्‍हाधिकारी तथा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण बुलढाणा येथील अध्‍यक्षा भाग्‍यश्री विसपुते यांनी गुरांचा बाजार आणि वाहतूक यांवर बंदी घातली आहे.

२३ ऑगस्‍टच्‍या आदेशान्‍वये जिल्‍ह्यातील संसर्ग केंद्र नियंत्रित क्षेत्र म्‍हणून घोषित करून ‘लंपी’वर नियंत्रण आणणे आणि प्रतिबंध लावणे यांसाठी गुरांचे बाजार भरवणे, तसेच प्राण्‍यांची शर्यत लावणे, प्राण्‍यांचे प्रदर्शन यांवर बंदी घातली आहे. गुरांचा बाजार न भरवण्‍याच्‍या सूचना जिल्‍ह्यातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती आणि नगर परिषदा, ग्रामपंचायती यांना देण्‍यात आल्‍या आहेत.

लसीकरण त्‍वरित करून घ्‍यावे !

गोवंशियांच्‍या मालकांनी गोठा स्‍वच्‍छ ठेवावा, तसेच गोठ्यात औषधांची फवारणी करावी. पशूधनाचे लसीकरण करून घ्‍यावे. – चंदनसिंग राजपूत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, खामगाव