१. चातुर्मासात भगवान विष्णूंच्या पूजनाचे महत्त्व
ब्रह्मदेवांनी नारदाला चातुर्मासाचे माहात्म्य समजून सांगितले ते असे, ‘भगवान विष्णूच सर्वांना मोक्ष देणारे आणि संसार सागरातून पार करणारे आहेत. त्यांच्या स्मरणातून मनुष्य पापातून मुक्त होतो.’ चातुर्मासात भगवान विष्णूचे व्रत करणारा मनुष्य श्रेष्ठ मानला जातो. सर्व तीर्थे, दान, पुण्य आणि देवस्थाने चातुर्मासात भगवान विष्णूंना शरण जातात. जो मनुष्य चातुर्मासात श्रीविष्णूंना प्रणाम करतो, त्याचे जीवन आनंदात व्यतीत होते. या जगात मनुष्य जन्म आणि विष्णूची भक्ती दुर्लभ आहे.
२. चातुर्मासात नदी स्नानाचे महत्त्व
चातुर्मासात नदीत स्नान केल्यास अनेक सिद्धी प्राप्त होतात. तलाव आणि विहीरीत स्नान केल्यास सर्व पापे तात्काळ नाहीशी होतात. पुष्कर किंवा प्रयागसारख्या पवित्र तीर्थात स्नान केल्यास अपरिमित पुण्याचा लाभ होतो. नर्मदा किंवा गोदावरीत स्नान केल्यास पापाचा लवलेशही रहात नाही. तीळ आणि आवळामिश्रित पाण्याने स्नान केल्यास सर्व प्रकारचे दोष तात्काळ नाहीसे होतात.
३. पापनाशिनी गंगेचे माहात्म्य
भगवान विष्णूच्या चरणांगुष्ठापासून प्रवाहित होणारी गंगा सदा पापनाशिनी आहे. चातुर्मासात तिचे माहात्म्य विशेष असते. श्रीविष्णूचे चरणोदक मस्तकावर धारण केल्यास पापे नाहीशी होतात. चातुर्मासात विष्णु जलात शयन करतात; म्हणून त्यात त्यांचा अंश असतो. अशा वेळी केलेले स्नान सर्व तीर्थांपेक्षा अधिक फळ देणारे असते. स्नानाविना केलेले पुण्यकर्म निष्फळ होते. स्नानामुळे मनुष्य सत्याप्रद जातो. स्नान सनातन धर्म आहे. मोक्ष प्राप्त झाल्यावर मनुष्याला दुःख होत नाही.
स्नानेन सत्यमाप्नोति स्नानं धर्मः सनातनः ।
धर्मान्मोक्षफलं प्राप्य पुनर्नैवावसीदति ॥
– स्कन्दपुराण, नागरखण्ड, अध्याय २३३, श्लोक २९
अर्थ : स्नानाने मनुष्याला सत्याची प्राप्ती होते. स्नान करणे, हा सनातन धर्म आहे. धर्माने मोक्षरूप फलप्राप्त करून मनुष्य दुःखी होत नाही.
प्रतिदिन स्नान करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने नद्यांच्या संगमांवर स्नान करून पिता आणि देव यांना तर्पण करावे, तसेच जप अन् होम केल्याने अनंत फळांची प्राप्ती होते. प्रथम गोविंदाचे स्मरण करून शुभकर्मांचे अनुष्ठान करावे.
४. त्यागाचे महत्त्व
चातुर्मासात प्रत्येकाने परनिंदेचा त्याग करावा; कारण परनिंदा हे महान पाप आहे. परनिंदेपेक्षा मोठे पातक नाही. परनिंदा ऐकणाराही पापी असतो. चातुर्मासात केस कापू नयेत. भगवान विष्णु शयन करत असतांना जो नखे आणि केस कापत नाही, त्याला प्रतिदिन गंगास्नानाचे फळ मिळते. सर्व वर्णांतील पुरुषांनी श्रीहरीचे चिंतन करावे.
५. शौच पालनाचे महत्त्व
चातुर्मासात बाह्य आणि आंतरिक शौच असे २ प्रकारचे शौच असते. जलाने स्नान करणे, हे बाह्य आणि अंतःकरण शुद्ध ठेवणे, हे आंतरिक शौच आहे. इंद्रियांचा निग्रह करावा. चातुर्मासात इंद्रियांची चंचलता दूर झाली, तर ते महातपच होय. सर्व इंद्रियरूपी अश्वांना अधीन ठेवल्याने मनुष्य कायमचा सुखी होतो.
६. शाळीग्रामची पूजा
चातुर्मासात शाळीग्रामची पूजा अवश्य करावी. ती ‘मधुसूदन, संकर्षण, दामोदर, वासुदेव, प्रद्युम्न, विष्णू, माधव, अनंत, पुरुषोत्तम, अधोक्षज, जनार्दन, गोविंद, त्रिविक्रम, श्रीधर, हृषीकेश, नृसिंह, विश्वयोनी, वामन, नारायण, पुंडरीकाक्ष, उपेंद्र, हरि, श्रीकृष्ण’ या नावांनी करावी. त्याला तुळस, चंदन आणि फुले वहावीत. तुळस हे लक्ष्मीचे एक रूप, तर शाळीग्राम हे श्रीविष्णूचे रूप आहे. शाळीग्रामला वाहिलेली तुळशीची माळ वाहून नंतर ती आपण गळ्यात घालावी आणि साष्टांग नमस्कार करावा. तुळशीच्या पहिल्या पानाने देव, तर दुसर्या पानाने शिव आणि मंजिरीने भगवान विष्णु प्रसन्न होतात. शक्य असल्यास गंडकी नदीच्या जलाने शाळीग्रामला स्नान घालावे.
श्रुति, स्मृति आणि पुराणे यांनी वरीलप्रमाणे २४ प्रकारे शाळीग्रामची पूजा सांगितली आहे. शाळीग्रामच्या पूजनाने मनुष्याचे शरीर पवित्र होते. श्रद्धायुक्त मनाने पूजा केली असता स्वर्गप्राप्ती होते, असे म्हटले जाते. विशेषतः चातुर्मासात नित्य तुळशीची पूजा केली असता भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या भूमीवर शाळीग्रामचे पूजन होते, त्या भूमीचे दर्शन घेतल्यावरही सर्व पापे नष्ट होतात.
७. शाळीग्राम श्रीविष्णूचे प्रतीक
शाळीग्राम ही एक पूज्य शिळा असून ती श्रीविष्णूचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये पशूपतीपासून काही किलोमीटर अंतरावर मुक्तनाथ नावाचे स्थान असून तेथील गंडकी नदीत हे सापडतात. हरि पर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नामक सरोवरातही शाळीग्राम सापडतात. १ सहस्र वर्षांनंतर भगवान श्रीविष्णु ‘वज्रकीट’ किड्याच्या रूपाने या शिळेत प्रवेश करतो आणि त्यात चक्राकृती कोरतो. १२ चक्र असलेल्या शाळीग्रामला ‘अनंत’ म्हणतात. शाळीग्राम विविध रंगांचे असून त्यावर त्यांना विविध नावे दिलेली आहेत.
(साभार : मासिक ‘धनुर्धारी’, जुलै २००८)