मुंबई – अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:चा ठसा उठवणार्या मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्ट या दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने मुंबईतील जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीमा देव यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी वर्ष २०२० मध्ये सीमा देव या ‘अल्झायमर्स’ या आजाराने ग्रस्त होत्या. सीमा देव आणि त्यांचे दिवंगत यजमान अभिनेते रमेश देव यांनी ‘आनंद’ या चित्रपटात केलेली भूमिका विशेष गाजली. या चित्रपटानंतरच अनेक चित्रपटांमध्ये सीमा देव आणि रमेश देव यांनी पती-पत्नी यांची भूमिका साकारली. सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतील गिरगाव येथे त्यांचा जन्म झाला. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून त्यांनी वर्ष १९५७ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा ८० हून अधिक चित्रपटांत काम केले. वर्ष २०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सीमा देव यांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला होता.