पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कोल्‍हापूर – जिल्‍ह्यातील ऐतिहासिक वास्‍तू, मंदिरे, सामाजिक विषयाशी निगडीत जुन्‍या वास्‍तू आणि ठिकाणांची शासनस्‍तरावरून विविध कामांतून दुरुस्‍ती चालू आहे. पूर्वीच्‍या स्‍थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्‍या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेले पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भवानी मंडप येथील हुजूरपागा इमारत येथे उभारण्‍यात आलेले स्‍वच्‍छतागृह आणि दक्षिण दरवाजा नजीक वाहनतळ परिसरात चप्‍पल ठेवण्‍यासाठी उभारण्‍यात आलेल्‍या सुविधा केंद्राचे उद़्‍घाटन पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या प्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांसह मान्‍यवर उपस्‍थित होते.

पालकमंत्री पुढे म्‍हणाले, ‘‘जिल्‍हा वार्षिक योजनेतून पर्यटनस्‍थळ विकास कार्यक्रमांतर्गत भवानी मंडपाजवळ ८३ लाख ८ सहस्र रुपये व्‍यय करून स्‍वच्‍छतागृहे, तर ११ लाख ७८ सहस्र रुपये व्‍यय करून चप्‍पल ठेवण्‍यासाठी सुविधा केंद्र सिद्ध करण्‍यात आले आहे. हा केवळ प्रारंभ असून येत्‍या काळात भूमीगत पद्धतीने विद्युत् वाहिन्‍या, तसेच दर्शन रांगा, वाहनतळही भूमीखालून केले जाणार आहे. मंदिर परिसरात असलेली सर्व कामे चांगली व्‍हावीत, यांसाठी आम्‍ही प्रयत्नरत आहोत.’’