जादा भाडे आकारणार्‍या बस आणि रिक्शा चालकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करा !

प्रवाशांना प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांचे आवाहन

रत्नागिरी – जादाचे भाडे आकारणार्‍या बस आणि रिक्शा मालक, तसेच चालक यांच्याविरुद्ध पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इ-मेल पत्ता dyrto.-०८[email protected] अथवा ०२३५२-२२९४४४ या कार्यालयाच्या व्हाट्सॲप क्रमांकावर तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रति कि.मी.

भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक रहाणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ या दिवशी शासन निर्णय कार्यान्वित करून निश्चित केले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीतील सूत्रांच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशी रिक्शांच्या मनमानी भाडे आकारणीविषयी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या वतीने तयार करण्यात आलेला भाडे तक्ता (मीटरप्रमाणे आणि शेअर रिक्शा) हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानक आणि बसस्थानक येथे प्रदर्शित करण्यासंबंधी सूचना दिलेल्या आहेत. मीटरप्रमाणे प्रति कि.मी. भाडे रु २०.४९, किमान देय भाडे रु.३१, रात्री १०  ते सकाळी ६  या कालावधीसाठी आकारावयाचे अतिरिक्त भाडे सध्या ५० टक्के आणि लगेजकरता रु. ३ एवढे भाडे आकारावे.


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानक आणि बसस्थानक येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या भाडे तक्ता (मीटरप्रमाणे आणि शेअर रिक्शा) पेक्षा जादाचे भाडे आकारल्यास  तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.