काश्मीरमध्ये एका महिलेसह अन्य एका आतंकवाद्याला अटक !

  • पाकमधून मिळाले ४७ लाख रुपये !

  • एके-४७ रायफलीसह अनेक शस्त्रे जप्त !

बांदीपोरा (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ‘आसाम रायफल्स’ आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत मुनिरा बेगम नावाच्या महिलेसह अन्य एका आतंकवाद्याला अटक केली. दुसर्‍या आतंकवाद्याचे नाव शफायत जुबेर असे आहे.

या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, जुबेर हा पाकमधील आतंकवादी मुश्ताक अहमद मीर याच्या संपर्कात होता. आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला ४७ लाख रुपयेही मिळाले होते. कारवाईच्या वेळी जुबेरकडून एक पिस्तुल, एक पिस्तुल मॅगझिन, ८ गोळ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

वर्ष २००० मध्ये कोठीबाग येथे झालेल्या बाँबस्फोटात जुबेरचा हात होता. या स्फोटात १२ पोलिसांसह १४ जणांचा मृत्यू झाला होता. वर्ष २००९ मध्ये सैन्याचे वाहन जाळल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. झुबेरने चौकशीच्या वेळी त्याने सांगितले की, तो मुनिरा बेगम नावाच्या महिलेकडे शस्त्रे घेण्यासाठी जात होता. मुनिरा ही मारला गेलेला आतंकवादी युसूफ चौपान याची पत्नी आहे. त्यानंतर पोलिसांनी मुनिराकडून १ एके-४७ रायफल, ३ मॅगझिन, ९० गोळ्या आणि एक ‘पेन पिस्तुल’ जप्त केले. चौकशीच्या वेळी मुनिरा २ वेळा पाकिस्तानात गेल्याचे समोर आले.

संपादकीय भूमिका 

भारतात फोफावलेला जिहादी आतंकवाद हा पाकपुरस्कृतच आहे, हे जगजाहीर असतांना आतंकवाद्यांना ठार मारणे अथवा अटक करणे यांसह त्यांच्या निर्मात्या पाकलाच नेस्तनाबूत करण्यासाठी भारत पाऊले कधी उचलणार आहे ?