सध्या सर्वत्र सत्तेसाठी राजकारण चालू आहे. ही स्थिती एकीकडे असली, तरी सध्याच्या युवकांसमोरही अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत; मात्र त्या दुर्लक्षित आहेत. आपण म्हणतो, ‘देशाची प्रगती युवकांच्या हाती आहे.’ भारत हा जगातील सगळ्यात मोठा तरुण किंवा युवक यांचा देश आहे. भारतात युवकांची संख्या ६५ टक्के आहे. त्यामुळे युवा पिढीची क्षमता आणि सामर्थ्य यांच्या बळावर भारत जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहे. युवा पिढीतील काही ठराविक जणांमध्येच नाविन्याची आवड आणि जिद्द आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा सहभाग निश्चितच आहे. आज देशाच्या सीमेवर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करणाराही देशभरातील युवकच आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे असले, तरी युवकांची होणारी हानी याकडेही नाकारून चालणार नाही. या सूत्राच्या दृष्टीनेही विचार करायला हवा.
१. विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा !
महाविद्यालयीन स्तरावर युवकांच्या विद्यार्थी संघटना असतात. त्या कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली कार्य करतात. त्यामुळेच पक्षापक्षांतील मतभेद त्यातही दिसून येतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, प्रवेश प्रक्रिया, शुल्क प्रक्रिया या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम या संघटना करतात; पण बर्याचदा वादामध्येच त्यांचा वेळ जातो.
२. स्वार्थासाठी युवकांचा वापर करणारे राजकीय पक्ष !
राजकीय पक्षांच्या युवा संघटनांमध्ये काही जणांनाच पदांवर नियुक्त करून संधी दिली जाते. बाकीचे युवक हे केवळ आधारस्तंभ असतात. त्यांचा वापर करून घेतला जातो. हे आधारस्तंभ अधांतरीच असतात. त्यांच्या भवितव्याचा कुठलाही विचार त्यांच्याजवळ नसतो.
२ अ. युवकांनो, पुढार्यांच्या मागे धावून दिशाहीन होऊ नका ! : राजकीय पक्ष तरुणांचा निवडणूक काळात पुष्कळ वापर करून घेतात, त्या बदल्यात त्यांना काय मिळते ? ढाब्यावरील मनसोक्त जेवण, अर्थात्च खाणे आणि पिणे. हे सर्व ‘फुकट’ मिळत असल्याने तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार होतो. अनेक तरुण व्यसनाधीन होऊन पुढार्यांच्या मागे धावण्यातच आयुष्यातील आपली वर्षे वाया घालवतात. यामुळे अनेकांचे आयुष्य दिशाहीन झाले आहे. सामाजिक जाणिवा लोप पावत आहेत. समाजातील अत्याचार किंवा भ्रष्टाचार यांविषयी त्याला काही देणे-घेणे नाही. तो पेटून उठत नाही. त्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. घरातल्या घरात खुनाचे प्रकार घडत आहेत. कुठून आली आहे ही अस्वस्थता ? रोजगाराअभावी मोठ्या संख्येने युवकवर्ग अस्वस्थ आहे. तो धूम्रपान, मद्यपान यांच्या आहारी जातो. युवा पिढी या माध्यमातूनही नष्ट होत आहे.
३. वैचारिकदृष्ट्या क्षीण होणारे युवक !
आजचा युवक सामाजिक माध्यमे, संगणकीय ज्ञानजाल यांच्या जाळ्यात नको तितका अडकत आहे. त्यामुळे तो आत्ममग्न झाला आहे. सध्याच्या माध्यमांचा वापर चुकीच्या दिशेने केला जातो. कलाकार, खेळाडू, अभिनेते-अभिनेत्री यांना मोठ्या स्वरूपातील रकमेचा मोबदला देऊन ‘ऑनलाईन खेळां’ची विज्ञापने केली जातात. त्याकडे तरुणांना आकर्षित केले जाते. तरुणांना विधायक कार्याकडे ओढण्याऐवजी अशा प्रकारांकडे ओढल्याने त्यांची दिशा पालटत आहे. तरुण त्यात नष्ट होत आहे. याकडे गांभीर्याने पहायला हवे, तसेच अशा प्रकारांवर बंदी आणायला हवी आहे. अनेक राज्यांत ‘ऑनलाईन खेळां’वर बंदी आहे; मात्र महाराष्ट्र सरकारला त्याची आवश्यकता का वाटत नाही ? युवकांच्या विकासाच्या योजनांचा विचार करत असतांना अशा गोष्टींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आजच्या युवकांमधील संवाद अल्प होत असून वाचनाचे प्रमाण अल्प झाले आहे. युवकांमध्ये वैचारिक क्षीणता आल्याचे जाणवते. नवीन तंत्रज्ञान जरी निर्माण होत असले, तरी त्यात माणसे हरवत चालली आहेत. त्यामुळे आजच्या युवकांना विधायक वळण द्यायला हवे.
४. युवकांची ‘मन की बात’ ओळखा !
स्वामी विवेकानंद यांचा युवा शक्तीवर पुष्कळ विश्वास होता. युवा शब्द उलट वाचल्यास ‘वायु’ असा होतो. वायू म्हणजे गती ! स्वामी विवेकानंद यांना संस्कारक्षम, कणखर, तसेच राष्ट्र, समाज यांच्याप्रती प्रेम असणारा अन् निर्व्यसनी युवक अपेक्षित होता. युवकांची ‘मन की बात’ ओळखायला हवी. त्यांना रोजगार उपलब्ध करून नवनवीन संधी द्यायला हव्यात.
५. युवा पिढी म्हणजे राष्ट्राचे सामर्थ्य वाया जाऊ देऊ नका !
युवा पिढी म्हणजे राष्ट्राचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य वाया जाऊ द्यायचे नाही. युवक हेच देशाचे खरे भांडवल आहे. सर्वच क्षेत्रांतील युवकांना किंवा युवा संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. त्यांना विधायक वळण द्यायला हवे. तसे झाल्यास युवक विदेशातील शिक्षणाकडे आकर्षित न होता भारतातच रहातील आणि त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला लाभ होईल. ठिकठिकाणी युवकांचे मेळावे आयोजित करून त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत !
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव.