धर्मादाय विभागाकडून मंदिराला नोटीस बजावून मंदिर नियंत्रणात घेण्याची चेतावणी !

  • सूर्यपेट (तेलंगाणा) येथील बाल उग्र नरसिंह स्वामी मंदिरात अनागोंदी असल्याची मुसलमानाची तक्रार !

  • हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून नोटिसीच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांना निवेदन

मंदिराच्या रक्षणासाठी संघटित झालेले हिंदुत्वनिष्ठ

सूर्यपेट (तेलंगाणा) – सूर्यपेट जिल्ह्यातील इरावरम् या गावात बाल उग्र नरसिंह स्वामी हे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी या मंदिरात १ लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी गावातील सुरेपल्ली हुसेन नावाच्या व्यक्तीने धर्मादाय विभागाकडे तक्रार करून या मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये अनागोंदी असल्याचा आरोप केला. त्यावरून धर्मादाय विभागाने २ ऑगस्ट या दिवशी मंदिराच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्यास सांगितले. ‘स्पष्टीकरण न दिल्यास १५ दिवसांनंतर मंदिर नियंत्रणात घेऊ’, अशी चेतावणी धर्मदाय विभागाने दिली.

याविषयी हिंदु जनजागृती समितीला माहिती मिळाल्यावर समितीने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करून १७ ऑगस्ट या दिवशी धर्मादाय आयुक्तांना निवेदन दिले. यात ‘विभागाने पाठवलेली नोटीस कायद्याच्या विरोधात असून धर्मदाय विभाग मंदिर नियंत्रणात घेऊ शकत नाही. हिंदूंचा या नोटिसीला विरोध आहे’, नमूद केले.

मंदिराच्या रक्षणासाठी संघटित झालेले हिंदुत्वनिष्ठ

१८ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी इरावरम् गावात जाऊन मंदिराचे अध्यक्ष जगन्नाथ यांची भेट घेतली आणि त्यांना ‘कुठल्याही परिस्थितीत मंदिर धर्मादाय विभागाच्या नियंत्रणात देऊ नये. आम्ही तुमच्या समवेत आहोत’, असे आश्‍वस्त केले. या वेळी मंदिराच्या न्यासाची स्थापना करण्यात आली. न्यासाद्वारे धर्मादाय विभागाला उत्तर पाठवत ‘मंदिराच्या विषयात कोणताही हस्तक्षेप करू नये’, असे सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

किती हिंदू मशीद आणि चर्च यांमध्ये अनागोंदी असल्याची तक्रार धर्मादाय विभागाकडे करतात ? हिंदूंनी आता यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे कुणाला वाटले, तर आश्‍चर्य वाटू नये !