भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला !

पाकचा आरोप; मात्र संरक्षण मंत्रालयाकडून खंडण

(सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नियोजित ठिकाणी केलेले सैनिकी आक्रमण, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसराची हानी होत नाही.)

नवी देहली – एका हिंदी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार १९ ऑगस्टच्या रात्री भारताने पाकच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. भारतीय सैन्याच्या विशेष दलाच्या १२ ते १५ कमांडो यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरीच्या तरकुंडी सेक्टर आणि पूंछच्या भिंभर गल्लीत रात्रीच्या वेळी चालत प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये साधारण अडीच किमी आत चालून कोटली जिल्ह्यात असलेल्या आतंकवाद्यांचे ४ ‘लाँचिंग पॅड’ (शस्त्रास्त्रे किंवा रॉकेट नियोजित ठिकाणी डागण्याचे ठिकाण) नष्ट केले, तसेच किमान ७ – ८ आतंकवाद्यांना ठार केले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने मात्र या कारवाईचे खंडण करत म्हटले आहे की. अशा प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ झालेला नाही. भारताने पाकमधून भारतात घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांचे प्रयत्न मात्र उधळून लावले आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या बालाकोट सेक्टरमध्ये आतंकवाद्यांचा एक समूह घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. २१ ऑगस्टच्या सकाळी खराब हवामानाचा लाभ उठवत आतंकवादी प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भारतीय सैनिकांना लक्षात आले. या वेळी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार चालू केला. यात किमान १ आतंकवादी जागीच ठार झाला, तर अन्य आतंकवादी मागे हटले. यानंतर सैनिकांनी शोधमोहीम चालू केली. या वेळी एक एके-४७, दोन मॅगझीन, दोन ग्रेनेड, ३० जिवंत काडतुसे आणि पाकमध्ये बनवण्यात आलेली औषधे हस्तगत करण्यात आली.

संपादकीय भूमिका

उद्या भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, तरी पाक त्यास प्रत्युत्तर देण्यास असमर्थच आहे, हेही तितकेच खरे ! मुळात पाकमधून सातत्याने होत असलेल्या आतंकवाद्यांच्या घुसखोरीला ‘सर्जिकल स्ट्राईक’ आदी करण्यापेक्षा पाकला एकदाचे संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !