परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विद्या गरुड (वय ३४ वर्षे) !

निज श्रावण शुक्‍ल अष्‍टमी (२४ ऑगस्‍ट २०२३) या दिवशी कु. विद्या गरुड यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

कु. विद्या गरुड

कु. विद्या गरुड यांना ३४ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

१. सौ. विमल विलास गरुड (कु. विद्या यांची आई) आणि श्री. विलास रामचंद्र गरुड (वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सौ. विमल गरुड

१ अ. घराची स्‍वच्‍छता भावपूर्ण करणे : ‘विद्याने घराची स्‍वच्‍छता केली की, घरात लगेच पालट जाणवतो. तेथे चैतन्‍य जाणवते आणि प्रसन्‍न वाटते. घरी गणेशोत्‍सव असतांना ती घराच्‍या भिंती आणि कपाटातील प्रत्‍येक खण स्‍वच्‍छ करते. त्‍यामुळे दर्शनासाठी आलेल्‍या साधकांना ‘आपण आश्रमातच आलो आहोत’, असे जाणवून पुष्‍कळ शांत वाटते.

१ आ. विद्याला लहानपणापासूनच सात्त्विकतेची आवड आहे.

१ इ. इतरांना साहाय्‍य करणे

१. विद्याला केव्‍हाही कुणीही साहाय्‍य मागितल्‍यास ती त्‍यांना उत्‍साहाने साहाय्‍य करते. त्‍यासाठी तिला स्‍वतःचा वैयक्‍तिक वेळ द्यावा लागला, तरी ती त्‍याचा विचार करत नाही.

२. ती कुटुंबीय आणि साधक यांना तत्त्वनिष्‍ठतेने चुका सांगून साहाय्‍य करते.

१ ई. तिची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर पुष्‍कळ श्रद्धा आणि भाव आहे. आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्‍याचा निर्णय तिने स्‍वतःच घेतला होता.

१ उ. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने तिच्‍यामध्‍ये दैवी विचार ग्रहण करण्‍याची क्षमता आहे.’

२. श्री. सागर गरुड (कु. विद्या यांचा भाऊ) आणि सौ. पूजा गरुड (वहिनी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

श्री. सागर गरुड

अ. ‘सेवा कोणत्‍या पद्धतीने केल्‍यास अल्‍प कालावधीत अधिक चांगली होऊ शकते ?’, असा तिचा प्रयत्न असतो. त्‍यामुळे ती अल्‍प कालावधीत अधिक सेवा करते. तिच्‍या सेवेची फलनिष्‍पत्ती चांगली असते.

आ. ती कोणतीही वस्‍तू अभ्‍यास करून मगच खरेदी करते.’

३. श्री. संतोष गरुड (कु. विद्या यांचा चुलत भाऊ), पर्वरी, गोवा.

३ अ. ‘विद्या साधनेतील प्रत्‍येक कृती मनापासून आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशीच करते.

३ आ. आश्रमात पूर्णवेळ सेवा करायला लागल्‍यापासून अंतर्मुखता वाढणे : वर्ष २०२२ मध्‍ये मी दिवाळीनिमित्त गोव्‍याहून पनवेल येथे ६ दिवसांसाठी विद्याच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा विद्याने स्‍वतःहून मला तिच्‍या चुकांविषयी विचारले. तिने मला ‘माझ्‍यातील कोणते स्‍वभावदोष तुझ्‍या लक्षात आले ? मी स्‍वतःमध्‍ये कशी सुधारणा करू ?’, असे विचारले. या प्रश्‍नांतून तिची अंतर्मुखता वाढल्‍याचे माझ्‍या लक्षात आले.’

४. सौ. सानिका संतोष गावडे (कु. विद्या यांची चुलत बहीण), कोल्‍हापूर सेवाकेंद्र 

४ अ. काकूच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी पुढाकार घेऊन साहाय्‍य करणे : ‘एकदा तिच्‍या काकूचे एक मोठे शस्‍त्रकर्म होते. त्‍या वेळी तिने ‘एकटीनेच रुग्‍णालयात थांबणे, आधुनिक वैद्यांशी समन्‍वय करणे’ इत्‍यादी गोष्‍टी सांभाळल्‍या. ती रात्रीच्‍या वेळी रुग्‍णालयात एकटी थांबली होती. शस्‍त्रकर्म पूर्ण झाल्‍यानंतर तिने आम्‍हाला याविषयी सांगितले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.६.२०२३)


तळमळीने सेवा करणार्‍या अणि संतांप्रती भाव असणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विद्या गरुड !

१. ‘विद्याताई आश्रमातील सर्व वयोगटातील साधकांशी लगेच जवळीक साधते.

