भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि उपसरपंच यांच्‍यात ग्रामपंचायतीमधील भ्रष्‍टाचारावरून वाद !

गंगापूर (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथील घटना !

छत्रपती संभाजीनगर – जिल्‍ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्‍यात भर कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्‍ये झालेल्‍या भ्रष्‍टाचारावरून वादावादी झाली. याचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे.

आमदार प्रशांत बंब ‘जनता दरबार’ कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी सभास्‍थळी उपस्‍थित असलेल्‍या माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपावरून आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी बंब आणि संबंधित उपसरपंच यांनी एकमेकांवर अनेक प्रश्‍नांचा भडीमार केला. ‘आमदारांनी दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. तुम्‍ही सकारात्‍मक बोलता; पण प्रत्‍यक्षात नकारात्‍मक कामे करता. कधीतरी सकारात्‍मक कामेही करा’, असे उपसरपंचांनी या व्‍हिडिओत आमदार प्रशांत बंब यांच्‍यावर टीका केली आहे.

या वेळी आमदार प्रशांत बंब संबंधित उपसरपंचाला उद्देशून म्‍हणाले की, तू अगोदर खोटे बोलला कि नाही ? तू अगोदर माझे ऐकून घे. कृपया असे करू नको. तुला जे बोलायचे आहे, ते नंतर बैठक घेऊन बोल. मी यांचे बोलणे ऐकून घेतले आहे. मी १५ सप्‍टेंबरपूर्वी नागरिकांशी संवाद साधतो.

संपादकीय भूमिका :

सर्वांसमक्ष लोकप्रतिनिधींवर भ्रष्‍टाचाराचे आरोप होत असतील, तर हे गंभीर आहे. यासाठी सरकारने यात लक्ष घालावे, अशीच जनतेची अपेक्षा !