ज्‍योतिषाकडून मुहूर्त काढून दरोडा टाकणार्‍यांना स्‍थानिक गुन्‍हे शाखेने कह्यात घेतले !

प्रतिकात्मक चित्र

बारामती – येथील देवकातेनगर येथे महिलेचे हात-पाय बांधून तिला मारहाण करत १ कोटी ७ लाख रुपयांचा दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांना पकडण्‍यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने ही कामगिरी केली. आरोपींनी हा गुन्‍हा करतांना रामचंद्र चव्‍हाण या ज्‍योतिषांकडून मुहूर्त काढून घेत दरोडा टाकला.

सागर गोफणे यांच्‍या घरी ते नसल्‍याचा अपलाभ घेत त्‍यांच्‍या पत्नीला मारहाण करून हात-पाय बांधून, तसेच तोंडात कापसाचा बोळा कोंबून ९५ लाख ३० सहस्र रुपये रोख, तर ११ लाख ५९ सहस्र रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष असा १ कोटी ७ लाख रुपयांचा माल आरोपींनी चोरला होता. तांत्रिक विश्‍लेषण आणि गोपनीय माहितीच्‍या आधारे या दरोडेखोरांना पकडण्‍यात यश आले. दरोडेखोरांनी पकडले जाऊ नये; म्‍हणून कोणताही पुरावा मागे ठेवला नव्‍हता; मात्र आरोपी एम्.आय.डी.सी.मध्‍ये कामगार असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर या संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवल्‍याने त्‍यांना कह्यात घेता आले. गोफणे हे भूमी खरेदी विक्रीचा व्‍यवसाय करत असल्‍याने त्‍यांच्‍याकडे भरपूर पैसा असल्‍याची माहिती आरोपींना मिळाली होती.

संपादकीय भूमिका :

ज्‍योतिष हे एक शास्‍त्र आहे; मात्र त्‍याचा अशा गोष्‍टींसाठी उपयोग करणे, हे दुर्दैवी आहे !