२. साधकांना साधनेत साहाय्‍य करणे

साधकांना कोणतेही साहाय्‍य लागल्‍यास ताई ते करते. साधकांकडून होत असलेल्‍या चुका वेळोवेळी सांगून ताई साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर साहाय्‍य करते, तसेच ‘साधकांना चुका सांगितल्‍यावर ताण आला नाही ना ?’, या संदर्भात विचारपूस करून त्‍यांना आधार देते.

३. सेवेची तळमळ 

३ अ. सेवा वेळेत होण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यपद्धती घालणे आणि कोणतीही सेवा प्रलंबित न रहाणे : सर्व सेवा सुरळीत आणि वेळेत होण्‍याच्‍या दृष्‍टीने ताईने अनेक कार्यपद्धती घातल्‍या आहेत. प्रत्‍येक सेवेची वर्तमान स्‍थिती समजण्‍यासाठी तिने आढावा कार्यपद्धती सिद्ध केल्‍या आहेत. ताई स्‍वतः या सर्व कार्यपद्धतींचे पालन करते. वेळोवेळी ‘कार्यपद्धतीनुसार नोंदी करणे, तसेच ठरलेल्‍या वेळेत आढावे घेणे आणि देणे’, हे ती तत्‍परतेने करते. त्‍यामुळे या सेवेची व्‍याप्‍ती मोठी असूनही कोणतीच सेवा प्रलंबित रहात नाही, तसेच कोणत्‍याही गोष्‍टीची शोधाशोध करण्‍यात वेळ वाया जात नाही.

३ आ. दायित्‍व घेऊन सेवा करणे : ताईकडे नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या संदर्भातील सेवेचे दायित्‍व आहे. या सेवेची व्‍याप्‍ती पुष्‍कळ मोठी आहे; परंतु तिच्‍यातील गुणांमुळे ही सेवा ती अतिशय कौशल्‍याने पार पाडते. सेवा परिणामकारक होण्‍याच्‍या दृष्‍टीने नवनवीन गोष्‍टी ती शिकून घेते. ‘गुरूंना आवडेल’, अशी सेवा करण्‍याचा तिचा प्रयत्न असतो.

३ इ. परिपूर्ण सेवा होण्‍यासाठी प्रयत्नरत असणे : ताईला कोणतीही सेवा दिली, तर ती परिपूर्ण करते. ‘सेवा चांगली आणि अल्‍पावधीत कशी करू ?’, असा सतत विचार करून ती सेवा करते. एकदा तिच्‍याकडे आश्रम स्‍तरावरील सकाळच्‍या अल्‍पाहार सेवेचे दायित्‍व दिले होते. तेव्‍हा तिने अल्‍पावधीत ‘अल्‍पाहार सेवेच्‍या नियोजनातील उणिवा दूर करणे आणि सेवा अधिक परिपूर्ण होणे’, या दृष्‍टीने अभ्‍यास करून त्‍या सेवेची घडी बसवण्‍यासाठी प्रयत्न केले. तिने प्रतिदिन सेवेचे नियोजन अल्‍पावधीत होण्‍यासाठी विविध संगणकीय धारिका सिद्ध केल्‍या. ‘साधकांचा वेळ वाचावा’, या दृष्‍टीने काही चांगले पालट करून तिने त्‍या सेवेची घडी बसवण्‍याचा प्रयत्न केला.

४. भाव

अ. ताई आश्रमातील सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करतेच; पण ती घरी गेल्‍यावर घरातील सेवाही परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्‍यासाठी प्रयत्न करते.

आ. एकदा आश्रमात एक संत आले होते. ते काही कालावधीसाठी आश्रमात रहाणार होते. तेव्‍हा काही कारणास्‍तव ताई घरी रहात असूनही संतांसाठी सकाळच्‍या अल्‍पाहारासाठी प्रतिदिन नवनवीन पदार्थ बनवण्‍यासाठी आश्रमात येत असे. त्‍यानंतर तिला नेमून दिलेल्‍या सर्व सेवाही ती तितक्‍याच तळमळीने पूर्ण करत असे.

इ. तिला कोणत्‍याही वेळी साधकांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यास सांगितले असता ती प्रत्‍येक वेळी भावजागृतीचा नवीन आणि वैशिष्‍ट्यपूर्ण प्रयोग घेतेे.

‘विद्याताईसारख्‍या अनेक दैवी गुण असलेल्‍या साधिकेचा सहवास आम्‍हाला अनेक वर्षे लाभला आणि तिच्‍यातील दैवी गुण आम्‍हाला शिकता आले’, याबद्दल भगवंताच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तेवढी अल्‍पच आहे. ‘विद्याताईची अध्‍यात्‍मात उत्तरोत्तर प्रगती व्‍हावी’, हीच गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) चरणी प्रार्थना आहे.’

– नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.६.२०२३)