प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग सदैव कटीबद्ध ! – विभाग नियंत्रक पी.एस्. बोरसे

चालक आपटे यांनी एस्.टी. असुरक्षित असल्याचा व्हिडिओ काढल्याचे प्रकरण

रत्नागिरी – राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीने रत्नागिरी विभागातील सर्व ‘बसेस’ची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यात येते. महामंडळाच्या अभियांत्रिकी खात्याकडील पंचसूत्री तत्त्वानुसार कार्यपद्धतीचा अवलंब आणि परीक्षण करूनच प्रत्येक बस मार्गावर प्रवासी वाहतुकीकरता वापरण्यात येते. प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग अन् राज्य परिवहन महामंडळ सदैव कटीबद्ध राहील. प्रवाशांनी, विविध समाजघटकांनी, तसेच प्रसारमाध्यमांनी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक पी.एस्. बोरसे यांनी केले आहे.


राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराचे चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये प्रवासी जनतेला ‘एस्.टी.तून प्रवास करू नका. आपला जीव वाचवा’, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने विभागीय पातळीवर तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.