(म्हणे) ‘ब्रिटनने भारताला केलेले आर्थिक साहाय्य भारताने परत करावे !’ – पॅट्रिक क्रिस्टिसन, जी.बी.एन्. या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक

‘चंद्रयान-३’च्या यशामुळे ब्रिटनमधील वृत्तवाहिनीच्या निवेदकाला पोटशूळ !

लंडन (इंग्लंड) – भारताच्या ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशावरून जगभरात भारताचे कौतुक होत असले, तरी काही जणांना पोटशूळही उठला आहे. ‘चंद्रयान-३’च्या बातमीवर बोलतांना इग्लंडमधील जी.बी.एन्. या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक पॅट्रिक क्रिस्टिसन हे म्हणाले की, ‘भारताने ब्रिटनचे पैसे परत करायला हवेत. ज्यांच्याकडे स्वत:च्या अंतराळ मोहिमा आहेत, अशा देशांना ब्रिटनने पैसे द्यायला नकोत.’ यावरून भारतियांनी सामाजिक माध्यमांवरून त्यांना जोरदार विरोध केला.

क्रिस्टिसन म्हणाले की, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो. यासमवेतच मी भारताकडे मागणी करतो की, त्यांनी आमचे २.३ बिलियन पाऊंड्स (२४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम) परत करावेत. ही रक्कम आम्ही भारताला वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधीत साहाय्य म्हणून दिली होती. आम्ही पुढील वर्षी भारताला ५७ मिलियन पाऊंड्स (५९५ कोटी रुपये) देणार आहोत. आपल्या देशाच्या लोकांनी असे करायला नको. स्वत:ची अंतराळ मोहीम असलेल्या कोणत्याही देशाला आर्थिक साहाय्य करायचे नाही, असा नियम आपण करायला हवा.

क्रिस्टिसन पुढे म्हणाले की, जर तुम्ही (भारत) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रॉकेट पाठवू शकता, तर मग तुम्ही आमच्याकडे पैसे मागायला नकोत. भारतात २२.९ कोटी गरीब लोक आहेत; पण भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्थाही आहे. (भारताने अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत ब्रिटनलाही मागे टाकल्यानेच त्याच्या वृत्तनिवेदकाला भारतद्वेषाची कावीळ झाली आहे, हे उघड आहे ! – संपादक) भारताची अर्थव्यवस्था ३.७५ ट्रिलियन डॉलर्सची (जवळपास २५० लाख कोटी रुपयांची) आहे. आपण भारतातील गरिबांना साहाय्य का करत आहोत ? त्यांच्याच सरकारला त्यांची चिंता नाही का ?

ब्रिटनने भारताला ३ सहस्र ७१९ लाख कोटी रुपये परत करावेत !

पॅट्रिक क्रिस्टिसन यांच्या या वक्तव्यांचे भारतियांनी अचूक खंडण केले आहे. शशांक शेखर झा नावाच्या व्यक्तीने अभ्यासपूर्ण ट्वीट करत म्हटले की, ‘ब्रिटनने भारताकडून लुटलेले ४४.९९७ ट्रिलियन डॉलर (३ सहस्र ७१९ लाख कोटी रुपये) परत करावेत. अनुदानाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ! लुटलेले ४५ ट्रिलियन डॉलर परत करतांना २.५ बिलियन डॉलर कापून घ्या आणि उर्वरित पैसे आम्हाला परत द्या.’

 

संपादकीय भूमिका 

ब्रिटीश गुंडांच्या टोळीने जगाला लुटून स्वत:चा देश उभा केला, हे त्यांच्या वंशजांना ठणकावून सांगायची आता वेळ आली आहे !