धर्म, परंपरा आणि संस्कार यांचा मुलांना अभिमान वाटण्यासाठी कृती करणे, हे धर्मप्रेमी हिंदूंचे दायित्व !

१. आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर धर्माचरणाचे संस्कार केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

‘आपण अनेक संप्रदाय, विचार आणि उपासना यांमध्ये विभागले गेलेलो आहोत. त्यामुळे आपण मोकळेपणाने ‘हिंदु’ म्हणून एकत्र पुढे जाऊ शकत नाही. या पद्धतीमुळे आपल्या भावी पिढ्यांना स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेतांना अभिमान वाटत नाही. याचा आपण सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मागील ७ वर्षांपासून आम्ही ‘ग्लोबल महानुभव संघा’च्या माध्यमातून नवयुवकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा मला काही गोष्टींची जाणीव झाली. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सर्व गोपगोपींचे अखंड मुसळधार पावसापासून रक्षण केले होते. तेव्हा त्याला सर्वांनी साहाय्य केले होते. आपण आपल्या कुटुंबाला आपला भाऊ, मित्र, आपले लोक यांना साहाय्य करण्यास सांगतो. ‘तुला आपले वडील, बहीण, मित्र यांच्यावर प्रेम करायचे आहे, एवढेच नाही, तर तुला आपल्या धर्मावरही प्रेम करायचे आहे आणि त्यावर अढळ निष्ठा ठेवायची आहे. तुला तुझ्या धर्माविषयी अभिमान बाळगायचा आहे’, असे जोपर्यंत आई-वडील त्यांच्या मुलांना शिकवत नाहीत, तोपर्यंत ‘हिंदु राष्ट्रा’ची पुनर्स्थापना कशी होईल ? याचा आपण अत्यंत गांभीर्याने विचार करायला पाहिजे.

२. महाराष्ट्रामध्ये वेदांचे शिक्षण देणार्‍या ११, तर ‘सी.बी.एस्.ई.’अभ्यासक्रमाच्या केवळ संभाजीनगरमध्ये २०० हून अधिक शाळा !

सध्या प्रत्येक जण त्यांच्या मुलांना ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’चे अर्थात् ‘सी.बी.एस्.ई.’चे शिक्षण देतो. किती पालक त्यांच्या मुलांना वेदांचे ज्ञान व्हावे, यासाठी प्रयत्न करतात ? कुणीच नाही. अलीकडेच आम्ही ‘महर्षि सांदिपनी वेद विद्यालया’त गेलो होतो. तेथे वेदांचे शिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्याला अशी कोणती अडचण आहे की, आपण आपल्या मुलांना वैदिक शाळेत पाठवायला मुळीच सिद्ध नसतो ? वेदांचे शिक्षण देणारी महाराष्ट्रात एकूण ११ केंद्रे आहेत आणि एकट्या संभाजीनगरमध्ये ‘सी.बी.एस्.ई.’ अभ्यासक्रमाच्या २०० हून अधिक शाळा चालतात. आपण हिंदु राष्ट्राची चर्चा करतो. त्याला ज्यांचा विरोध आहे, त्यांची शुक्रवारी नमाजाची वेळ झाली की, तेथे लहान लहान मुलेही डोक्यावर गोल टोप्या घातलेली दिसतात. यातून ते त्यांच्या लहान लहान मुलांना धर्माप्रती कट्टरता शिकवत आहेत. ते त्याला बकरा पाळायला शिकवतात आणि नंतर त्याला मारायलाही शिकवतात. आम्हाला मुलांना मारायला शिकवायचे नाही; पण किमान आपल्या धर्मातील संस्कार तरी धार्मिक वारसा म्हणून पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे.

पू. सुदर्शन महाराज कपाटे

३. हिंदूंंनी धर्मबांधवांना साहाय्य करावे !

काही मासांपूर्वी एका मुलीला एका नराधमाने दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना घडली. त्याची चित्रफीत सर्वांनीच पाहिली. त्यात जेव्हा तो नराधम तिला ठार मारत होता, तेव्हा आपल्यासारखे अनेक जण तेथून जात होते; पण कुणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ‘माझ्यावर आक्रमण होईल, तेव्हा मी पाहून घेईन’, अशी मानसिकता चुकीची आहे. एखादा मुसलमान अडचणीत असेल, तर त्याला साहाय्य करण्यासाठी १०-१५ मुसलमान त्वरित जातात. याउलट एखादा हिंदु बांधव अडचणीत असेल, तर आपण त्याला पाहून पुढे निघून जातो; कारण आपल्याला पुष्कळ कामे असतात. त्या बिचार्‍याला  साहाय्य करण्याचे काम महत्त्वाचे वाटतच नाही. असे का होते ?

४. धर्मद्रोह्यांना विरोध करण्यासाठी हिंदु मुलांना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक !

 

श्रीमद्भवद्गीता सांगणारा, गोवर्धन पर्वत उचलणारा, कुब्जेचे व्यंग दूर करणारा आणि कंसाचा वध करणारा तो भगवान श्रीकृष्ण आहे; परंतु आपल्या मुलांसमोर १६ सहस्र १०८ कन्यांना पळवणारा, लोणी चोरणारा आणि स्नान करणार्‍या गोपींची वस्त्रे पळवणारा अशा स्वरूपात भगवान श्रीकृष्ण उभा केला जातो. त्याच्या टीकेवर आपलीच मुले हसतात; पण त्यामागील कार्यकारणभाव सांगू शकत नाहीत. आपण भगवंताच्या लीला समजू शकत नाही. आपल्या गुरुजनांनी जे सांगितले, त्याचा आपल्याला पुढे विस्तार केला पाहिजे.

५. ‘नवीन पिढीला अभिमान वाटावा’, असे हिंदु राष्ट्र स्थापन करणे आपल्या प्रत्येकाचे  कर्तव्य !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले. त्यानंतर हे सरकार पूर्वीचा धर्मांतरविरोधी कायदा मागे घेत असल्याची बातमी वाचली. हे सर्व काय चालले आहे ? जेथे हिंदू निद्रिस्त असेल, तेथे हिंदूंची संख्या घटत जाणार आहे. आता आपण निद्रेतून जागृत झाले पाहिजे. जगातील सर्व देशांची जन्मतिथी आपल्याला ठाऊक असेल; परंतु भारत असा एक देश आहे, ज्याचा जन्मच नाही. हा देश अनादि काळापासून आहे आणि अशा महान देशात ईश्वराला पुन:पुन्हा अवतार घेण्याची इच्छा निर्माण होते. येथे जन्म घेणारा जीव ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो आणि ईश्वराचे ज्ञान तो प्राप्त करू शकतो. अशा भूमीचे रक्षण करण्यात आपण पुष्कळ अल्प पडत आहोत. आज या अखंड हिंदु राष्ट्रासाठी एकत्र आलेल्या सर्वांनी असा विचार करायला पाहिजे की, आपण तर आपले जीवन त्यासाठी समर्पित केले आहे; परंतु या हिंदु राष्ट्रासाठी आपला धर्म, परंपरा आणि संस्कार यांचा आपल्या मुलांना अभिमान वाटला पाहिजे, असे काहीतरी करणे आपले दायित्व आहे.’

– पू. सुदर्शन महाराज कपाटे, अध्यक्ष, ग्लोबल महानुभव संघ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र