चीनला शह देण्यासाठी भारत-अमेरिका यांच्यातील संबंध भक्कम होणे आवश्यक !

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार विवेक रामास्वामी यांचे वक्तव्य !

  • रशिया-युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेने घेतलेल्या सहभागाविषयीही नोंदवला विरोध !

विवेक रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार विवेक रामास्वामी यांनी भारत-अमेरिका संबंधांविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. हिंदु म्हणून अभिमान बाळगणारे ३८ वर्षीय रामास्वामी म्हणाले की, सध्या अमेरिका आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील भक्कम संबंध अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व नष्ट करू शकते. अमेरिकेतील आयोवा येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

१. रामास्वामी म्हणाले की, अमेरिकेने भारतासमवेत अंदमान-निकोबार द्वीपसमूहांतही सैनिकी संबंध अधिक बळकट करणे आवश्यक आहे. यामुळे आवश्यकता पडल्यास चीनला ‘मलक्का स्ट्रेट’मध्ये  (सामुद्रधुनीमध्ये) थांबवता येऊ शकेल. मध्य-पूर्वेतील देशांकडून तेल विकत घेण्यासाठी चिनी जहाजांना ‘मलक्का स्ट्रेट’ मार्गेच जावे लागते.

२. रामास्वामी पुढे म्हणाले की, भारतासमवेत या क्षेत्रांत सहकार्य वाढवणे अमेरिकेच्याही हिताचे असेल. पंतप्रधान मोदी भारतासाठी एक चांगले नेते आहेत. मला त्यांच्यासमवेत भारत-अमेरिका संबंध अधिक बळकट करण्याची इच्छा आहे.

३. रामास्वामी रशिया-युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेने घेतलेल्या सहभागाच्याही विरोधात आहेत. यासंदर्भात ते म्हणाले की, अमेरिकी परराष्ट्रीय धोरणामध्ये सर्वांत मोठे आव्हान हे आहे की, आपण आपली भूमी सुरक्षित करण्यास असमर्थता दाखवत आहोत. ज्या क्षेत्रांमध्ये युद्धे होत आहेत, तेथे सहभाग घेऊन अमेरिकेला कोणताही लाभ होतांना दिसत नाही. अमेरिकेला साम्यवादी चीनवर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे; कारण तो अमेरिकेसमोरील सर्वांत मोठे संकट आहे.

४. दोन्ही देशाांतील व्यापारी संबंधही पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार हा तब्बल ६९० बिलियन डॉलरर्सचा होता. यामध्ये अमेरिकेने चीनकडून ५३६ अब्ज डॉलरचे सामान आयात केले होते.

विवेक रामास्वामी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ !

विवेक रामास्वामी यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाचे मुख्य उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतरचे संभाव्य उम्मेदवार म्हणून पाहिले जात आहे. ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वांत तरुण उमेदवार आहेत. ते अब्जाधीश उद्योगपती असून ‘रोइवंत सायन्सेस’ नावाच्या बायोटेक (जैवतंत्रज्ञान) आस्थापनाचे संस्थापक आहेत. २३ ऑगस्ट या दिवशी अमेरिकेतील विंस्कोसिन राज्यातील मिलवाउकी येथे झालेल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षयीय चर्चासत्रानंतर त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. रिपब्लिकन पक्षाच्या अन्य उम्मेदवारांच्या तुलनेत ते उजवे ठरले. त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या अर्थसाहाय्यामध्येही प्रचंड वाढ झाली आहे.